What are The Extraordinary Benefits of “Kriya Yoga”?: 19 Advantages of Kriya Yoga | क्रिया योगामुळे काय काय फायदे होतात?

पहिल्या भागामध्ये क्रियायोग या विषयाला मी सुरुवात केलेलीच आहे. प्रस्तावनापर बरंच विश्लेषण पहिल्या भागात सुद्धा आहे. आता क्रियायोगा वरील पुढच्या भागाकडे जाण्यापूर्वी या आत्ताच्या भागामध्ये, क्रिया योगाचे सामान्य माणसाला फायदे काय, याबद्दल मी आधी थोडं लेखन करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मूळ विषयावर पुढे लेखन करणार आहे.

क्रियायोगा पासून सामान्य माणसामध्ये – साधक बनल्यावर व निष्ठा व समर्पणाने साधना सुरु ठेवल्यावर, पुढील चांगले बदल घडतात. त्यांना आपण क्रिया योगाचे फीचर्स व फायदे म्हणूया:

क्रिया योगामुळे सामान्य माणसाला होणारे फायदे:

1. सोपी योगसाधना

क्रिया योग हा एक साधा, सोपा, मानसिक व शारीरिक क्रिया असलेला, योगसाधनेचा प्रकार आहे.

2. अशुद्धी नष्ट होते

क्रिया योगाच्या नियमित साधनेमुळे मनुष्याच्या शरीराच्या रक्तातील सर्व अशुद्धी (ज्याला काही ठिकाणी कार्बन म्हटले आहे) बाहेर टाकल्या जातात आणि माणसाचे रक्त स्वच्छ, शुद्ध व प्राणवायुने भरुन जाते.

3. शरीर पुनरुज्जीवित होते

वरच्या पॉईंटमध्ये लिहिल्यानुसार क्रिया योग्याच्या शरीरामध्ये प्राणवायू भरपूर वाढला की, त्या प्राणवायूच्या कणांचं जीवनशक्ती मध्ये रूपांतर होतं. त्यामुळे शरीरातल्या म्हणजे मेंदू, कणा व कण्याजवळील वेगवेगळ्या केंद्रांचे पुनरुज्जीवन होते.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

4. शरीरातील दूषित द्रव्य नष्ट होतात

क्रिया योग नियमित केल्यामुळे शरीराची ‘काही ना काही दूषित द्रव्य साचवण्याची प्रवृत्ती’ कमी होत जाते व कधीकधी थांबते.

5. शरिराचे तारुण्य टिकून राहते

शरीरामध्ये पेशींचा रात्रंदिवस होणारा नाश, हा सातत्याने क्रियायोग करणाऱ्या योग्याच्या शरीरामध्ये जवळजवळ थांबत जातो. त्याची आजारपणं आटोक्यात येउ लागतात. यालाच आपण ‘तरुण अवस्था टिकणे’ असे म्हणतो.

6. संजीवनी योग

श्री भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णांनी क्रिया योगाबाबत अनेकदा उल्लेख केलेला आहे. त्या गीतेतील श्लोकाचा अर्थ असा आहे की, क्रियायोग करणारे योगी – क्रिया योगाच्या साधनेमधून प्राणवायूचे ~ अपान वायूमध्ये विसर्जन करतात आणि अपान वायूचे ~ प्राणवायू मध्ये विसर्जन करतात. त्यामुळे एक विशिष्ट संजीवनी देणारा प्राणायाम आपोआप सिद्ध होतो.

7. प्राणवायूमुळे पुनरुज्जीवन

साधक जेव्हा क्रिया योगामध्ये उत्तरोत्तर खूप चांगली प्रगती करत जातो, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये पुनरुज्जीवन सतत होत असते. त्यामुळे तो जो प्राणवायू नेहमी आत घेतो, तो प्राणवायू बराच काळ त्या साधकाला पुरेसा पडत असतो. त्यामुळे त्याच्याकडे या प्राणवायू सोबत असलेली जीवनशक्ती बराच काळ टिकून राहते.

8. साधक कूटस्थात लक्ष एकाग्र करू शकतो

क्रियायोगाबाबत गीतेमध्ये लिहिलेल्या दुसऱ्या एका श्लोकाचा अर्थ असा की, क्रियायोगामध्ये प्रवीण होत जाणारा साधक, परमोच्च ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष – स्वतःच्या अंतर्गत विश्वात, कूटस्थात व्यवस्थितपणे एकाग्र करू शकतो आणि अंतर्गत प्राणांवर त्याचे चांगले नियंत्रण येते.

9. वासना, क्रोध, आणि भीती यांची तीव्रता कमी होते

हा क्रिया योगात प्रवीण होत जाणारा साधक बाह्य दुनियेच्या आहारी जाऊन पूर्णपणे भरकटले जाणारे चित्त आणि त्याचबरोबर भरकटणारी बुद्धी या दोन्हीवर विजय प्राप्त करतो आणि त्यामुळे अशा रीतीने हा साधक स्वतःच्या मनामधून वासना, क्रोध, आणि भीती यांची तीव्रता कमी करत जातो.

10. ध्यानात ऐकू येणारा ‘ओम’

दिव्य योगशास्त्राचे अग्रेसर प्रणेते भगवान श्री पातंजली यांनी या क्रिया योगाबद्दल असा उल्लेख केलाय की, क्रियायोग म्हणजे यम, मनाचा संयम आणि ‘ओम’ या प्रणव मंत्रावरील उत्कृष्ट ध्यान होय. तसेच त्यांनी दुसरा उल्लेख असा केला आहे की, ध्यानात स्पष्टपणे ऐकू येणारा विराट शब्द म्हणजेच परमात्मा परमेश्वर होय. असा सृष्टीला व्यापलेला ओंकाराचा ध्वनी सुद्धा साधकाला जाणून लागतो. साधक त्यामुळे सदैव आनंदमयी अवस्थेत जात राहतो.

11. मुक्ततेची दिव्य अनुभूती

श्वास आणि उच्छवास यांचे प्रवाह मार्ग एकमेकांपासून अलग करून, आपोआप प्राणायाम सिद्ध होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या प्राणायामाच्या अभ्यासाने मुक्ती प्राप्त होते. येथे मुक्तीचा अर्थ ‘मुक्तता’ असा घ्यावा आणि ही मुक्तता पुस्तकांमध्ये वाचण्याची किंवा कुठेतरी ऐकण्याची गोष्ट नसून मुक्ती ही दिव्य अनुभूती आहे, हे जिज्ञासू वाचकांनी नीट समजून घ्यावे; नाहीतर अख्ख जग जे मुक्ती या शब्दाच्या कपोलकल्पित प्रभावाखाली जगत आहे, त्याचा तुम्ही उगाचच ताणयुक्त विचार करू लागाल!!

12. ‘सविकल्प व निर्विकल्प’ समाधी

परमात्म्याशी संवाद साधता येणे, कोणाला आवडणार नाही? आपल्यापैकी अनेकांच्या चित्तामध्ये ही भावना व ओढ असू शकते. सर्वसाधारणतः ध्यानधारणा या अभ्यासामध्ये, सविकल्प समाधी’ व ‘निर्विकल्प समाधी’ या दोन्ही अवस्थांबद्दल तुम्ही ऐकले अथवा अनुभवले असेलच. तर जेव्हा साधकाची सुरुवातीची ध्यानअवस्था असते, तेव्हा तो हळूहळू सविकल्प समाधीकडे वाटचाल करत जात असतो. सविकल्प म्हणजे परमेश्वराची जाणीव त्याला होत असते. तो स्वतः आणि सोबत परमेश्वर असा आनंद तो घेत असतो.
पुढे हा साधक, जसा आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगत होत जातो म्हणजेच नियमितपणे साधना मार्गामध्ये शिस्तीने पुढे पुढे जात राहतो, तसतशी त्याची वाटचाल निर्विकल्प समाधीकडे व्हायला सुरुवात होते. निर्विकल्प समाधीत जातो, याचा थोडक्यात अर्थ असा की, आधी जी साधकाला मी व तो परमेश्वर अशी सुंदर जाणीव होत असते, तीच जाणीव आता प्रगत व विकसित होऊन मी आणि परमेश्वर या मधला भेद म्हणजे फरक संपत जातो आणि मग परमेश्वर व त्याच्यात अंतरंग संवाद सुरू होतो आणि दोघांमधले अंतर संपत जाते. अद्वैताकडे वाटचाल सुरू होते.

13. चक्रांमधून प्राणशक्तीचे संचरण

क्रियायोग म्हणजे प्राणशक्तीचं मनुष्याच्या सहा चक्रांमधून होणारं संचरण – म्हणजेच प्राणशक्ती खालून वर जाणे आणि वरून खाली येणे हे होय.

14. क्रिया योगाचे ग्रंथोक्त महत्त्व

केवळ क्रिया योगाची महती आणि महत्त्व समजावं, म्हणून पुढे एक ग्रंथोक्त प्रमाण सांगत आहे. त्यात असे म्हटले आहे की, एक क्रिया – अर्ध्या मिनिटासाठी केली, तर तिची किंमत एका वर्षाच्या नैसर्गिक अध्यात्मिक प्रगती इतकी असते. नीट लक्ष द्या, इथे आपल्याला कोणतीच कॉम्पिटिशन लावायची नाही आहे! केवळ क्रिया योगाचे महत्त्व कळावे, म्हणून हे ग्रंथोक्त विश्लेषण इथे मी लिहिलेले आहे.

15. हजार क्रिया = हजार वर्षे

क्रिया योगा बाबत ग्रंथांमध्ये दिलेलं अजून एक प्रमाण पुन्हा एकदा क्रिया योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी सांगत आहे. ते म्हणजे दररोज साडेआठ तासात 1000 क्रिया करणाऱ्या योग्यास, एकाच दिवसांमध्ये तितकी प्रगती प्राप्त होते, जी मिळवण्यास सर्वसाधारण माणसाला 1000 वर्ष लागू शकतात. म्हणजे अगदी गणिती हिशोबानुसार विचार केला तर अशा क्रिया योग्याला एका वर्षात 3,65,000 इतक्या वर्षांची उत्क्रांती झाल्यासारखी अवस्था प्राप्त होते. याची अजून सुद्धा वेगवेगळी गणितं दिलेली आहेत. पण आता आपल्याला या प्राथमिक अभ्यासामध्ये त्यांची गरज नाही आहे. म्हणून इथे लिहीत नाही आहे.

16. प्राणशक्ती धारण करण्याची क्षमता

क्रिया योगामुळे आपल्या शरीरामध्ये, जी अतिशुद्ध प्राणशक्ती किंवा प्रकाशशक्ती निर्माण होत जाणार आहे, तिला उत्पन्न करणे हे जसे खूप महत्त्वाचे वाटत आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ती प्राणशक्ती धारण करण्याची यथोचित क्षमता स्वतःच्या आतमध्ये अभ्यासाने, शिस्तीने, नेमाने व सातत्याने निर्माण करणे.
तुम्ही काहीच काळजी करू नका. प्रत्यक्ष भगवंताने सुद्धा गीतेमध्ये जागोजागी सांगितले आहे की, जे आपल्यामध्ये नाहीय, ते निर्माण करावयाचे असेल तर नियमित अभ्यासाने निर्माण करता येते. नियमित अभ्यासाने चंचल मनाला लगामही घालता येतो.

17. क्रिया योग: शास्त्र

आता या सर्व माहिती मधील सर्वात शेवटचा व महत्त्वाचा भाग म्हणजे, क्रियायोग हा प्रत्येक माणसाने शिकायला काहीच हरकत नाही. कारण जे ज्ञानाचे प्रसारण मी पूर्वीच्या भागांमध्ये केले आहे, आणि या भागात व पुढील भागांमध्ये करणार आहे, ते सर्व पूर्णपणे, कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीला समजावे, अशा भाषेमध्ये लिहिले आहे.
यावरून क्रियायोग हे श्वास, प्राण आणि साधनेद्वारे करण्याचे, विविध नियोजन व नियमन करू शकणारे एक सायन्स आहे आणि हा क्रियायोग तुम्हा सर्वांच्या आयुष्याची मानसिक, शारीरिक, सामाजिक, व्यावहारिक, आध्यात्मिक इत्यादी सर्वच पातळीवर उत्तम प्रगती, तसेच अंतर्बाह्य शुद्धी साधणारा योग आहे.

18. श्रीयुक्तेश्वरांचे बोल…

‘क्रियायोग हे मानवाची उत्क्रांती जलद घडवून आणण्याचे एक चांगले साधन आहे’ हे महावतार बाबाजी परंपरेतील एक गुरु श्रीयुक्तेश्वर आपल्या शिष्यांना सांगत असत. हा क्रियायोग शिकत असताना तुम्ही एखाद्या लहान अर्भकाप्रमाणे पावलं टाकत, सातत्याने पुढे जरी जात राहिलात, तरी या वरील वाक्याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही.

19. क्रिया योगामुळे शरीराची झीज कमी होते

क्रिया योगाच्या अभ्यासाने तुमच्या शरीराची, शरीराच्या अंतर्गत अवयवांची प्रत्येक क्षणी होत असलेली झीज कमी व्हायला सुरुवात होते. एक साधं उदाहरण सांगते. शरीराचं वजन भरपूर वाढलं म्हणून आपण बरेच उपाय करतो. आपलं डाएट बदलतो. चालणे, धावणे, एक्सरसाइज सुरू करतो. उगीचच जास्त चरबी वाढवू शकतील, असे पदार्थ खाण्याचे टाळतो आणि सरतेशेवटी आपले वजन नियंत्रणात आणतो. म्हणजेच या प्रोसेसमध्ये शरीरामध्ये काहीतरी बिघाड निर्माण झाला म्हणून, शरीराला कसली तरी शिस्त लावून शरीर पुरवत केले जाऊ शकते. पण क्रिया योगाचे महत्त्व इतके अनन्यसाधारण आहे की, शरीर – मन – आत्मा – संपूर्णतः जीवन या सर्वांवर अतिशय उत्तम कार्य घडवून आणणे व एकंदरच उत्थान करणं, हे या एकट्या क्रियायोगामध्ये साध्य होत जातं.

हा क्रियायोग शिकण्यासाठी तुमच्यामध्ये काय पात्रता हवी:

तुम्ही काय किंवा मी काय आपण सर्वच परमात्म्याची ओढ असलेले संतान आहोत. क्रियायोग, प्राचीन दिव्य योग, अक्षरशः ज्याला हा योग शिकण्याची ओढ जाणवत आहे व आवश्यकताही समजून येत आहे, अशा कोणत्याही जिज्ञासू साधकाने शिकावा.

‘इदं न मम’ हे सर्व लेखन घडवून आणणे हे परमात्म्याचे काम आहे. मी अतिशय सर्वसाधारण साधक या भूमिकेतून हे सर्व लेखन आपल्यासमोर प्रसारित करत आहे. वाचून मला अभिप्राय कळवावा. आपले क्रियायोगाचे वर्ग काही काळात सुरु होतील. श्री महावतार बावांना शिरसाष्टांग प्रणाम असो.

विशेष सूचना : हा लेख copyrighted आहे. उल्लंघन करु नये. प्रोफाइलच्या नावासहित अशीच्या अशी पोस्ट म्हणजेच लिंक शेअर करु शकता.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

1 Trackback / Pingback

  1. Majestic Kriya Yoga of Mahavatar Babaji: Part 1 महावतार बाबाजी दिव्य क्रिया योग: भाग 1 - Dnyan Power

Leave a Reply

Your email address will not be published.


*