
साप आणि धारदार करवत: रागावर नियंत्रणाचे महत्त्व
विचित्र घटना..
एकदा एक अजगर जातकुळीचा साप एका सुताराच्या दुकानात गेला. तिथे सरपटताना त्याचा एका धारदार करवतीला स्पर्श झाला आणि त्याला त्यामुळे थोडीशी इजा झाली. या वेदनेमुळे सापाला राग आला आणि त्याने करवतीला रागाने करकचून चावा घेतला. पण त्यामुळे त्याच्या तोंडाला अजूनच इजा झाली.
रागातून झालेली चूक:
त्या सापाला वाटलं की, करवत हा आपला एक शत्रु असून, त्याच्यावर हल्ला करत आहे. रागाने त्याने करवतीभोवती वेटोळं मारलं आणि त्याच्या शरीराने घट्ट पकड घेतली, तिला घट्ट आवळून ठार करण्याचा प्रयत्न सापाने केला. परंतु, करवतीच्या अणकुचीदार धारांनी सापाला गंभीर दुखापत झाली, आणि शेवटी तो मरण पावला.
या गोष्टीतून शिकवण:
1. आपल्याला दाटून आलेला राग आपल्यालाच त्रास देतो: रागाने प्रतिक्रिया दिल्याने अजिबात परिस्थिती सुधारत नसते; उलट आपलंच नुकसान होतं.
2. कोणताही निर्णय सावधगिरीने घ्या: प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे, आवश्यक असते का? नाही. अजिबात नाही. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते.
3. स्वतःचे होणारे नुकसान टाळा: भावना अनियंत्रित ठेवून घेतलेले चुकीचे निर्णय आपल्यासाठीच हानिकारक ठरतात. अनुभव घेतला असेलच !
4. शांतता आणि संयमाचे महत्त्व: परिस्थितीला समजून घेतल्याशिवाय कृती करणे टाळलेलंच बरं.

जीवनातील उपयोग:
1. वादविवादात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहा. आताच्या आधुनिक भाषेत चिल पिल घ्या ! (chill pill : थंड राहण्याची गोळी)
2. प्रक्षोभक प्रतिक्रिया देणे, आवश्यक आहे का, हा विचार करा.
3. छोट्या – छोट्या गोष्टींना मनावर न घेता त्यांना दुर्लक्ष करा. म्हणजे मनाला लावून घेऊ नका.
सारांश
या सापाच्या कथेने आपल्याला दाखवलं की, काहीवेळा शांत राहणेच सर्वात चांगला पर्याय असतो. रागाने घेतलेले निर्णय आपल्याच अडचणी वाढवतात. संयम आणि समजूतदारपणा दाखवा, कारण काही परिणाम कायमचे घातक आणि गंभीर असू शकतात. निस्तरताना नाकीनऊ येतात.
आता आपण स्टेप बाय स्टेप पाहुया की या घटनेतून बोध घेऊन, रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायकाय करता येईल. काही जुने व काही नवे पॉइंट्स रिवाईज करुया:
- श्वासावर लक्ष केंद्रित करा: राग आल्यावर शांत बसून प्रदीर्घ आणि खोल श्वास घ्या. यामुळे मन शांत होते.
- थोडा वेळ थांबा: कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी स्वतःला थोडा वेळ द्या. 10-15 सेकंदांचा विराम (पॉझ) राग कमी करु शकतो.
- परिस्थिती समजून घ्या: रागाच्या मूळ कारणांवर विचार करा. कधी कधी कारण लहान असतं, पण आपण त्याला मोठं करत असतो.
- शब्दांची निवड सांभाळा, जरा चेक करा: रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलू नका. यामुळे त्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात.
- दृष्टिकोन बदला: गोष्टींना दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा राग कमी होईल.
- मनःशांतीसाठी ध्यान म्हणजे मेडिटेशन करा: ध्यान, योग, किंवा प्राणायाम / अन्य ब्रिदींग एक्सरसाईजेस यांचा सराव करा. त्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन फायदा होईल.
- दुसऱ्या गोष्टींवर लक्ष वळवा: राग आल्यावर आवडत्या कामांमध्ये मन गुंतवा, जसे की संगीत ऐकणे, वाचन करणे, किंवा फिरायला जाणे, इत्यादी.
- माफ करायला शिका: मनात राग ठेवण्याऐवजी लोकांना माफ करा. हे तुमच्यासाठीच लाभदायक आहे.
- स्वतःला प्रश्न विचारा: “मी रागावून काय मिळवणार आहे बरं?” हा प्रश्न स्वतःला विचारा. बहुतेक वेळा उत्तर असेल – “काहीच नाही.”
- व्यवस्थित संवाद साधा: रागावर नियंत्रण ठेवून मुद्देसूद आणि शांतपणे आपलं मत व्यक्त करा.
- शारीरिक हालचाल करा: राग आल्यावर चालणे, धावणे किंवा एखादा हलका व्यायामप्रकार (वॉर्म अप एक्सरसाईजेस) करा. यामुळे तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळेल.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा: रागाच्या परिस्थितीतून शिकण्याचा प्रयत्न करा. राग नियंत्रित ठेवणं, जमायला लागलं तर तुम्ही अधिक मजबूत आणि परिपक्व बनत असता, हे लक्षात असु द्या.

हे पॉइंट्स अनुसरुन तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकता आणि जीवन अधिक शांत व समाधानकारक बनवू शकता.
Leave a Reply