त्रिबंध: आयुष्याचा महाबंध | Tribandh: The Mahabandh of Life (Tribandh Pranayam)

“इंद्रियांचा स्वामी मन आहे मनावर प्राणच अंकुश लावू शकतो. त्यामुळे जर जितेंद्रिय म्हणायचं असेल तर प्राणांची साधना करणे, आवश्यक आहे.”

‘जाबाल दर्शनोपनिषद’ यामध्ये असे म्हटले आहे की, प्राणायामाने चित्ताची शुद्धी होते. चित्त शुद्ध झाले की, अनेक तर्क- वितर्क आणि जिज्ञासा यांचं शमन आणि समाधान आपोआप होते. ‘प्रश्नोपनिषद’ मध्ये म्हटलं आहे की, या शरीररुपी ब्रह्मपुरी मध्ये प्राण हा अनेक प्रकारचा अग्नी बनवून प्रज्वलित असतो.

प्राणाचे दर्शन कोणत्या रूपात व स्थानात होऊ शकते, यासंदर्भात ‘त्रिशिखोपनिषद’ मध्ये सांगितले आहे की, मुलाधार चक्रामध्ये निवास करणारी आत्मतेजरूपी अग्नि हीच आपली जीवनशक्ती आहे. हीच प्राणरूपी आकाशामध्ये प्रकाशमान असलेली ‘कुंडलिनी शक्ती’ आहे.

रुद्रयामल तंत्रामध्ये लिहिले आहे की, विजेच्या एखाद्या वेलीप्रमाणे तळपत असलेल्या सूर्यासमान ही अग्नीरूपी शक्ती, मुलाधार क्षेत्रातून वर चढताना आपल्याला दिसून येते.

आपल्यामध्ये स्थित असलेले प्राण तत्व म्हणजेच कॉस्मिक एनर्जी – दैवी तत्व आणि म्हणजेच प्रत्यक्ष जीवन ज्याला आपण म्हणतो, ते हे प्राण तत्व आहे; म्हणजेच ही अशी शक्ती आहे, जी आपल्या अंतर्गत भांडारामध्ये अजून अधिक वृद्धिंगत होऊ शकते आणि परमशक्तीमान बनू शकते.

या सर्व लिहिलेल्या गोष्टी प्राण या विषयाबद्दल आहे. हा प्राण आपल्या सर्वांच्या जिवित शरीरात स्थित आहे. या लेखात लिहिलेल्या गोष्टी, उगीचच बुद्धीच्या ऊहापोहामध्ये आणि लॉजिकल थिंकिंग मध्ये मिक्स करून फुकट घालवण्याच्या नाही आहेत, याची प्रथमतः नोंद घ्यावी. हे सर्व आपल्या अंतर्गत जीवनशक्ती व जाणिवेच्या पातळीवर घडणारे परिणाम अथवा संस्कार आहेत आणि जर तसे संस्कार किंवा परिणाम आपल्यामध्ये उपस्थित नसतील, तर ते आत्मसात करण्यासाठी बुद्धीचं बळ ताणून ताणून लावण्यात काहीच अर्थ नाही; उगीचच बौद्धिक ऊहापोहामध्ये या विषयांची ‘करोडो शकलं’ बनवली, तर आपण आपल्या “आत्म्याच्या ध्येयापर्यंत” कधीच पोहोचणार नाही. त्यामुळे इथे पूर्णपणे बुद्धीचा, प्रमाणाबाहेर इंटरफेअरन्स म्हणजेच हस्तक्षेप टाळूनच, हे वाचन पुन्हा पुन्हा करावे असा माझा मायेचा सल्ला आहे.

असो. आपण आता पुन्हा या विषयाकडे वळूया. आजचा जो विषय आहे, त्या विषयाचं नाव बंध आहे. परंतु त्या विषयापर्यंत पोहोचण्यासाठी थोडी पार्श्वभूमी समजणं गरजेचे आहे. जेणेकरून ‘बंध या विषयाचा कॉन्शसनेस’ आतमध्ये निर्माण होऊ शकेल.

प्राणायामाची माहिती दुसऱ्या लेखामध्ये मी देणारच आहे. या प्राणायामाच्या अभ्यासामध्ये बंध पूरक (सप्लिमेंटरी) ठरतात किंवा सहयोगी बनू शकतात.

आपण असं पाहतो की, काही योग आसनं करत असताना मुद्रा आणि बंध यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश केला जातो. पण बंध हा प्रकार स्वतंत्रपणे सुद्धा आपण करू शकतो आणि स्वतंत्रपणे केल्यास सुद्धा त्याचे फायदे होतात. ‘बंध’ हा शब्द जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा त्याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया.

बंध म्हणजे बंधन. म्हणजे एक प्रकारचं नियंत्रण हिंदीमध्ये रोकथाम. जसं प्राणायामामध्ये श्वसन प्रक्रियेवर काम करून प्राण्यावर नियमन आणलं जातं तसंच बंधांमध्ये सुद्धा श्वसनप्रक्रियेवरच काम केलं जातं. प्राणायामामध्ये आपण पाहतो की, श्वास आत घेणे (पूरक), (कुंभक) कोंडणे आणि (रेचक) बाहेर सोडणे. अशा क्रिया साधारणतः असतात. हे कुंभक म्हणजे सुद्धा बंधनच आहे. म्हणजे आत आलेला श्वास बंधनात अडकवून ठेवणे एका ठिकाणी लॉक लावून, बंद करून ठेवणे.

Disclaimer: आता पुढे आपण ‘बंधा’ बद्दल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट आवर्जून स्पष्ट करायची आहे.
विशेष सूचना : ती म्हणजे योगाशी संबंधित जे लेख मी लिहीत असते, त्या लेखांचा उद्देश तुमच्यामध्ये त्या विशिष्ट विषयाचा कॉन्शसनेस म्हणजे समज निर्माण होऊन त्या विषयाची जाणीव व आकलन तुम्हाला व्यवस्थित व्हावे असा असतो. तर या सर्व योग क्रिया स्वतः प्रॅक्टिस करताना, तुम्ही शिक्षकाचे मार्गदर्शन जरूर घ्यावे. ह्रदय विकार, तीव्र व्हर्टिगो, फुप्फुसांचा विकार, स्पॉन्डिलायसिस, बीपीचा त्रास, इत्यादींनी बंध करु नयेत.

ज्या त्रिबंधाबद्दल मी आता सांगणार आहे, त्या त्रिबंधांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1) मूलबंध 2) उड्डियान बंध 3) जालंधर बंध

पुढे मी प्रत्येक एका बंधाची विशेष माहिती सांगत आहे.

1. मूल बंध:

प्राणायाम करत असताना गुदद्वाराच्या छिद्राचे संकुचन करून वरच्या बाजूला खेचून धरणे आणि तशाच स्थितीत राहणे (टिकणे) याला मूलबंध म्हणतात.
जेव्हा आपण असा मूलबंध करतो, त्याला मूलबंध लावणे, असे म्हणतात आणि असं संकुचन केल्यानंतर अपान (पंचप्राणांपैकी) नावाचा जो प्राण आहे तो स्थिर राहतो.
तसेच वीर्याचा सतत वाढणारा प्रवाह काही काळ स्थिर होतो. प्राणाची खालच्या बाजुला जाणारी गती म्हणजे अधोगती थांबते आणि वरच्या बाजुला म्हणजेच उर्ध्वगती निर्माण व्हायला सुरुवात होते. मूलबंध लावल्यामुळे मुलाधारामध्ये निवास करणारी कुंडलिनी शक्ती हिच्यामध्ये चैतन्य निर्माण होते.

फक्त एकट्या मुलबंधाचे उपयोग:

 • मूलबंध नियमितपणे केल्यामुळे अपान वायू वर खूप चांगले नियंत्रण आपल्याला प्राप्त होते.
 • मूलबंध लावल्यामुळे पोटाचे विकार म्हणजेच पचनाचे विकार कमी होत जातात.
 • मूलबंधामुळे वीर्य रोग होत नाहीत.
 • मूलबंधामुळे लहान व मोठे आतडे बलवान होतात.
 • मलावरोधाचा त्रास असेल, तर तो कमी होतो.
 • शरीरांतर्गत जो रक्तसंचार सुरू असतो, त्याची गती मूलबंध लावल्याने अगदी व्यवस्थित व आदर्श बनते.
 • अपान व कुर्म या दोन्हींवर मूलबंधाचा प्रभाव पडतो. अपान व कूर्म यांचे इतस्ततः विखुरलेले जे तंतु असतात, त्यांचंही मूलबंध लावल्यामुळे एकत्रिकरण व्हायला सुरुवात होते.
 • मूलबंध करणार्‍या साधकाचे शरीर अतिशय सत्त्वगुणी, उत्तम व निरोगी बनते.
 • त्याला उच्च आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो.

2. जालंधर बंध :

आपलं डोकं पुढच्या दिशेला, पूर्णपणे खाली झुकवून आपली हनुवटी कंठकुपामध्ये लावणे / बसवणे, याला जालंधर बंध म्हणतात. आपल्या कंठाजवळ एक छोटासा खड्डा असतो, (कॉलर बोन्सच्या मध्यभागी) त्याला कंठकूप असं म्हणतात.

जालंधर बंध करताना सिद्धासनात बसावे. (खुर्चीतही करता येतो, पायाखाली कापड असु द्या.)
पाठीचा कणा व मस्तक सरळ रेषेत ताठ ठेवावे. दोन्ही तळवे गुडघ्यांवर ठेवावे. डोळे बंद करुन शरीर शिथिल करावे. आता सावकाश दीर्घ श्वास घ्यावा. श्वास उदरपोकळी आणि छातीमधे भरुन झाल्यावर रोखुन धरावा (आंतर् कुंभक). डोकं असं झुकवा की, हनुवटी घशाच्या खळग्यात (jugular notch – कंठकूप) रुतुन बसेल. खांदे किंचित पुढे झुकवा. याला जालंधर बंध लावणे म्हणतात. या अवस्थेत आपल्याला जमेल तितका वेळ रहावे, स्टंट नको!
बंध सोडताना हात कोपरात वाकवा, खांदे मागे न्या. डोकं पूर्ववत करा व कुंभकात धरलेला श्वास सोडा. श्वासाला डोळे मिटून पाहत बसा. या बंधाचा अभ्यास बाह्य कुंभकामध्येही करता येतो. (श्वास पूर्णपणे बाहेर थांबवून).

फक्त एकट्या जालंधर बंधाचे उपयोग :

 1. जालंधर बंधाचा प्रभाव आपल्या श्वासोच्छवासावर उत्तम रीतीने पडतो.
 2. जालंदर बंध लावल्यामुळे ज्ञानतंतू बलवान बनतात.
 3. हठयोगामध्ये सांगितलं आहे की, जालंदर बंध लावल्यामुळे 16 ठिकाणच्या नाड्यांवर प्रभाव पडतो. या नाड्या पुढील प्रमाणे आहेत.
  1 पादांगुष्ठ, 2 गुल्फ, 3 गुडघे, 4 जंघा, 5 शिवण, 6 लिंग, 7 नाभि, 8 हृदय, 9 ग्रीवा, 10 कण्ठ, 11 लंबिका, 12 नासिका, 13 भ्रू, 14 कपाल, 15 मूर्धा 16 ब्रह्म रंध्र, या सोळा स्थानांवर जालंदर बंध लावल्यामुळे खूप चांगला परिणाम होतो.
 4. तसेच आपल्याला विशुद्ध चक्र याची जागृती करायची असेल, तर जालंदर बंधाची खूप मदत होते. (विशुद्ध चक्र म्हणजे घशाच्या ठिकाणी असलेलं चक्र)5. जालंदर बंध याचा सराव सातत्याने केल्यामुळे, आपलं डोकं हृदय व मेंदूकडे जाणाऱ्या नाड्या यांचे आरोग्य सुधारते आणि रक्ताभिसरण सुद्धा उत्तम रीतीने व्हायला सुरुवात होते.

जालंधर बंध हा स्वयंसिद्ध आहे आणि जो साधक हा बंध सहा महिने साधेल तो सिद्ध होईल, यात शंका नाही. ‘घेरंडसंहिता’ व ‘हठयोगप्रदीपिका’ या दोन्ही ग्रंथांत जालंधर बंधाचे वर्णन, तसेच परिणाम कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत. यामुळे जरानाश होतो, या बंधाने हृदय व मन या दोघांनाही शांतता व समाधान मिळते. यामुळे साधकाचे आयुष्य वाढते.

3. उड्डियान बंध :

उड्डियान बंध पोटाला पूर्णपणे पाठीच्या दिशेने मागे खेचून धरणे, याला उड्डियान बंध असे म्हणतात. यामध्ये पोटाला वरच्या दिशेला आणि मागच्या दिशेला जास्तीत जास्त खेचून धरले जाते. म्हणजे जवळजवळ पाठीला पोट चिकटवणे, अशी अवस्था येऊ शकते. उड्डियान बंधाबाबत तर असं म्हटलं गेलेलं आहे की, मृत्यूवर विजय प्राप्त करणारा हा उड्डियान बंध आहे. याचा शाब्दिक अर्थ शोधत बसू नये. मृत्यूवर विजय म्हणजे जास्तीत जास्त काळ शरीर सुस्थितीत व निरोगी राहणे आणि आपल्या जीवनशक्तीला वाढवत नेऊन दीर्घायुष्य प्राप्त होणे, असे लाभ उड्डियान बंधामुळे आपल्याला प्राप्त होतात.

फक्त एकट्या उड्डियान बंधाचे उपयोग :

 1. आपल्या आतड्यांची निष्क्रियता या उड्डियान बंधामुळे दूर होते.
 2. आंत्रपुच्छ रोग, जलोदर, पांडुरोग, यकृताचे व किडनीचे सर्व रोग, पचनसंबंधी अवयवांचे सर्व रोग या सर्वांसाठी उड्डियान बंधाचा खूप उपयोग होतो.
 3. आपल्या नाभीमध्ये समान आणि कृकल नावाचे प्राण राहतात. त्यांना उड्डियान बंधामुळे स्थिरता प्राप्त होते.
 4. तसेच वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांची शुद्धी या बंधामुळे होत असते.
 5. उड्डियान बंधामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशा सुषुम्ना नाडीचे द्वार उघडे होते.
 6. स्वाधिष्ठान चक्रामध्ये चेतना आल्यामुळे, स्वाधिष्ठान चक्र अल्प प्रयत्नाने सुद्धा जागृत व्हायला सुरुवात होते. त्यामुळे स्वाधिष्ठान चक्र जागृतीचे होणारे फायदे आपल्याला सर्व स्तरावर प्राप्त होतात.

त्रिबंध

आता त्रिबंध कसे करावे ते पाहुया.
सिद्धासनात बसून आपण खालून क्रमाने – मूलबंध, उड्डियान बंध व जालंधर बंध लावले की या स्थितीला ‘त्रिबंध लावणे’ असे म्हणतात. 1. श्वास आत कोंडून (आंतर् कुंभक) व 2. श्वास बाहेर सोडलेला असताना (बाह्यकुंभक) – अशा दोन्ही परिस्थिती मध्ये आपण ‘त्रिबंध’ करु शकतो. कोणीकोणी याला ‘महाबंध’ पण म्हणतात.

त्रिबंध कसा करायचा :

पोटात अन्न नसताना त्रिबंध करा. सकाळी करा. सिद्धासनात बसा. डाव्या पायाची खोट स्वत:च्या शिवणीला घट्ट टेकवा (स्त्रियांमध्ये – जनन मार्ग व गुदद्वाराच्या मध्यभागी) आणि उजवा पाय (पाउल) या डाव्या पायावर ठेवा. (मांडीवर नाही) हे आसन जमलं नाही, तर नाराज होऊ नका. सुरुवातीस साधी मांडी (बैठक) घाला. मग मलद्वाराला आत संकुचन करुन धरा. तसंच ठेवा. हा झाला मूलबंध.
नंतर आपल्या नाभीच्या खालच्या व वरच्या भागाला संकुचित करुन आत खेचा. हा झाला उड्डियान बंध. (जमत नसेल तर, श्वास पूर्णपणे बाहेर काढा, मग हा बंध जमतो.
तिसरा बंध आहे जालंधर बंध. आपल्या घशाला संकुचित करा आणि डोकं पुढच्या दिशेला खाली वाकवून हनुवटी कंठकुपामध्ये बसवा. (कॉलर बोन्स जवळचा खड्डा)
हे सर्व करताना हात गुडघ्याच्या वाटीवर ठेवा. शरीर पुढे झुकलेलं ठेवा. जमेल तितका वेळ त्रिबंध स्थितीत राहावे. ही स्थिती तुम्हाला व्यवस्थित यावी, म्हणून प्रत्येक बंधाचा अलग अलग सराव करा. नक्की जमेल.

त्रिबंध प्राणायामाचे उपयोग :

 1. शारिरीक व्याधी कमी व नष्ट होत जातात.
 2. चार पाच महिने सतत त्रिबंध प्राणायाम करत राहिल्यामुळे शरीराची संपूर्णतः नाडीशुद्धी होत राहते.
 3. शरीराला स्थैर्य व दिव्यतेज प्राप्त होते.
 4. शारिरीक दौर्बल्य जाते.
 5. चक्र जागृतीची प्रक्रिया उजागर होते.
 6. सततच्या अभ्यासाने साधक चिरतरुण व अजर होतो.
 7. पोटातील अवयव मजबूत होतात. पचनशक्ती सुधारते.
 8. पाईल्स, मलावरोध वगैरे प्रॉब्लेम दूर होतात.
 9. घशाचे विकार हळूहळू बरे होतात. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते.
 10. चरबी घटते. ताजेतवाने वाटते.
 11. शरीरातील साचलेली विषदव्यं बाहेर पडायला सुरुवात होते.
 12. तीन पैकी प्रत्येक बंधाचे उपयोग या बंधाला मिळतातच.

मी स्वत: या बंधांचा प्रॅक्टिकल अभ्यास आपणहून स्पेशल इंटरेस्ट घेऊन अजिबात सुरु केला नव्हता. तर ध्यान अभ्यास करताना हे त्रिबंध एकत्रितपणे आपोआप लागु लागले आणि मला फार मौज वाटू लागली. बंधांचा अभ्यास आवडू लागला. ज्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत असते, त्याच विषयांवर माझं मॅक्झिमम लेखन लिहित असते.

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

Be the first to comment

Leave a Reply