Mahavatar Babaji Majestic Kriya Yoga: Part 3 “Training” | अति प्राचीन दिव्य क्रिया योग: भाग तिसरा “चला क्रिया योग शिकुया”

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥15॥

गीता: 2.15

अर्थ: हे नरश्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख अथवा दुःख या दोन्हीमध्ये विचलित होत नाही आणि या दोन्ही परिस्थितींमध्ये स्थैर्य ठेवतो, स्थिर राहतो, त्या मनुष्याला शाश्वत आनंद आणि अमरत्व प्राप्त होते.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

गीतेतील हा श्लोक काय सांगत आहे बरं! गीतेमध्ये वर्णन केलेली मनुष्याची ही स्थिती म्हणजे नेमकी काय आहे बरं! शाश्वत आनंद आणि अमरत्व म्हणजे नक्की काय मग? म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यातील सर्व सुखं ‘ऑन’ आहेत आणि सर्व दुःख ‘ऑफ’ आहेत, असा त्याचा अर्थ आहे का आणि अमरत्व म्हणजे तो हजारो वर्ष जगणारा माणूस बनतो का मग??

असा शब्दशः अर्थ नक्कीच नाहीय. तर सुखदुःखामध्ये मनोवृत्ती स्थिर राहिली, म्हणजेच ती परमात्मायुक्त मनोवृत्ती असते. म्हणजेच ती वृत्ती स्वतः परमात्मा असते आणि हा आनंद, ही ‘परमात्म’ अवस्था, याला साधासुधा आनंद म्हणता येणार नाही. परमोच्च आनंद म्हणजेच हा परमानंद, शाश्वतच असणार नाही का! आणि अमरत्व म्हणजे तरी नेमकं काय?

प्रचलित भाषेत सांगायचं, तर एक निरोगी शरीर, निरोगी मन, हे दोन्हीही, अनंतकाळ तसंच उत्तम टिकून राहणं आणि आत्मा सतत प्रगतिशील राहणं, हेच अमरत्व नाही का!

असो. मूळ विषय आपण जरा उलगडत जात आहोत. परंतु भगवदगीते मध्ये (वरील श्लोकात) भगवंताने वर्णन केलेली ही शाश्वत आणि अमर माणसाची व्याख्या जर आपण निष्ठेने, नेमाने व समर्पणाने प्राप्त करू शकलो, तर!?

थोडक्यात भगवंताने केलेली ही व्याख्या म्हणजे फक्त गीतेतला एक उपदेशपर दिव्य श्लोक आहे, असं नाही आहे. आपण सर्वांनी याच जन्मात कितीही विपरीत परिस्थितींमध्ये आयुष्य घालवलेले असेल; अथवा संमिश्र परिस्थितीमध्ये घालवले असेल, तरी अजिबात उशिर झालेला नाही आहे. अजूनही या मनुष्य जन्माची उरलेली वेळ – उर्वरित आयुष्य, आपल्या हातामध्ये आहे. त्याचं संपूर्णतः कल्याण आता साधायची वेळ आली आहे. जिथे आहात तिथून सुरुवात करता येते.

समस्त सदगुरु तत्त्व व श्री महावतार बाबाजींच्या कृपेने क्रिया योगावर जो लेख मी लिहायला सुरुवात केली आहे, त्यातले हे पुढील पुष्प आहे. क्रियायोग हा विषय जास्तीत जास्त सोपा करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी वेळोवेळी करत आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष (अवधान) या लेखमालेतील प्रत्येक भाग व त्यातील प्रत्येक परिच्छेद वाचत असताना एकाग्र करावे.

जे समजणार नाही, ते एकदा, दोनदा, तीनदा वाचावे आणि ज्ञानग्रहण करावे. अगदी सायंटिफिक भाषेत सांगून सुद्धा, तसंतर एका प्रदीर्घ लेखात क्रिया योगाबाबत सर्व माहिती संपवता आली असती. पण असे केल्याने सर्वसामान्य व जिज्ञासू साधक या क्रिया योगाकडे कसा काय बरं वळणार? म्हणूनच सावकाशपणे, क्रियायोग हा काहीसा अवघड वाटणारा परंतु सर्व कल्याणकारी असलेला विषय मी हळूहळू उलगडत नेत आहे.

अति प्राचीन क्रिया योगाच्या वैश्विक पसारापुढे मी अतिशय सर्वसामान्य अल्पमतीमधून लेखन करणारी, मुंगीहुनही सूक्ष्म अशी व्यक्ती आहे. परमकृपाळू, संसारतारक, पुण्यात्मे, दिव्य महात्म्यांच्याच कृपेने हे लेखन घडणे शक्य आहे. तसेच आपणासारख्या गुणी जिज्ञासू वाचकांमुळे ही लेखणी लिखाणास प्रवृत्त झालेली आहे.

तर मग प्रिय वाचकहो, तुम्ही सर्वांनी आपली मनोभूमिका, अवघडलेल्या मितीमधून काढून घेऊन, सोप्या सरळ प्रांतामध्ये आणून ठेवावी आणि अगदी बिनधास्तपणे प्रत्येक शब्द व वाक्य स्वमनामध्ये ग्रहण करीत जावे, ही नम्र विनंती आहे.

‘निश्चलं ब्रम्ह उच्यते’ अर्थात चालु न शकणारी अवस्था म्हणजेच निश्चल, स्थिर अवस्था – हीच ब्रह्म आहे. या मर्त्य लोकांमध्ये आपण सर्व जे चंचल जिवात्मे आहोत, त्यामध्ये ही निश्चल व निशांत ब्रम्ह अवस्था कशी काय बरे शोधून सापडणार? ‘प्रकृती म्हणजेच चंचलता’ या वैश्विक सत्य अवस्थेमध्ये रममाण असलेली आपली जीवात्मा अवस्था स्थैर्य कधी आणि कसे बरे अनुभवणार?

हे सर्व अशक्य कोटीतील अंदाज वाटत असले, तरी याच मनुष्यजन्मामध्ये “क्रियायोग” या प्राचीन योगाद्वारे ही निश्चल चैतन्यपूर्ण परंतु धीरगंभीर व शांत असलेली महास्थिती, जी चीरविराजमान आहे, तिला आपण नक्कीच स्पर्श करू शकतो. अगदी पल्याड पार पुढेही जाता येते. गरज आहे, ती फक्त त्या परमोच्च ध्येयाला गाठण्याची आस, ओढ अंत:करणामध्ये निर्माण व्हायला हवी. तसेच फक्त शंभर टक्के नाही, तर कित्येक सहस्त्र टक्के “समर्पण” हवे.

गुणी जनहो, क्रियायोगाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या मला, क्रियायोग गवसला, तो परमपूज्य श्री महावतार बाबाजींच्याच कृपावंत नियोजनानुसार. हे सांगताक्षणीच मला त्यांचेच अलीकडच्या काळातील (मागचे शतक) एका शिष्यासोबत संभाषणातील शब्द आठवले, “बेटा, तुम कल्पवृक्ष के नीचे खडे हो।” आज श्री महावतार यांचा, विश्वामध्ये शिष्य, भक्त व अनुसरण करणार्‍यांचा अपरिमित सागर अथाह पसरलेला आहे. मग तुम्ही सर्वजण, त्यांनी सद्य दुनियेपर्यंत पोहोचवलेला क्रियायोग शिकायला हवा आहे ना?!

काय, कसं नि कोणत्या शब्दांमध्ये मी वर्णन करु हो, मी त्या दिव्य सुगंधाचं, जो सुगंध महावतार बाबाजींच्या आगमनाप्रसंगी विस्तारलेला असतो!! होय, हा त्यांचा असा विशिष्ट गंधच आहे!! दिव्य सुगंधाची दिव्य अमर अमृत कुपी! संयमाने आणि सातत्यपूर्ण पदरवांनी, आपण सर्वजण या दिव्य अनुभूती हळूहळू प्राप्त करु. बरोबर ना! श्री महावतार बाबांचं असीम प्रेम आणि साधनेतील शिस्त दोन्हींच्या अनुभूती, अनुभवलेल्या आहेत. हा आत्मा उपकृत झाला आहे व होत राहील. अतिशय नाट्यमयरीत्या माझ्या आयुष्यात, हा चैतन्यपूर्ण झंझावात जो प्रकट झाला, ही खरोखरंच माझ्यासारख्या अडाणी, मूढ साधकासाठी दिङ्मूढ (अचंबित) करणारी घटनाच होती.

पण ती एक घटना नव्हे; तर अशा अनेक घटनांची एक मालिका होती आणि उत्तमोत्तम ईश्वर भक्तांना कायम दंडवत घालणारी मी, त्या भक्तांची – कठोर परिश्रमाने भरलेली भगवद भक्ती पाहून, अर्भकाप्रमाणे प्रभावित होणारी मी, मला काय हो समजणार, की कशी भक्ती करायची?! तरीही ते, त्यांच्याच मर्जीने (नियोजनपूर्वक) या त्यांच्याच सर्वसाधारण बालिकेच्या आयुष्यात अवतरले व भक्तीचा मळा फुलवला!! खूपखूप आठवणी आहेत श्री महावतार बाबांच्या. आता सर्वच उलगडायचा आदेश मिळालाय!! दहा वर्षांनंतर!!

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक व्हिडिओज मध्ये एका छोट्या बिंदूपासून विस्तार होत गेलेलं पोटातील अर्भक, आपण सर्वांनी अनेकदा पाहिलंच असेल. प्राणांच्या प्रसारणाची विकासाची अवस्था – जीव ही आहे; तर संकोचाची साक्षी अवस्था – शिव ही आहे. म्हणून एका साधकाने काय करावं, सांगा बरं! तर अतिशय उचित मार्गदर्शनाखाली, नियमबद्ध साधनेद्वारे, निष्ठेने आणि नेमाने, अंतर्गत कार्यरत असलेल्या चंचलतेला (प्रकृतीला) नियंत्रित करावे आणि स्थिरता प्राप्त करण्याच्या आपल्या वाटचालीला सुरुवात करावी. तसेच सातत्यपूर्ण पावले टाकत पुढे जावे. बेबी स्टेप्स !! अर्भक पावलं!!

उपोद्घात : क्रियायोगाचा पूर्वेतिहास थोडा सांगते. हा दिव्य क्रियायोग श्री महावतार बाबाजींनी – योगीराज श्री शामाचरण लाहिरी महाशयांना प्रदान केला. लाहिरी महाशयांनी हा क्रियायोग – श्री युक्तेश्वर यांना दिला आणि श्री युक्तेश्वरांनी हा क्रियायोग – त्यांचा परम शिष्य – श्री परमहंस योगानंद यांना दिला. आपलं सर्वांचं अहोभाग्य आहे की, हा क्रियायोग आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे.

परमपूज्य योगीराज श्री शामाचरण लाहिरी यांच्या शब्दात सांगायचं झालं, तर योग साधना करण्यासाठी स्वस्थ मानव देह, म्हणजेच निरोगी शरीर आणि दृढ मनोबल म्हणजेच ‘शक्तिशाली मानसिक तयारीची’ व ‘धारणा शक्तीची’ आवश्यकता आहे. (तुम्ही अजिबात काळजी करू नका. धारणा शक्ती ही, आपल्या मनोनिग्रहाने आणि शिस्तबद्ध साधनेने निर्माण करता येते आणि वाढवताही येते.)

या दोन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, तो सहजपणे योग साधना करू शकतो. अगदी निर्विघ्नपणे योगसाधना करू शकतो आणि ज्यांना या मार्गाने पुढे जाण्याची इच्छा आहे, त्यांनी ‘मी किती पाप व पुण्य केले’ याचा विचार सोडून द्यावा. साधनेच्या ठायी, सर्व समान (इच्छुक उमेदवार!) आहेत. साधनेचा अधिकार प्रत्येकाला आहे. हो खरंच! अगदी प्रत्येक जीवाला आहे.

इतकं सारं वर्णन वाचल्यानंतर, अति प्राचीन क्रिया योगाबद्दल, अल्प प्रमाणात तरी उत्सुकता तुम्हा सर्वांच्या मनात उत्पन्न झालेली असेलच. क्रिया योगा वरील लेखमाला लिहित असताना, या विषयावर – अनेक महात्म्यांनी जे ज्ञान यापूर्वी प्रस्तुत केले आहे, त्या सर्वांना हृदयपूर्वक वंदन मी करत आहे आणि त्यांनी प्रसारित केलेल्या दिव्य ज्ञानाचा उपयोग, माहितीच्या स्वरूपात वाचकांपर्यंत, किंबहुना नवीन साधकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझ्या या लेखमालेमध्ये करत आहे.

त्यामुळे क्रिया योगा बद्दल यापूर्वी जे काही लेखन झालेले आहे, त्या सर्व महान विभूतींना मी साष्टांग अभिवादन करत आहे. आता आपण अगदी बालवाडी पासून समजून घ्यायला सुरुवात करूया. मी माझ्या सर्व अनुभूती, अनुभव प्रत्येक लेखात लिहितेच आहे.

वास्तविक क्रिया योग हा अति प्राचीन दिव्य योग आहे. आपल्या ज्ञानाच्या पलीकडे असलेल्या, प्राचीन काळापासून हा क्रियायोग पुढे पुढे येत राहून, आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तुम्हा सर्वांना नक्कीच आश्चर्य वाटत असेल की, इतक्या महान योगाचं नाव इतकं साधं कसं!? तर क्रियायोग चा अर्थ काय ते आपण पाहू.

विशेष सूचना : हा लेख copyrighted आहे. उल्लंघन करु नये. प्रोफाइलच्या नावासहित अशीच्या अशी पोस्ट म्हणजेच लिंक शेअर करु शकता.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

Be the first to comment

Leave a Reply