
“अथासने दृढे योगी वशी हितमिताशनः । गुरूपदिष्टमार्गे प्राणायामान्समभ्यसेत् ॥ 2:1 ॥”
आसन में निपुण होकर और शरीर पर नियंत्रण प्राप्त कर, हितकर सन्तुलित आहार लेते हुए, गुरु के उपदेशों के अनुसार प्राणायाम का अभ्यास करना चाहिए। 🌷हठयोग प्रदीपिका🌷
आज आपण प्राणायाम या विषयावरील मूलभूत माहिती जाणून घेऊया:
सामान्यतः प्राणायामाची व्याख्या ‘श्वासावर नियंत्रण ठेवणे’ अशी केली जाते. व्यवहाराच्या दृष्टीने ही व्याख्या काही अंशी योग्य असली, तरी ती प्राणायामाचा पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही. “प्राणायाम” हा शब्द दोन भागांनी बनलेला आहे — प्राण आणि आयाम. ‘प्राण’ म्हणजे जीवनाला पोषक अशी जीवन शक्ती. हीच ती ऊर्जा आहे, जी सजीव तसेच निर्जीव – प्रत्येक घटकात सूक्ष्म स्वरूपात अस्तित्वात असते.
जरी तिचा श्वासाद्वारे घेतल्या जाणाऱ्या हवेशी निकट संबंध असला, तरी ती केवळ वायू किंवा ऑक्सिजनपुरती मर्यादित नाही; ती त्यापेक्षा अधिक सूक्ष्म आहे.
आयुर्वेद अनुसार सूक्ष्म ऊर्जा / जीवनशक्ती (vital energy/ functional life-force) असे प्राणाचे वर्णन केलेले आहे.
प्राणायामबाबत हे सर्व लक्षात घेता, प्राणायामाला केवळ, फुफ्फुसांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन पुरवणारा श्वसनाचा व्यायाम (breathing exercise) समजणे योग्य नाही. प्राणायामात श्वास ही एक साधनरूप प्रक्रिया असून, तिच्या साहाय्याने प्राणमय कोषातील नाड्यांमधील प्राणप्रवाहावर परिणाम साधला जातो. शुद्धीकरण सुद्धा केले जाते.

भगवद्गीता (अध्याय 4, श्लोक 29) :
श्लोक:
“अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥”
अर्थ: काही साधक प्राण आणि अपान या दोन्ही ऊर्जांचा परस्पर समन्वय साधतात. ते त्यांच्या गतीवर नियंत्रण ठेवून प्राणायामात संयम पूर्वक तल्लीन होतात. यामध्ये श्वास घेणे आणि सोडणे या प्रक्रियांवर जागरूक नियंत्रण ठेवले जाते. क्रियायोगाच्या व्याख्येमध्ये या श्लोकाचा अर्थ थोडक्यात असा आहे की, ‘प्राणाची अपानामध्ये आणि अपानाची प्राणामध्ये आहुती देणे’, हा प्राणायाम होय.
वंदनीय महान तपस्वी महर्षी पतंजली मुनी यांच्या अष्टांग योगातील (योगसूत्रे) प्राणायाम हे चौथे अंग आहे. (यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी)
‘यम’ या शब्दाचा अर्थ नियंत्रण किंवा नियम असा होतो आणि तो बव्हंशी आचरणासंदर्भात वापरला जातो. परंतु ‘प्राणायाम’ हा शब्द तयार करताना ‘प्राण’ सोबत ‘यम’ नव्हे, तर ‘आयाम’ हा शब्द जोडला गेला आहे. ‘आयाम’ या शब्दाचा अर्थ ‘विस्तार’ किंवा ‘प्रसार’ असा असून, तो ‘यम’ पेक्षा अधिक गहन आशय व्यक्त करतो.
त्यामुळे प्राणायाम म्हणजे प्राणशक्तीचा विस्तार किंवा प्रसार होय. प्राणायामाच्या विविध तंत्रांद्वारे (technique) ही जीवनशक्ती सक्रिय, संतुलित, संकलित आणि नियोजित करता येते. तसेच या साधनेद्वारे व्यक्ती आपल्या नेहमीच्या मर्यादांपलीकडे जाऊन ऊर्जेच्या अधिक सूक्ष्म आणि उच्च अवस्थेचा अनुभव घेऊ शकते. प्राणायामाचा अतिशय नियमबद्ध, शिस्तबद्ध अभ्यास साधकाने, निरंतरपणे केल्यास देहातीत व परात्पर ज्ञान प्राप्त होते.
प्राणायाम साधनेच्या अभ्यासामध्ये, यातील कोणताही अनुभव जर प्राप्त झाला नसता, तर ही सर्व माहिती केवळ ग्रंथोक्त माहिती म्हणूनच ज्ञात असली असती! प्राणायामाच्या माध्यमातून एक साधक म्हणून अतिशय गहिरे, परम समाधान देणारे, उपचारक ठरणारे अनुभव परमेश्वर कृपेने, मी घेतले आहेत. योग्य मार्गदर्शन घेतल्यास, व त्यांचे अनुसरण केल्यास, सर्वांना हे अनुभव, या अनुभूती नक्कीच प्राप्त होऊ शकतात.
प्राणायामाचे चार अविभाज्य घटक:
प्राणायामाच्या साधनेत श्वासोच्छवासाच्या, म्हणजेच श्वसनाच्या चार महत्त्वाच्या घटकांचा उपयोग केला जातो. ते पुढीलप्रमाणे आहेत —
- पूरक — श्वास आत घेणे.
- रेचक — श्वास बाहेर सोडणे.
- अंतःकुंभक — श्वास आत रोखून धरणे.
- बाह्यकुंभक — श्वास बाहेर रोखून ठेवणे.
प्राणायामाच्या विविध पद्धतींमध्ये या चारही घटकांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. याशिवाय, प्राणायामाचा एक विशेष प्रकार “केवल कुंभक” म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये श्वास आपोआप थांबतो. होय, आपोआप थांबतो! ही अवस्था प्राणायामाच्या उच्च टप्प्यात अनुभवास येते आणि ती प्रामुख्याने ध्यानासमान गाढ अवस्थेत प्रकट होते. या स्थितीत प्राणांचे आत बाहेर विहार करण्याचे, कार्य थांबते आणि नंतर अस्तित्वाच्या सूक्ष्म स्तरावरचे ज्ञान प्रकट होऊ लागते.
प्रश्नोपनिषद (प्रश्न 3, श्लोक 6)
श्लोक:
“एष हि प्राणः पंचधा आत्मानं प्रविभज्य एतद् शरीरम् अवष्टभ्य विधारयति।”
अर्थ: हीच प्राणशक्ती स्वतःला पाच भागांत विभागून संपूर्ण शरीराला आधार देते आणि त्याचे पोषण व संचालन करते. म्हणजेच शरीरातील सर्व क्रियांचा आधार हा पंचप्राणांवर आहे.
वास्तविक पाहता, प्राणायामामध्ये ‘कुंभक’ हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. एखाद्या प्रसिद्ध चित्रपटाचा ज्याप्रमाणे एक मुख्य अभिनेता असतो, ज्यामुळे त्या चित्रपटाला विशेष अर्थ मिळतो, अगदी तसाच कुंभकाचा रोल प्राणायामाच्या अभ्यासामध्ये अति महत्वपूर्ण आहे!
हो, परंतु हा कुंभक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी श्वसनक्रियेवर टप्प्याटप्प्याने नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात प्राणायामात श्वासोच्छ्वासावर अधिक भर दिला जातो. या अभ्यासांमुळे फुफ्फुसे सक्षम होतात, आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर, ‘फुफ्फुसे टफ बनतात.’ तसेच तंत्रिका तंत्र आणि प्राणिक प्रणाली संतुलित होते.
आता या वाक्याचा अर्थ बघूया : “तंत्रिका तंत्र आणि प्राणिक प्रणाली संतुलित होते” म्हणजे काय:
- तंत्रिका तंत्र (Nervous System) शांत आणि स्थिर होते. 👉 म्हणजे stress कमी होतो, mind calm होतं, body relax होते.
- प्राणिक प्रणाली (Energy System) balanced होते. 👉 म्हणजे body मधील energy flow (प्राणप्रवाह) smooth आणि व्यवस्थित चालतो. (अर्थ नीट कळण्यासाठी प्रचलित भाषेमध्ये लिहिले आहे.)
परिणामी, नाड्या शुद्ध व सक्रिय होऊन प्राणप्रवाह सुरळीत होतो आणि शरीरासह मनालाही स्थैर्य प्राप्त होते.
छांदोग्य उपनिषद:
मंत्र:
“प्राणो वा एष यः सर्वभूतैर्विभाति ।
प्राण एवेदं सर्वं वशे प्रतिष्ठितम् ॥”
अर्थ: प्राण हीच ती मूलभूत जीवनशक्ती आहे, जी सर्व जीवांमध्ये विविध रूपांनी प्रकट होते. संपूर्ण जगातील (सर्व प्राणीमात्रांमधील) सर्व क्रिया आणि त्यांचे अस्तित्व प्राणाच्या आधारे चालतात आणि त्याच्यावर अवलंबून असतात.
प्राणिक शरीर म्हणजे काय:
योगशास्त्रानुसार मानवी शरीर हे केवळ भौतिक शरीर नसून, ते पाच वेगवेगळ्या कोषांपासूनपासून बनलेले आहे. हे कोष मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांचे प्रतिनिधित्व करतात. ते पुढीलप्रमाणे आहेत —
- अन्नमय कोष
- मनोमय कोष
- प्राणमय कोष
- विज्ञानमय कोष
- आनंदमय कोष
जरी हे पाचही कोश एकत्रितपणे कार्य करून मानवी अस्तित्वाची एक संपूर्ण रचना घडवतात, तरी प्राणायामाच्या अभ्यासात मुख्यतः प्राणमय कोषावरच लक्ष केंद्रित केले जाते. हा प्राणमय कोष पाच प्रमुख प्राणांपासून बनलेला असून त्यांना एकत्रितपणे पंचप्राण असे म्हणतात — प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान.
यापैकी “प्राण” या संज्ञेचा येथे अर्थ संपूर्ण ब्रह्मांड व्यापणारी प्राणशक्ती असा नसून, तो प्राणमय कोषातील एक विशिष्ट भाग दर्शवतो. हा भाग कंठप्रदेश आणि मध्यपटल (डायफ्राम) यांच्या दरम्यानच्या क्षेत्राचे नियंत्रण करतो. हृदय, श्वसनक्रियेतील अवयव, तसेच त्यांना कार्यरत ठेवणाऱ्या स्नायू आणि तंत्रिका यांच्याशी याचा घनिष्ठ संबंध आहे. श्वास आत घेण्याची क्रिया घडवून आणणारी हीच ती मूलभूत ऊर्जा आहे.
अपान — नाभीच्या खालील प्रदेशात स्थित असलेला हा प्राण मोठे आतडे, मूत्रपिंड, मलाशय आणि मूत्राशय यांना ऊर्जा पुरवतो. शरीरातील अपशिष्ट पदार्थांच्या विसर्जनाशी याचा थेट संबंध आहे. श्वास बाहेर सोडण्याची क्रिया घडवून आणणारी शक्ती म्हणजेच अपान होय.
समान — हा प्राण हृदय आणि नाभी यांच्या मधल्या भागात कार्यरत असतो. पचनसंस्था, यकृत, आतडी, स्वादुपिंड आणि जठर यांना सक्रिय ठेवणे, तसेच त्यांच्या स्रावांचे नियंत्रण करणे ही याची प्रमुख कार्ये आहेत. समान हा रूपांतरण प्रक्रियेसाठी जबाबदार आहे. शारीरिक स्तरावर तो अन्नातील पोषक तत्त्वांचे पचन आणि वितरण नियंत्रित करतो, तर सूक्ष्म स्तरावर चेतनेचा विस्तार आणि कुंडलिनी शक्तीशी त्याचा संबंध मानला जातो.
उदान — हा प्राण मुख्यतः कंठाच्या वरच्या भागाचे नियंत्रण करतो. डोळे, जीभ, नाक आणि कान यांसारख्या ज्ञानेंद्रियांना सक्रिय ठेवण्याचे कार्य तो करतो. याशिवाय हात-पाय, त्यांचे स्नायू, तंत्रिका आणि सांधे यांमध्ये समन्वय निर्माण करून त्यांना कार्यक्षम बनवतो. शरीराची उभी स्थिती, इंद्रियांची सजगता आणि बाह्य जगाशी संवाद साधण्याची क्षमता यामध्ये उदानाची महत्त्वाची भूमिका असते.
व्यान — हा प्राण संपूर्ण शरीरात सर्वत्र पसरलेला असतो. शरीरातील सर्व क्रियांचा समन्वय राखणे, त्यांचे नियमन करणे आणि इतर प्राणांमध्ये संतुलन निर्माण करणे हे याचे कार्य आहे. तसेच, इतर प्राणांसाठी ऊर्जा साठवून ठेवण्याची भूमिकाही तो पार पाडतो.
प्रश्नोपनिषद (प्रश्न 3, श्लोक 5) :
श्लोक:
“प्राणोऽपानः समानोऽदानो व्यान इति एतत् सर्वं प्राण एव।”
अर्थ: प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान — हे सर्व स्वतंत्र नसून एकाच मूलभूत प्राणशक्तीची विविध रूपे आहेत. म्हणजेच शरीरात वेगवेगळ्या कार्यांसाठी प्राण पाच प्रकारांनी कार्य करतो, पण त्याचा स्रोत एकच आहे.
आपण पंचप्राणांची माहिती पाहिली. आता आपल्या शरीरात उपप्राण कोणकोणते आहेत ते पाहूया.:
मुख्य पंचप्राणांबरोबरच पाच लघु प्राणही कार्यरत असतात, ज्यांना उपप्राण म्हणतात. ते पुढीलप्रमाणे आहेत — नाग, कूर्म, क्रिकर, देवदत्त आणि धनंजय.
- नाग — ढेकर व उचकी यांसाठी जबाबदार
- कूर्म — डोळे उघडणे व पापण्या लवणे
- क्रिकर — भूक, तहान, शिंक व खोकला निर्माण करणे
- देवदत्त — जांभई व झोप आणणे
- धनंजय — मृत्यूनंतरही काही काळ कार्यरत राहून शरीराच्या विघटन प्रक्रियेशी संबंधित

प्राण आणि आपली जीवनशैली
प्राणमय कोष आणि त्यातील प्राणांवर जीवनशैलीचा मोठा परिणाम होत असतो. योग आसने, व्यायाम, दैनंदिन कामे, झोप, आहार आणि मैथुन क्रिया यांसारख्या शारीरिक क्रियाकलापांमुळे शरीरातील प्राणप्रवाह आणि त्याचे वितरण प्रभावित होते. तसेच मनातील भावना, विचार तरंग आणि इच्छाशक्ती व कल्पनाशक्ती यांचा प्राणिक शरीरावर अधिक सूक्ष्म आणि खोल परिणाम होतो. अनियमित दिनचर्या, अयोग्य व असंतुलित आहार आणि काही ना काही मानसिक ताण यांमुळे प्राणप्रवाह कमी होतो आणि त्यामध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता वाढते.
अथर्ववेद :
मंत्र:
“प्राणाय नमो यस्य सर्वमिदं वशे ।
यो भूतः सर्वस्येश्वरो यस्मिन् सर्वं प्रतिष्ठितम् ॥”
अर्थ: त्या प्राणशक्तीस नमस्कार, ज्याच्या अधीन संपूर्ण अमर्याद चैतन्य सृष्टी कार्यरत आहे. सर्व जीवांचे अस्तित्व आणि त्यांचे कार्य या प्राणावर अवलंबून आहे. तोच सर्वांचा अधिष्ठाता असून, सर्व काही त्याच्यामध्येच स्थिर आहे.
मी “प्राणायाम” या माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर साधकाच्या भूमिकेतून, लिहिलेले अजून काही लेख इथे प्रसारित करणार आहे, ते आपण जरूर वाचावे. हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

Leave a Reply