एका गावामध्ये एक हिऱ्याचा व्यापारी आणि त्याचे कुटुंब राहत होते. अल्पशा आजाराने त्या व्यापाऱ्याचे अचानक निधन झाले. यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या मुलावर म्हणजेच सोनूवर पडली. तो बिचारा मिळतील ती कोणतीही कामे करत कसाबसा जगत होता, कुटुंबीयांना जगवत होता. पण त्याची मिळकत अतिशय क्षुल्लक असल्यामुळे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती.
एके दिवशी घरात साफसफाई करत असताना सोनूला कपाटात एक छोटीशी लाकडी पेटी दिसली. ती पेटी बाबांची आहे हे त्याला माहीत होते. त्याने उत्सुकतेने ती पेटी उघडली. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आत होता सुंदर चकाकणारा हिऱ्याचा किमती हार! त्याला वाटले, ‘आपण हा हार विकून आपली सध्याची परिस्थिती सुधारू शकतो आणि नवीन धंदा उभारू शकतो.’
जवळच्याच गावात त्याचे सख्खे काका राहायचे. ते त्याच्या वडिलांप्रमाणेच हिऱ्याचे व्यापारी होते. त्याने ठरवले की, काकांची भेट घेऊन त्यांना हा हार दाखवूया, मग ते स्वतः सांगतील याची खरी किंमत किती आहे.
सोनू दुसऱ्या दिवशी काखोटीला छोटीशी पिशवी घेऊन, त्यात हिऱ्यांचा हार काळजीपूर्वक ठेवून, काकांना भेटायला जाण्यासाठी निघाला. थोड्या वेळातच तो काकांच्या घरी पोहोचला. काकांनी त्याचे स्वागत केले आणि त्याला दुकानावर घेऊन गेले. गप्पा मारता मारता काकांनी सोनूला त्याच्या वडिलांच्या अनेक लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. बाबांच्या आठवणीने सोनूचे डोळे पाणावले होते.
थोड्यावेळाने सोनूने काकांना वडिलांच्या कपाटात सापडलेला हिऱ्याचा हार दाखवला आणि त्यांना उत्सुकतेने विचारले, “हा हार मला बाबांच्या कपाटात, एका लाकडी पेटीत सापडला. किती जुना असेल माहित नाही, पण अजूनही मस्त चमकतोय बघा. ह्या हाराला विकून जे पैसे येतील, त्यामधून मी एक धंदा सुरू करेन आणि उरलेली रक्कम माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी जमा करून ठेवेन. पण हा हार इतर कोणालाही दाखवण्याआधी मी मुद्दाम तुम्हाला दाखवायला आलो. मला माहित आहे, तुम्ही सुद्धा माझ्या बाबांसारखे हिऱ्यांचे उत्तम पारखी आहात. मग तुम्हाला काय वाटतं, हा हार खरा आहे ना?”
काका थोडा वेळ शांत झाले. त्यांनी तो हार हातात घेतला आणि त्यांना लगेच त्या हाराची किंमत कळली. ते सोनूला म्हणाले, “बाळा हा हार आता विकू नकोस, सध्या हिऱ्याच्या व्यापारात मंदी चालू आहे, याची खरी किंमत तुला आता मिळणार नाही. काही काही काळाने हा विकशील तेव्हा खूप चांगली किंमत तुला मिळेल.”
हे ऐकून सोनूला एकदम धक्काच बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे उत्सुकतेचे भाव निराशेत बदलू लागले. तेवढ्यात काका म्हणाले, “जर तुला नोकरीची सध्या गरज आहे, तर तू माझ्या दुकानात काम कर, घरच्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल आणि तू सुद्धा तुझ्या वडिलांसारखा हिऱ्यांचा उत्तम पारखी बनू शकतोस.”
सोनूने लगेचच होकार दिला. दुसऱ्या दिवशीपासून तो काकांसोबत त्यांच्या दुकानात जाऊ लागला. तिथे विविध हिऱ्यांच्या प्रकारांची त्याला ओळख झाली.
कालांतराने कोणता हिरा खरा आणि कोणता खोटा हे तो सहजरित्या सांगू शकेल इतका अनुभवी तो बनला होता. हळूहळू घरची परिस्थिती सुद्धा रुळावर येत होती. लहान बहिणीचे शिक्षण पूर्ण होऊन ती नोकरीची तयारी करू लागली, आईला शिवणकामाची हौस होती, म्हणून सोनुने तिला शिवणाचे मशीन घेऊन दिले. आता ती सुद्धा घरच्या उत्पन्नात हातभार लावण्यास यशस्वी झाली.
एकदा काकांच्या दुकानावर काम करताना त्याला वडिलांच्या पेटीतील हिऱ्यांचा हार आठवला. त्याने ठरवले, आता तरी हा हार विकूया, त्यातून जे पैसे येतील ते आपण आपल्या बहिणीच्या भविष्यासाठी जमवून ठेवू.
काम संपल्यावर तो घरी गेला. त्याने लगबगीने ती पेटी कपाटातून बाहेर काढली. अनेक वर्ष सरल्यामुळे त्या पेटीवर धुळीची पुटं चढली होती. त्याने जवळच असलेला फडका घेऊन ती पेटी साफ केली आणि उघडली. जसा त्याने तो हार हातात घेतला, त्याला कळले की, ‘हा हार तर खोटा आहे, छोट्यातला छोटा हिरे व्यापारी सुद्धा याकडे फिरकून बघणार नाही, याचे काहीच मूल्य नाही.’
ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.
सोनूने तो हर पुन्हा पेटीत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी काकांकडे घेऊन गेला. त्याने काकांना उद्विग्नतेने विचारले, “काका, हा हार मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणालात हा हार आता विकू नकोस, सध्या व्यापारात मंदी आहे, काही काळाने विक चांगला मोबदला मिळेल. पण हा हार तर खोटा आहे, याचा तर कोणीच मोबदला मला देणार नाही.”
काकांनी सोनूचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले, ते त्यावर म्हणाले, “अरे बाळा, हा हार पाहिल्या क्षणी मला कळलेलं की हा खोटा आहे. पण हे जर मी तेव्हा बोललो असतो, तर तुला वाटलं असतं की, मी हा हार गिळंकृत करण्यासाठी बोलत आहे. आता तू स्वतः हिऱ्यांचा उत्तम पारखी झाला आहेस. तुझ्याच अनुभवामुळे आज तुला कळलं की हा हार खोटा आहे ते. याच कारणासाठी मी तुला इथे कामावर नेमलं.”
काकांचे हे उद्गार ऐकून सोनूला अगदी गहिवरून आले. त्याने लगेचच काकांची माफी मागितली आणि आभारही मानले. जर काकांनी त्याचवेळी तो हार खोटा आहे असे सांगितले असते, तर नक्कीच त्याचा विश्वास बसला नसता. तसेच त्याला काकांच्या दुकानावर काम करण्याची संधी मिळाली नसती. घरची परिस्थिती कधीच सुधारली नसती. आणि तो वडिलांसारखा हिऱ्यांचा उत्तम पारखी ही बनू शकला नसता.
तात्पर्य:
अर्धवट ज्ञान घातक असते.
या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की अर्धवट ज्ञानामुळे आयुष्यात अडचणींचीच वाढ होऊ शकते.
कष्ट आणि जिद्दीने मिळवलेल्या परिपूर्ण ज्ञानामुळे आपल्याला सहजच योग्य आणि अयोग्य गोष्टींची पारख करता येते.
Leave a Reply