आज ‘मालवणी भाषा दिवस’ असा!

स्थळ : कोकण, सूत्रधार : चाकरमानी अंकुश, जो नुकताच मुंबईत परतलाय, तोच ही कथा सांगी असा. वाचताना ध्यानात ठेवा, ही कथा अंकुश सांगता हा.

आये : ‘काय गो मंगला, कसलो आवाज असा ह्यो? भायेर बग जा, ती पोरा खय खेळतंत ती! खळ्याच्या डाव्या कोपर्‍याहारी जात असतील, तर चांगलंच करवाद त्येंका. ‘
सून मंगला: गे आये, कशाक करवादू रोजरोज. खेळांदे त्येंका.
आये : अगो जा बेगिन, उगिच माजा डोसक्या फिरवु नकोस.
मंगला : होय गे. जातंय जातंय.
मंगला भायेर गेली आणि पोरांका जोरात करवादली, ‘मेल्यांनो, तुमका कितीदा सांगुचा, थय कोपर्‍यार जाऊ नका म्हणून? थय जाऊचा नाय म्हंजे नाय.’
मंगलाचो अवतार बगून पोरं पांगली नि दुसरीकडे खेळूक गेली.

मंगला घरात ईली, झोपाळ्यावर बसली आणि पोटावर हात ठेवून, इचार करुक लागली. ती मनात इचार करत होती की, ‘माझ्या घोवाची आये सांगता, तसा खरंच कायतरी कोणी केल्यान असात की काय? किती दिवस अजून लागतले, पाळणो हलुक? काय खरा काय खोटा, कायव समजना नाय.’

तर त्याचा असा झाला की, खळ्याच्या डाव्या बाजूस एक बारको खड्डो होतो. थय दर दोनतीन दिवसांनी कोणीतरी निरनिराळया वस्तुंवर कधी हळद, कुंकू, गंध, शेंदूर, बुक्का यांची बोटं ओढून ती वस्तु खड्ड्यांवर टाकून जात असे.

आता या मंगलाच्या साशयेने, म्हणजेच माझ्या आयेने, असा समज करुन घेतलान की, माझ्या सुनेक प्वार होउ नये म्हणून कोणीतरी कायतरी रोज करु ठेवता हा. मंडळी, हसण्यासारा मॅटर असा, पण खरा असा. गजाल्या मारुक येणारो गावचो प्रत्येक जण, या कोपर्‍याची, वेगवेगळी स्टोरी सांगी. म्हातारी स्वत: पण लय घाबरली आणि सगळ्यांका सांगून ठेवल्यान की, थय कोणीव जाऊचा नाही. जो जाईत, त्याचा नशिबच फुटताला!

म्हातारेक म्हाइत होता, नाय नाय, म्हातारेक खात्रीच होती की, कोणीतरी हय जा काय ता करान टाकता, त्याच्यामुळेच आजतागैत घरात पाळणो हललेलो नाय हा. ती म्हणायची, ‘माझ्या झिलाचो चांगलो संसार, मेल्या कोनाक तरी बगवत न्हाय. म्हणून अशा क्रियाकरामती करुन ठेवतंत.’

तर मी असंय अंकुश; अशा रीतीन तुमका समाजलाच असात की, किती गंभीर मॅटर असा ह्या. म्हणून तर मी पण ठरवलंय की, ‘यात माका कायतरी करुचा लागातच. मी नक्की कायतरी करतंलंय’

तर या पोराटोरांच्या खेळण्याच्या घटनेक दहा दिवस होऊन गेले. म्हातारी रोज थय खळ्याचो डावो कोपरो बगी आणि सगळ्यांका सावध करी. थय त्या कोपर्‍यात सुद्धा रोजची व्हरायटी नवनविन असे!! कधी सोललेलो नारळ, तर कधी असोलो नारळ, तर कधी काकड्याबिकड्या. आणि ह्या मॅटर बर्‍याच काळापासून चालला होता. म्हातारी प्रत्येक देवस्थानाला जाऊन गार्‍हाणं घाली. एव्हाना गावात पण प्रत्येकाक ही गोष्ट माहित झालेली.

तर, म्हातारीच्या मते कोणीतरी काहीतरी करून ठेवता, म्हणून तिच्या सुनेक दिवस राहत नव्हते. ही म्हातारी म्हणजे माजी नी अरुण ची आये. मंगला ही अरुणची बायको नि माजी वहिनी.

एक दिवशी दुपारची वेळ.
गावातली दोन वयस्कर माणसा तीन-चार पोरांका पकडून म्हातारीच्या घराकडे जाऊन पोहोचली. भायेरूनच त्यांनी म्हातारीक साद घातल्यानी. “गे आये, आधी बाहेर ये बघू.”

काय झाला ता बगुक म्हातारी लगेचच बाहेर इली. त्या दोघा माणसांनी त्या पोरांच्या एक टकलेत मारली आणि बोलले, पटापट सांगायला सुरुवात करा, नायतर तंगडे तोडून हातात देतलंय.

नंतर समाजला ता असा की, ही पोरा, गावातल्या तीन चार ठिकाणी मुद्दाम हळद कुकू लावलेल्या वस्तु नेऊन टाकत असत.

ही मस्करी माका (अंकुशाक) केव्हाच लक्षात इली होती. पण पुरावो खयसून उबो करु? म्हणून मी मुंबई कडे निगण्यापूर्वी घराच्या खळ्याच्या साईडच्या कौलात सीसीटीव्ही कॅमरो बसवून ठेवलो होतो. त्यामुळेच या वात्रटांची सर्व नाटका, कॅमेर्‍यात रेकॉर्ड झाली आणि मी गावातल्या दोगांका कळवलंय.

आमची म्हातारी अवाक झाली!!!! पोरांका बडवु लागली. पोरं सर्वांची माफी मागुक लागली. त्यांनी भोकाड पसरल्यानी. शेवटी सर्वांका समाजला की, सर्व, या पोरांचेच हे प्रताप असत.

पण पुढे आये म्हणाली की, मी तर हय आता वेगळ्याच चिंतेत असंय. “माझी सून मंगला सकाळी देवळात जाऊक गेली हा, तिचो अजून पत्तो नाय हा. माका कायव समजना नाय काय करु ता.”

तितक्यात गावातल्या सुनंदासहित मंगला येऊन पोहोचली. तिका बगून म्हातारीचो जीव भांड्यात पडलो. सुनंदा म्हणाली की, “देवदर्शन झाल्यावर हिका चक्कर इली. मी तशीच तिका रिक्षात घातलंय नि हास्पिटलात घेउन गेलंय. तर आता गे मावशे, माका पेढे व्हयेत. तू आज्जी होतंलंस!!!”

मंगला लाजली नि घराच्या आत पळाली. मी म्हणजे अंकुश म्हातारेक फोन वर बोललो की, “गे आये, आतातरी डोसक्यातून ‘कोणीतरी कायतरी केल्यान हा’ हे खूळ कायमचा घालवून टाक बगु!!”

आये बोलली, “होय रे झिला, या सगळा धूमशान माका आता कळून चुकला. आता रवळनाथाक पेढे नेउन देतलंय आणि मंगलाची मॉप काळजी घेतलंय”

“तर मंडळी, मी अंकुश. ही माज्या गावातली कथा असा. कशी वाटली तुमका ही सत्यकथा, ता माका जरुर सांगा. आणि सुटीत गावाकडे जातालास ना?”

“होय म्हाराजा!!”

“माज्या स्वप्नातलो, ह्यो माजो कोकण गाव,
म्हणता माका नको सोडून जाव”

‘मालवणी भाषा दिवसा’च्या भरपूर शुभेच्छा ! 💐

– डॉ. सुनेत्रा जावकर
माझं माझ्या कोकणावर प्रचंड प्रेम आहे. गावातल्या मातीच्या प्रत्येक कणासोबत, दगडासोबत माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. ही मालवणी भाषेतील कथा मी माझ्या वडिलांना, म्हणजेच श्री. जयप्रकाश पराडकर यांना समर्पित करत आहे. तुमचा अभिप्राय नक्की कळवावा.

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

4 Comments

  1. कथा मालवणीत आहें आणि आज मालवणी भाषा दिन, ह्या निमित्ताने आपलं लेखिका म्हणून कौतुक आणि अभिनंदन. कारण आपली कर्मभूमी मुंबई -ठाणे -डोंबिवली असली तरी कोकणा बद्दल आवड, प्रेम, आंपलेपण आणि आदर आपण जपत आहात.
    एकतर कोकणाबद्दल ह्या बाबतीत खुप गैरसमज आहेत, कि कोकण गूढ विद्या, देव दिवस्की, भूत भुताटकी ह्यांनी परिपूर्ण आहें जितका कि कोकण नैसर्गिक दैवी देणगीने जितका समृद्ध आहें. आपली कथा खुप साधी, सरळ, मालवणी भाषेने समृद्ध, आणि खुप काही सांगून जाणारी,. आणिआपण कथा आपल्या आदरणीय वडिलांना समर्पित केली आहें, खुप छान मॅडम.
    माझं अख्ख आयुष्य कोकणात गेल, जन्म, बालपण, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन सर्व आयुष्य कोकणात गेल, पण मला कधीही असले अनुभव आलेले नाहीत, कानोपकानी अफवा, कथा भरपूर होत्या पण अनुभव कधी नाही. जनजागृती, भाषेवरील प्रेम, कोकणावरील आपलेपण आणि आदर ह्या बद्दल आपलं कौतुक करावं तितकं थोडंच.
    धन्यवाद.

    • विस्तृतपणे व वेळात वेळ काढून ही लघुकथा वाचून अभिप्राय लिहिल्याबद्दल आपले आभार. आपल्याला शक्य असल्यास या कथेची लिंक मित्रपरिवारामध्ये शेअर करु शकता. माझे वडिल उत्तम लेखक, कवी, संमोहन तज्ञ, गूढ विद्या अभ्यासक, वृत्तपत्र लेखक, इत्यादी होते. 🙏

      • मित्र परिवारामध्ये लिंक नक्कीच शेअर करेन. आपल्या वडिलांबद्दल वाचून खुप आनंद झाला आणि आदरही वाटला, उत्तम लेखक, कवी, संमोहन तज्ञ, गूढ विद्या अभ्यासक, आणि वृत्तपत्र लेखक होते….. आणि एक आणखी गुण त्यांच्यात आहें तो म्हणजे ते उत्कृष्ट… संस्कारक होते, कि आपलं ज्ञान, अनुभव त्यांनी पुढील पिढीला दिला….. ज्ञान, संस्कार, अनुभव, इतिहास आणि प्रथा ह्या वरीष्टानि पुढच्या पिढीला द्यायचे असतात….. ते त्यानी आपल्याला दिले म्हणून….. त्यांनाही धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*