अर्थात, “गुरु तत्त्व हे अखंड, अविरत, अविनाशी तत्त्व आहे. ते आपण कधीही अंतःस्थामधून विलग करू शकत नाही.”
“स य एषोऽणिमैतदात्म्यमिद सर्वं तत्सत्य स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो इति भूय एव मा भगवान्विज्ञापयत्विति तथा सोम्येति होवाच॥” “छांदोग्य उपनिषद” 6.8.7 – सर्वात प्रसिद्ध मंत्र अर्थ: “हे जे सूक्ष्म स्वरूप आहे, त्यामध्येच या संपूर्ण सृष्टीचे आत्मस्वरूप सामावलेले आहे.
“हेच खरे सत्य आहे. हेच खरे आत्मतत्त्व आहे. आणि हेच तू आहेस, श्वेतकेतु!”
श्वेतकेतु म्हणतो – “भगवन्, कृपया मला पुन्हा याबद्दल अधिक स्पष्टपणे समजावून सांगा.” तेव्हा वडील म्हणतात – “अवश्य, प्रिय श्वेतकेतु.”
उपसंहार: हा श्लोक गुरुशिष्य संवादाचा परमोच्च बिंदू आहे. शिष्य आपल्या अहंकारातून बाहेर येतो, आणि गुरु त्याला त्याचं ब्रह्मस्वरूप दर्शवतो. “तत्त्वमसि” हा वाक्यांश म्हणजे उपनिषदातील महावाक्यांपैकी एक, जो आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील अभेद दाखवतो.
“तत्त्वमसि श्वेतकेतो” : “हे श्वेतकेतु, तूच ते परम सत्य आहेस.”
🌷 गुरु शिष्याला सांगतो की, तूच आत्मा आहेस आणि तोच ब्रह्म आहे, आणि हा आत्मा प्रत्येक डोंगर, दऱ्या, पानंफुलं, नदी, पक्षी, प्राणी, वस्तू, सृष्टीमध्ये सर्वत्र आहे. ही शिकवण गुरुने अनेक दृष्टांतांद्वारे शिष्याला समजावली. म्हणजे – गुरु अज्ञानी शिष्याचा अहंकार तोडूनफोडून त्याला स्वात्मज्ञानाकडे नेत असतो.
आजवर अनेकदा जेव्हा मी गुरु या विषयावर लेखन केले आहे, तेव्हा सर्वसाधारणतः नेहमीच गुरु या तत्त्वाबाबत जास्त लेखन केलेले आहे. म्हणजेच देहधारी गुरु या विषयावर मी जास्त प्रकाश टाकलेला नव्हता. या विश्वामध्ये ज्या प्रत्यक्ष गुरु शिष्य जोड्या होऊन गेल्या, त्याबद्दल आज लेखन करावं असा मानस आहे. म्हणजेच या मनुष्य जीवनामध्ये ज्यांना अतिशय अद्वितीय असे गुरु लाभले आहेत, अशा गुरु शिष्यांच्या अनेक आदर्श जोड्यांबद्दल आज लिहायचे ठरवले. कारण या अशा आदर्श गुरु शिष्य जोड्या आहेत, त्यांच्याबद्दल जाणल्यावर गुरुतत्त्वाच्या कृपाभिलाषेची तृष्णा ज्यांच्या मध्ये तेवत आहे, त्यांना यांचे चरित्र मार्गदर्शक नक्कीच ठरू शकेल.
भारतीय संस्कृतीचा सर्वात तेजस्वी, प्रकाशमान पैलू म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र आणि सतत गहन, दृढ होत जाणाऱ्या आत्मिक नात्याची परंपरा. गुरु आणि शिष्य यांच्यातील गुरु-शिष्य संबंधाच्या या आध्यात्मिक माध्यमातून भारत एकेकाळी जगतगुरु (जगाचा शिक्षक) या पदावर पोहोचला. या परंपरेने उपनिषदांना जन्म दिला.
उपनिषद या शब्दाचा अर्थ सानिध्यात बसणे आणि श्रवण करणे – (ग्रहण) आत्मसात करणे असा होतो. एका जिज्ञासू शिष्याने आपल्या आध्यात्मिक गुरुच्या शिकवणी आणि अनुभव लक्षपूर्वक ऐकले, त्यांना आत्मसात केले आणि नंतर ‘उपनिषद’ नावाच्या अद्वितीय शास्त्रांच्या स्वरूपात त्यांना पद्धतशीरपणे साठवून विश्वासमोर प्रसारित केले.
पंचाग्नि विद्यांचे वर्णन ‘कठोपनिषदा’त यम आणि नचिकेत यांच्यातील संवादाच्या स्वरूपात केले आहे. यम- नचिकेत हे गुरु-शिष्य परंपरेचे एक उत्तम अद्वितीय उदाहरण आहे. वैयक्तिक आत्म्यांच्या व्यर्थतेला लपवून ठेवणाऱ्या, अज्ञानाच्या अपारदर्शक (स्थूल) थरांना दूर करणाऱ्या या दिव्यातिदिव्य परंपरेचे एक उदाहरण वरील, अरुणी- श्वेतकेतुच्या माध्यमातून मांडले गेले आहे. जीवन विद्या (जीवनाची कला, कौशल्य) “तत्वमसि श्वेतकेतु” (हे श्वेतकेतु! तुम्ही स्वतः त्या परमात्म्याच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात बनलेले आहात) अशी व्याख्या केली जाते.
दरवर्षी गुरुपौर्णिमा पर्वाला आपण या प्राचीन परंपरेच्या आदर्शांना समर्पित करण्याचा संकल्प करतो. कारण त्यामुळे भारतीय आध्यात्मिक शोधाचे अनुभूतीयुक्त सार जिवंत राहिले आहे – दोन आत्म्यांमधील पवित्र संबंध (एक ज्ञानी आणि दुसरा ज्ञानप्राप्तीचा शोध घेणारा) आणि जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्याचा मार्ग स्पष्ट आहे. जर आपण गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमेच्या या पवित्र संदर्भात खोलवर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की आपण हे पर्व आपल्या श्रद्धा आणि भक्तीला परिष्कृत करण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी म्हणून आणि गुरुसत्ताचे आशीर्वाद मिळविण्याचा एक प्रसंग म्हणून, प्राचीन काळापासून वारसा रूपाने साजरा करत असतो.
मी आधी सुद्धा या विषयावर जेव्हा लेख लिहिले आहे, तेव्हा मी आवर्जून म्हटले आहे की गुरु म्हणजे एका देहामध्ये बंदिस्त असलेला पुण्यात्मा अशी व इतकीच गुरुंची व्याख्या नक्कीच नाहीय. तर गुरु हे तत्व स्वरूप आहे. मूळ स्वरूप आहे. “गुरु हे सतत मार्ग दाखवणारे अविनाशी तत्व आहे.” किंबहुना समस्त सृष्टीमध्ये जिथे गुरु नाही, अशी जागाच दाखवणं कठीण आहे. काहींना हे विधान धाडसी वाटेल; तरीही हे असंच आहे, यामध्ये ‘स्वानुभूती’ची अभिव्यक्ती आहे. हे निश्चितच मी फक्त एखाद्या देहधारी गुरु बद्दल बोलत नाहीय. तर गुरु या मार्गदर्शक तत्वाबद्दल बोलत आहे. “गुकारस्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज उच्यते । अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते ॥ “अर्थात – ” ‘गु’कार का तात्पर्य अंधकार, और ‘रु’कार का तात्पर्य तेज से है । जो अंधकार का (ज्ञान का प्रकाश देकर) निरोध करता है, वही गुरु कहा जाता है ।”
समाजामध्ये गुरु या विषयांतर्गत वेगवेगळे प्रवाह (cult) निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये काही अंशी समाजाची दिशाभूल करणारे आणि प्रामाणिकपणे गुरुशिष्य परंपरेसोबत न राहता, केवळ स्वतःचीच महती विश्वात पसरवण्याचा अतोनात प्रयत्न करणारे प्रसिद्धीलोलुप शिक्षक सुद्धा आहेत. होय, त्यांना गुरु हे संबोधन योग्य ठरणार नाही. त्यांच्या आतमधील गुरुरुपी दिव्यामध्ये वातच नसते; तर प्रकाश ज्योती तरी कुठून येणार? त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचलेला अंधारात मार्ग शोधणारा शिष्य, प्रकाश गंगेपर्यंत पोहोचतच नाही. असो. आपल्या चर्चेचा विषय तो नाही.
संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका (ज्ञानेश्वरी ग्रंथ) या आदरणीय भगवद्गीतेवरील त्यांच्या मराठी भाषेतील ग्रंथात लिहिले आहे की, ज्याला गुरुचा आशीर्वाद मिळतो, तो व्यक्ती अन्य लोकांना सामान्य वाटू शकतो. परंतु तो भगवान शिवाच्या समतुल्य दर्जा प्राप्त करतो. आद्य शंकराचार्य यांनी गुरुची तुलना पारस (स्पर्श दगड) सोबत केली आहे, जो शिष्याला केवळ स्वतःच्या प्रतिमेत रूपांतरित करत नाही, तर त्याला इतकी आध्यात्मिक शक्ती देखील देतो की, तो स्वतःच पारस बनतो. जेव्हा असा शिष्य कच्च्या लोखंडासारख्या सामान्य व्यक्तीच्या संपर्कात येतो, तेव्हा तो सद्गुणी व्यक्ती (सोन्यासारखा मौल्यवान) बनतो. गुरु आणि शिष्य यांच्यातील संबंध हा खोलवर आध्यात्मिक मानला जातो. तो अत्यंत शुद्ध, समर्पणाने भरलेला आणि भक्तीत परम आहे. सर्वश्रेष्ठ आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म आणि परमातीपरम धागे जोडणारा हा गुरु शिष्य संबंध आहे.
ठाकूर श्री रामकृष्ण परमहंस, ज्यांना दैवी अवताराप्रमाणेच परम-श्रेष्ठ योगी, परम गुरु मानले जाते, ते अशाच एका ध्येयाने या पृथ्वीवर आले. त्यांना जीवनामध्ये अनेक लोक भेटले; त्यापैकी काही जिज्ञासू श्रोते होते किंवा गंभीर साधक होते; परंतु त्यांना फक्त काही मूठभर शिष्य व नरेंद्रनाथांमध्येच खरे उत्तम शिष्य गवसले. ठाकूर यांना नरेंद्रनाथ यांच्यात असलेली सुप्त आध्यात्मिक इच्छा आणि सूक्त ओढ दिसून आली. नवल म्हणजे, नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद जी गुरुंना भेटले, तेव्हा ते नास्तिक होते (त्यांच्या पाश्चिमात्य शिक्षणामुळे); म्हणजे जरी त्यांना तत्वज्ञानात खूप रस होता, तरीही हे असे होते. श्री रामकृष्ण परमहंस ठाकूर यांना जाणवले की, सप्तर्षींच्या (सात ऋषी) आत्म्यांपैकी एकाने एका विशिष्ट ध्येयाच्या पूर्ततेसाठी नरेंद्र म्हणून जन्म घेतला होता. आणि म्हणूनच, परमहंसांनी नरेंद्रला कुंभाराप्रमाणे घडवले. आणि स्वामी विवेकानंद हे संपूर्ण जगासाठी आदर्श गुरु व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक ज्योत बनले.
ते नंतर स्वामी विवेकानंद म्हणून जगप्रसिद्ध झाले आणि संपूर्ण जगात सनातन धर्माचे सार तसेच भारतातील अनुसरणीय दिव्य आध्यात्मिकता पसरवण्यात यशस्वी झाले. श्रीरामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद जी हे गुरु-शिष्य परंपरेचे एक उत्तम उदाहरण आहे. गेल्या कैक वर्षांपासून सत्याच्या लाखो साधकांसाठी मार्गदर्शक प्रकाश आणि प्रेरणास्त्रोत असलेल्या गुरु-शिष्य परंपरेच्या या अद्वितीय जोडीच्या जीवनाबद्दल आणि ध्येयाबद्दल भरपूर लेखन केले गेले आहे. यापुढेही होत राहील.
अशी शेकडो उदाहरणे आहेत. परंतु त्यापैकी काहींची नावे उल्लेखनीय आहेत. ती म्हणजे जनार्दन पंतांचे शिष्य संत एकनाथ; त्यांचेच मोठे बंधू निवृत्तिनाथ यांचे शिष्य संत ज्ञानेश्वर; (अर्थात तिन्ही भावंडांनी श्री निवृत्तीनाथ यांच्याकडून गुरु दीक्षा घेतली होती.) गोविंदपाद यांचे शिष्य आद्य शंकराचार्य; कालूराम यांचे शिष्य किनाराम; भगीरथ स्वामींचे शिष्य तैलंग स्वामी; प्राणनाथ महाप्रभूंचे शिष्य छत्रसाल; समर्थ रामदासांचे शिष्य आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज; दादूंचे शिष्य रज्जब, महर्षि पतंजली यांचे शिष्य पुष्यमित्र; स्वामी विशुद्धानंदजी यांचे शिष्य गोपीनाथ कविराज; इत्यादी. आपल्या दैवी संस्कृतीत, ‘श्रद्धेचे’ तार्किकदृष्ट्या स्पष्टीकरण दिले आहे की, मनाला एकाग्र करण्याची आणि एकसंध सलग भक्तीने महानतेकडे वळवण्याची शक्ती आहे. या प्रक्रियेला मनाची एकात्मता असे म्हणता येते. या प्रक्रियेद्वारेच शिष्य स्वतःला पूर्णपणे गुरुंना समर्पित करतो आणि नंतर त्यांच्याशी एकरूप होतो.
गुरु शिष्य परंपरेतील अतिशय लक्षणीय व संपूर्ण विश्वावर जनता प्रभाव निर्माण झाला त्यामधील चार नावांचा विशेष उल्लेख व्हायलाच हवा. अमर अद्भुत सौरव स्वरूपातील करुणा सागर सद्गुरु श्री महावतार बाबाजी, त्यांचे शिष्य (सद्गुरु) श्री लाहिरी महाशय, लाहिरी महाशयांचे शिष्य सद्गुरु श्री युक्तेश्वर महाराज, आणि त्यांचे शिष्य श्री परमहंस योगानंद महाराज. इथे जर महावतार बाबाजी बद्दल सांगायला सुरुवात केली, तर हा लेख लवकर संपणारच नाही!! त्यामुळे इथे फक्त नामोल्लेख करत आहे. श्री महावतार बाबाजी हे पर्व, माझ्या आध्यात्मिक प्रवासातील भव्य दिव्य पर्व आहे.
प्राचीन इतिहासातील गुरु शिष्याची एक आदर्श लक्षणीय जोडी म्हणजे, अर्जुन व श्रीकृष्णाची जोडी. धन्य तो सद्गुरु श्रीकृष्ण आणि धन्य तो समर्पित शिष्य अर्जुन! भगवान श्रीकृष्णांनी गीतेत (८-१२) हे वर्णन केले आहे: “मयेव मन अधात्स्वा मयी बुद्धिम निवेशय! निवासिष्यसि मयेव, अत उर्ध्वं न संशयह!!” अर्थ: हे अर्जुना! तू तुझे मन आणि बुद्धी माझ्यावर केंद्रित कर. त्यानंतर तू फक्त माझ्यातच राहशील. यात काही शंका नाही. गुरूकडून कधी कधी तिरस्कार आणि प्रताडनाही मिळते. अनेक वेळा शिष्यभावाने गुरुच्या दारी येणाऱ्या साधकाला गुरु स्वीकारत नाहीत. अशी इतिहासात काही उदाहरणं आहेत. जसे द्रोणाचार्यांनी एकलव्याला धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिला. पण एकलव्याने द्रोणाचार्यांची प्रतिमा तयार केली आणि त्याद्वारे स्वतःतील अनेक सुप्त क्षमतेचे आवाहन करून, गुरुच्या संकल्पाच्या मर्यादेवर मात करत, अर्जुनापेक्षाही मोठी सिद्धी प्राप्त केली. होय, एकलव्याची धनुर्विद्या ही एखाद्या उच्चस्तरीय सिद्धी प्रमाणेच दैदिप्यमान होती.
उपनिषदांमध्ये आरुणि, श्वेतकेतु, सत्यकाम इत्यादी ऋषिकुमार शिष्यांचे उल्लेख आढळतात. या शिष्यांना गुरुने कधी समोर बसवून प्रत्यक्ष विद्या शिकवली नाही, की तपश्चर्या व साधनाही करून घेतली नाही. तरीसुद्धा व्यवहारात गुरुच्या उपेक्षेचा अनुभव येत असतानाही, या शिष्यांच्या मुखावर ब्रह्मतेजाचे तेजस्वी तेज झळकत होते.
कबीर यांचा प्रसंग तर इतिहासातसुद्धा प्रसिद्ध आहे. स्वामी रामानंद यांनी त्यांना मंत्रदीक्षा देण्यास नकार दिला होता. मग कबीर यांनी योजना रचून काशीच्या घाटावर गुरुच्या पायांखाली येण्याची संधी घेतली. गुरुंनी जेव्हा कोणाच्या पायावर पाय पडला हे जाणले, तेव्हा त्यांच्या तोंडून ‘राम! राम!’ असा उच्चार झाला. कबीर यांनी हाच मंत्र गुरुमंत्र मानला. आणि राम नामाचा जप करत निर्गुण ब्रह्माच्या अनुभूतीच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोचले.
यामध्ये ही जी उदाहरणं मी लिहिलेली आहेत, ते सर्व महान गुरु शिष्य होऊन गेलेले आहेत. पिढ्यानुपिढ्या ज्यांचा पुरस्कार जग करत आहे, अशा महान गुरु शिष्यांची ही उदाहरणे आहेत. त्यामुळे तुम्ही वर उल्लेखलेल्या उदाहरणांमधील गुरुने प्रत्यक्ष न शिकवण किंवा गुरुने नकार दिल्यानंतर सुद्धा शिष्याने शिकणं याला कोणत्याही नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नका. तर सकारात्मक पवित्र नजरेतून या गुरु शिष्यांना पहा. कारण हे शिष्यांचे प्रशिक्षण अशा पद्धतीने घडवून आणण्यामध्ये काळाचे सुद्धा काही विशेष समीकरण असते.
आता पुन्हा मी ‘तत्व स्वरूपातल्या गुरु’ बद्दल सांगते. गुरु हे आपल्या अंतस्थातच विद्यमान असतात. तुम्ही ना, या अंतःस्थित सद्गुरुच्या चरणी शरण जा आणि सर्वस्व समर्पण करा. जेव्हा खरे व खोल समर्पण होते, तेव्हा अंतर्मनात खोल निद्रिस्त असलेले बीज प्रस्फुटीत होते आणि त्यात लपलेले आत्मतत्त्व प्रकट होऊ लागते. आणि हे जे बाहेर ‘गुरु रूपात मार्गदर्शन करणारे स्वरूप’ दिसते, ते आपल्या अंतःस्थित सद्गुरूचेच भवसागरात उमटलेले प्रतिबिंब असते.
परंतु, काही वेळा जगात अशा दिव्य विभूती येतात, ज्या काळाच्या आधीच साधकाच्या सुप्त शक्यता जागृत करतात. त्यांच्या ठिकाणी अशी क्षमता असते की, केवळ संकल्प किंवा स्पर्शानेच ते साधकाला अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचवू शकतात. ज्ञात इतिहासात अशा अद्भुत दीक्षा देणाऱ्या गुरूंमध्ये आदि शंकराचार्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी पद्मपाद, गोरक्ष, सुरेश्वर आणि हस्तामलक या शिष्यांचे केवळ संकल्पातूनच उद्धार केला.
नवल म्हणजे, जर या शिष्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने वाटचाल केली असती, तर त्यांना आठ ते बारा जन्म लागले असते. पण आदिशंकरांनी आपल्या अद्वितीय शक्तीने त्यांना कालाच्या आधीच परमतत्त्वात स्थिर केले. मात्र याच्या बदल्यात त्यांनी या विभूतींना धर्म व संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे कार्य सोपवले. सांगितले की, ही मुक्ती सहजासहजी मिळालेली नाही – ही गुरुच्या कृपेची देणगी आहे आणि तिचे मूल्य चुकवावे लागेल – ते म्हणजे गुरुंचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे.”
गुरुतत्त्व हे सर्वोच्च आणि पवित्र असे तत्त्व आहे. हे तत्त्व वय, देश, काळ, जन्म मरण, पुनर्जन्म या सर्व सीमांच्या पलीकडे असलेले अविनाशी तत्त्व आहे. या तत्त्वाची अनुभूती केवळ विनम्र समर्पणानेच शक्य होते. अगदी संपूर्ण समर्पण! आपल्या अंतर्मनात स्थित या गुरुतत्त्वाशी घट्ट नाते जोडण्यासाठी, आपण अशा व्यक्तीचा शोध घेतो, जो आपल्या अंतर्गत गुरूचा प्रत्यक्ष प्रतिनिधी किंवा प्रतिबिंब असतो. याच उद्देशाने गुरु-शिष्य परंपरा आपल्या भारत देशाने युगानुयुगे जपली आणि संरक्षित केली आहे.
एक जीवंत गुरु म्हणजे शिष्याच्या आत असलेल्या गुरुतत्त्वाचे साक्षात मूर्तिमंत प्रतीक असतो.
हे श्रद्धेय गुरुतत्त्व प्रत्येक व्यक्तीच्या आत विद्यमान असते. त्याला ‘अंतःगुरु’ (आंतरात्म्यातील गुरु) असे म्हणतात. एक रोचक तथ्य म्हणजे, स्थूल शरीरामधील आज्ञा चक्र हे या गुरुतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते.
स्वतःच्या आत असलेल्या या अंतर्गुरुशी थेट तादात्म्य (एकरूपता) प्रस्थापित करणे, कोणत्याही बाह्य गुरुशिवाय करणे, हे अतिशय कठीण कार्य आहे. तरीही हा सुद्धा एक मार्ग आहे. केवळ जबरदस्त अलौकिक आत्मबलाने युक्त अशाच महान विभूती या मार्गाचे पथिक बनू शकतात. तुम्हीआम्ही सुद्धा निश्चितच बनू शकतो!
श्री अरविंद, रमण महर्षी हे असेच सिद्ध योगी होते – त्यांना कोणताही बाह्य गुरु नव्हता. त्यांच्या गुरूचे रूप म्हणजेच परमात्मा होते.
परंतु, सामान्य शिष्य किंवा साधकाला किंवा सर्वसामान्य माणसाला, या मायावी जगातून मुक्त होण्यासाठी, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आवश्यक असते. अशा साधकांसाठी प्रत्यक्ष गुरुचे अस्तित्व अत्यावश्यक ठरते.
म्हणूनच गुरुच्या भौतिक स्वरूपालाही संपूर्ण व अखंड मान्यता दिली जाते. गुरूचे स्थूल शरीर हे त्यांच्या जागृत, प्रबुद्ध चेतनेचे बाह्य आवरण समजले जाते.
सर्वात शेवटी उल्लेख करायलाच हवा, अशी गुरु शिष्याची जोडी म्हणजे हनुमंत व श्रीराम. गुरु सोबत वावरताना कसलाही किंतु परंतु नाही, मनात कसली शंका नाही, अशा निर्मळ मनाचा, आणि समर्पण या शब्दाची प्रत्यक्ष मूर्तीमंत व्याख्या असलेला, हनुमंत हा शिष्य आणि शिष्याच्या अस्तित्वाच्या कणाकणावर ओतप्रोत प्रेम ममता पाझरणारे प्रभु श्रीराम.
गुरु महिमा जाणून घ्यायचा आहे, तर स्कंद पुराणातील गुरु गीता वाचावी. हे गुरु गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवाने जगदंबे सोबत साधलेला संवाद आहे. यामध्ये शिवाने वर्णिलेली गुरुची महती अचंबित करणारी आहे. आपण जरूर गुरुगीता वाचावी. (श्री स्कंद पुराणातील ईश्वर पार्वती संवाद)
याच भारत भूमीतील, महान अशा नवनाथ परंपरेतील गुरु शिष्यांच्या अनेक दिव्य गोष्टी आपण वाचतो. सद्गुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्यापासून ही दिव्य नाथपंथी परंपरा सुरू झाली. सद्गुरु मच्छिंद्रनाथांप्रमाणेच, त्यांचे प्रथम शिष्य सद्गुरु श्री गोरक्षनाथ महाराज सुद्धा अद्वितीय अद्भुत व परम शक्तिशाली योगी आहेत. या दिव्य नवनाथ परंपरेला संपूर्ण विश्वामध्ये विशेष स्थान आणि महत्त्व आहे.
परमात्म्याच्या असिम कृपेमुळे म्हणा किंवा सद्गुरु तत्वाच्या करूनपूर्ण वर्षावामुळे म्हणा, माझ्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल, मी जेव्हा नवजात बालकाच्या चालीने चालायला सुरुवात केली, तेव्हा अनेक सत्य, दिव्य आध्यात्मिक सद्गुरु ज्योतींची साथ सोबत लाभली आणि कृतार्थता प्राप्त होत गेली. आजही मी त्या मार्गावरील बालक आहे! सद्गुरु या मार्गदर्शक तत्वाचे आभार शब्दांमध्ये मानता येणे, हे माझ्यासाठी खरंच खूप जिकिरीचे काम आहे. हा लेख लिहीत असताना, हृदयामध्ये अतिशय कृतकृत्य झाल्याचे भाव दाटून येत आहेत!
हा लेख वाचल्यानंतर आपणा सर्वांना जर तो मार्गदर्शक लेख वाटला, तर मला नक्कीच धन्य वाटेल. पण त्याहीपेक्षा या लेखाचे वर्णन मी करावे तर असे की, हा केवळ गुरु शिष्य समीकरणाची महती स्पष्ट करणारा लेख आहे. या पलीकडे यात कसलेही आवाहन नाही, समर्थन नाही, ज्ञान प्रदर्शन तर नाहीच नाही! फक्त आणि फक्त एक वर्णन आहे. माझा अंतरात्मा सांगतोय की, याला वर्णन काय म्हणतेस, प्रवास वर्णन म्हण! हो एकदम पटलं आपल्याला! हे प्रवास वर्णन आहे! सुज्ञास सांगणे न लगे!
ज्यांचा उल्लेख मी केला नाही तर माझ्यासहित हे सर्व लेखन अपूर्ण आहे, त्यांचा उल्लेख मी आता करत आहे. माझे गुरुतुल्य वडील श्री. जयप्रकाश पराडकर व माझ्याहून वयाने लहान असला तरी, अनेक ठिकाणी कधी दीपज्योती तर कधी दीपस्तंभ म्हणून माझ्यासाठी नेहमीच उभा राहणारा माझा लाडका भाऊ डॉ. श्री अमेय पराडकर (टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत) यांना मी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी सादर अभिवादन करत आहे. तसेच माझे नाथपंथी सद्गुरु यांना सुद्धा मी सादर अभिवादन करत आहे.
तर माझ्यासारख्या मूढमती आत्म्याचा उद्धार करणाऱ्या विश्वातील परमशक्तीशाली अशा सद्गुरु तत्वाला आणि माझ्या जीवनामधील, वेगवेगळ्या वळणावर, टप्प्यांवर, अगदी अलवारपणे प्रवेश केलेल्या, आणि उत्तर उत्तर मला आत्मिक बळ प्रदान करणाऱ्या अनेक सद्गुरु विभूतींना मी साष्टांग प्रणिपात करत आहे. तुम्हा सर्वांच्या आयुष्यातील गुरुतत्त्वाकडून, तुम्हा सर्वांचा जन्म जन्म उद्धार होऊ दे, अशी करुणामयी प्रार्थना परमात्म्याकडे मी करत आहे. गुरु: साक्षात परब्रम्ह। तस्मै श्री गुरवे नमः 🙏🏼
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.
Leave a Reply