
१. भगवद्गीता ४.२९श्लोक:
“अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे। प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः॥”
अर्थ:
काही योगी (किंवा साधक /अभ्यासक व्यक्ती) प्राणाला अपानात अर्पण करतात, तर काही अपानाला प्राणात. प्राण आणि अपान यांच्या गती रोखून ते प्राणायामात तल्लीन होतात. रमतात.
परिणाम:
शरीरातील जीवनशक्ती संतुलित राहते, मानसिक शांतता वाढते आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत होते. या काही विशिष्ट योग क्रिया आहेत, ज्या विशिष्ट साधनेमध्ये आत्मसात केल्या जातात.

२. भगवद्गीता ५.२७-२८
श्लोक:
“स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः॥”
अर्थ:
इंद्रियांचे विषय बाहेर ठेवून, दृष्टि स्वतःच्या भ्रूमध्यावर स्थिर करून, नाकातून प्राण-अपान समान करीत, मन व बुद्धी संयमित करणारा योगी मोक्ष प्राप्त करतो. इथे मोक्ष चा अर्थ डिटॅचमेंट असा घेऊ शकता.
परिणाम:
श्वसनावरील नियंत्रणामुळे मन स्थिर होते, अंतर्मनात एकाग्रता वाढते, चैतन्य निर्माण होते आणि भय, क्रोध, व आसक्ती नाहीशी होते. अनिश्चितता सुद्धा जाते.
३. भगवद्गीता ८.१२-१३
श्लोक:
“सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्॥
ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्॥”
अर्थ:
सर्व इंद्रिये नियंत्रित करून, मन हृदयात स्थिर करून, प्राण ब्रह्मरंध्रात नेऊन, ‘ॐ’चा उच्चार आणि परमात्म्याचे स्मरण करणारा योगी शरीर सोडताना परमगतीला जातो.
परिणाम:
मृत्यूच्या वेळी सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त होते, आवागमनाची गरज उरत नाही. केवळ मृत्यूच्या वेळीच नाही तर त्याच्या एकंदर जीवनात त्याला उत्तम गती प्राप्त होते.
४. भगवद्गीता ६.११-१२
श्लोक:
“शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्॥
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये॥”
अर्थ:
शुद्ध, शांत ठिकाणी न उंच, न अगदी लहान असे आसन बनवून, त्यावर कुश, मृगचर्म व वस्त्र अंथरून, मन स्थिर करून व इंद्रिये संयमित करून योगाभ्यास करावा. चित्त एकाग्र होते.
परिणाम:
योगाभ्यासासाठी (ध्यान मेडिटेशन) योग्य आसन व जागा असली की, प्राणवायुची स्थिरता वाढते आणि शरीर-मन-आत्मा शुद्ध होतो. मनाला स्थैर्य लाभते.
५. भगवद्गीता १५.१४
श्लोक:
“अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्॥”
अर्थ:
मी (भगवान) प्राण्यांच्या, मनुष्य प्राण्याच्या देहात वैश्वानर अग्निरूप होऊन, प्राण व अपान यांच्या साहाय्याने चार प्रकारचे अन्न पचवितो.
परिणाम:
जीवनक्रिया व पचनप्रक्रिया प्राण- अपान यांच्या संतुलनावर अवलंबून असते, हे लक्षात येते. भगवद्गीतेच्या या श्लोकातील “चतुर्विधम् अन्नम्” म्हणजे चार प्रकारचे अन्न आयुर्वेद आणि वेदांताच्या परंपरेनुसार खालीलप्रमाणे समजावले जाते –
- भक्ष्य – जे थेट चावून खाल्ले जाते.
(उदा. भाकरी, भात, फळे, भाज्या) - भोज्य – जे न चावता गिळले जाते.
(उदा. द्रव किंवा मऊ पदार्थ – दूध, ताक, रस) - लेह्य – जे चाटून खाल्ले जाते.
(उदा. लोणचं, चटणी, मध) - पेय – जे पिण्यासाठी असते.
(उदा. पाणी, रस, सूप)
संदर्भ – हे आयुर्वेदीय ग्रंथ चरक संहिता (सूत्रस्थान 27.349) व महाभारत (शांतीपर्व) मध्ये स्पष्ट केलेले आहे.
६. भगवद्गीता ३.१५
श्लोक:
“कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्॥”
अर्थ:
सर्व कर्म ब्रह्मातून उत्पन्न होतात, आणि ब्रह्म अक्षरातून. त्यामुळे सर्वत्र असलेले ब्रह्म यज्ञात (जीवनाच्या श्वसन-प्रक्रियेत) स्थित आहे.
परिणाम:
जीवनातील प्रत्येक श्वास, प्रत्येक प्राणक्रिया ही दैवी यज्ञासमान आहे, असे स्पष्ट होते. भगवान श्रीकृष्ण इथे सांगतात की –
- विश्वातील, आपल्या शरीरातील प्रत्येक हालचाल, प्रत्येक काम हे अखेरीस विश्वाच्या मूल चेतनेतून (ब्रह्मातून) आलेले आहे.
- आणि ते ब्रह्म स्वतः परमेश्वराच्या शाश्वत स्वरूपातून उत्पन्न झालेले आहे.
- कारण ब्रह्म सर्वत्र आहे, आपल्या जीवनातील श्वसन- प्रक्रिया सुद्धा एक प्रकारचा यज्ञ आहे.
- प्रत्येक श्वासात आपण जीवनाच्या मोठ्या यज्ञात भाग घेतो, कारण प्राण घेणे आणि सोडणे म्हणजेच सृष्टीचा प्रवाह चालू ठेवणे.
७. भगवद्गीता १०.२०
श्लोक:
“अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च॥”
अर्थ:
हे अर्जुना, मी सर्व जीवांच्या हृदयात स्थित आत्मा आहे; मीच त्यांचा प्रारंभ, मध्य आणि अंत आहे.
परिणाम:
प्राणशक्ती हीच परमात्म्याचे स्वरूप आहे, हे जाणल्यावर प्रत्येक जीवात सामावलेले दैवत्व दिसते.

८. भगवद्गीता १३.२९
श्लोक:
“प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः।
यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति॥”
अर्थ:
सर्व क्रिया प्रकृतीच्या नियमानुसारच होत असतात; जो आत्म्याला अकर्ता म्हणून पाहतो, तोच खरे (सत्य दृष्टिकोनातून) पाहतो.
परिणाम:
प्राणक्रिया शरीराद्वारे चालते, आत्मा मात्र त्याचा साक्षी असतो — ही जाणीव मुक्तीकडे नेते. हे जे लिहिले आहे ते पुन्हा एकदा वाचा व काही सेकंद अनुभवता येते का ते पहा.
९. भगवद्गीता ७.८
श्लोक:
“प्राणः सर्वेषु भूतेषु तेजश्चास्मि विभावसौ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु॥”
अर्थ:
सर्व जीवांमध्ये मी (श्रीकृष्ण) प्राण आहे, अग्नीत मी तेज आहे, सर्व जीवांमध्ये मी जीवन आहे आणि तपस्वींमध्ये मी तप आहे. होय, ती तपश्चर्या मी आहे.
परिणाम:
प्राण म्हणजेच परमात्म्याची सचेतन उपस्थिती — ही जाणीव आध्यात्मिक आकलन, आदरभाव आणि कृतज्ञता वाढवते.
१०. भगवद्गीता १८.६१
श्लोक:
“ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया॥”
अर्थ:
हे अर्जुना, तो मी, ईश्वर सर्व जीवांच्या हृदयात स्थित आहे; तो आपल्या मायेने (क्रिया शक्तीने) सर्व प्राण्यांना यंत्रावर आरूढ झाल्यासारखे फिरवितो.
परिणाम:
प्राण हा परमेश्वराच्या इच्छेने चालणाऱ्या जीवनयंत्राचा मूलस्त्रोत आहे, हे समजते.
११. भगवद्गीता ८.१०
श्लोक:
“प्रयाणकाले मनसा॑चलेन भक्त्या युक्तो योगबल॑ेन च।
भ्रुवोर्मध्ये प्राणमाऽवेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्॥”
अर्थ:
मृत्यूप्रसंगी, मन सक्तीने आणि भक्तिपूर्णतेने स्थिर ठेवून, योगशक्तीच्या साहच्याने प्राणांना भ्रूमध्य (भुवयांच्या मधोमध) स्थिर करावे — असा योगी परमेश्वराच्या दिव्य स्वरूपाला प्राप्त होतो.
परिणाम:
श्वास-स्थैर्य आणि चेतनागतीचे उच्च नियंत्रण प्राप्त होते, थेट परमगतीचा मार्ग प्रकाशमान होतो.
१२. भगवद्गीता १०.९
श्लोक:
“मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्। कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च॥”
अर्थ:
ज्यांचे मन आणि प्राण सर्वत्र कृष्णभावनेने व्यापलेले आहेत, ते परस्पर एकमेकांना भगवंताची अनुभूती देतात, प्रसन्न चर्चेत गुंततात, आनंदित होतात.
परिणाम:
प्राण म्हणजेच जीवनशक्ति — भगवच्चिंतनात गुंतलेले शरीर-मन शांत, स्फूर्तिदायक – स्थितीमध्ये रहातात.

१३. भगवद्गीता ६.१३
श्लोक:
“समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्॥”
अर्थ:
योगीने आपले शरीर, डोके आणि मान सरळ ठेवून स्थिर बसावे. दृष्टी नासिकाग्रावर ठेवावी आणि इतर दिशांना न पाहावे.
परिणाम:
अशा स्थितीत बसल्याने प्राणशक्ती मध्यस्रोताकडे वाहते, मन एकाग्र होते आणि श्वासाचा समतोल साधला जातो.
१४. भगवद्गीता ६.१४
श्लोक:
“प्रशान्तात्मा विगतभीर्भ्रमचारिव्रते स्थितः।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः॥”
अर्थ:
शांतचित्त, निर्भय आणि ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारा योगी मन संयमित करून माझ्यावर (परमेश्वरावर) एकाग्र होऊन जातो. होत राहतो.
परिणाम:
मनातील अस्थिरता व वासना कमी होऊन, प्राण शांत व स्थिर होतात, ज्यामुळे दीर्घकाल प्राणायाम व ध्यान शक्य होते. प्राणशक्ती अधिकाधिक दृढ बनते.
१५. भगवद्गीता ६.१५
श्लोक:
“युञ्जन्नेवं सदाऽत्मानं योगी नियतमानसः।
शान्तिं निरवधिं लभ्य परमां मद्संस्थाम्॥”
अर्थ:
योगी अशा रीतीने सदैव आत्म्याशी एकरूप होऊन, मनावर नियंत्रण ठेवून, अखंड शांतता आणि परमेश्वराशी एकात्मता (अद्वैत अवस्था) प्राप्त करतो.
परिणाम:
प्राण व श्वास लहरी स्थिर होऊन मानसिक व आध्यात्मिक उर्जा अखंड राहते, ज्यामुळे समाधीची अवस्था येते. समाधी ही दिव्य अनुभूती आहे.
१६. भगवद्गीता ६.१६
श्लोक:
“नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन॥”
अर्थ:
हे अर्जुना! अति खाणाऱ्यास, न खाणाऱ्यास, अति झोपणाऱ्यास किंवा नेहमी जागणाऱ्यास योग साधना साध्य होत नाही.
परिणाम:
आहार व निद्रा यांचा मध्यम मार्ग अवलंबल्यास शरीरातील प्राणशक्ती संतुलित राहते आणि योगाभ्यास टिकतो. आहार विहार निद्रा इत्यादीचा दिनक्रम अगदी व्यवस्थित बनवावा.
१७. भगवद्गीता ६.१७
श्लोक:
“युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा॥”
अर्थ:
ज्याचा आहार, विहार, क्रिया, झोप आणि जागरण हे सर्व संतुलित आहे, त्यालाच योगाने दुःखांचा नाश घडवतो.
परिणाम:
संतुलित जीवनशैली प्राणांचे चढ उतार, प्राणांवर होणारे परिणाम रोखते, शरीर व मन निरोगी ठेवते आणि ध्यान व दिनचर्या सुलभ करते.

१८. भगवद्गीता १५.८
श्लोक:
“शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्॥”
अर्थ:
जसा वारा सुगंध स्वतः सोबत वाहून नेतो, तसा जीवात्मा (ईश्वरस्वरूप) देह सोडताना इंद्रिये व मन घेऊन दुसऱ्या चैतन्य शरीरात प्रवेश करतो.
परिणाम:
प्राण हीच आत्म्याची वाहकशक्ती असून आपल्या जन्म-मरण चक्रात त्याची प्रमुख भूमिका आहे.
१९. भगवद्गीता १५.९
श्लोक:
“श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते॥”
अर्थ:
हा जीव कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांचा अधिष्ठान करून विविध विषयांचा अनुभव घेतो.
परिणाम:
प्राणांद्वारेच इंद्रियांची क्रिया होते; प्राणशक्तीचे शुद्धीकरण म्हणजेच आपल्या सर्व इंद्रियांचे शुद्धीकरण होय.
शास्त्रानुसार मानव शरीरात दहा प्रमुख प्राणशक्ती वर्णिल्या आहेत — त्यांपैकी पंचप्राण म्हणजे प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे मुख्य जीवननियामक आहेत.
यांच्यासोबत पंच उपप्राण — नाग, कूर्म, कृकळ, देवदत्त, धनंजय — हे सूक्ष्म कार्ये साध्य करतात.
हे सर्व प्राण एकत्रितपणे देहातील श्वसन, पचन, उत्सर्जन, हालचाल, वाणी, झोप-जागरण, जांभई, उचकी, डोळ्यांची उघडझाप आणि मृत्यूनंतर देहसंरक्षण अशा विविध क्रियांना नियंत्रित करतात.
उपनिषद व योगशास्त्र सांगतात की, या दहा प्राणांच्या संतुलनातूनच शरीर, मन आणि आत्म्याची अखंड समन्वयशक्ती टिकून राहते.
स्वानुभवावरून मी सांगते की, हे जे शरीरांतर्गत वाहणारे प्राण असतात, त्या प्राणाचा स्पर्श हवेच्या स्पर्शाप्रमाणेच जाणवतो!
शास्त्रानुसार प्राण हे केवळ श्वासाचा प्रवाह नसून, संपूर्ण जीवनाचे मूळ तत्त्व आहे. प्राण हा देह, मन आणि बुद्धी यांना सजीव ठेवणारा दिव्य ऊर्जा प्रवाह आहे. उपनिषद, भगवद्गीता आणि योगशास्त्र सांगतात की, प्राण संतुलित असेल तर आरोग्य, मानसिक स्थैर्य, तेज आणि जीवनशक्ती टिकून राहते; असंतुलन आल्यास रोग, अशांती आणि दुर्बलता निर्माण होते.
आध्यात्मिक साधनेत प्राणाचे नियमन (प्राणायाम) मन शांत करते, इंद्रिये संयमित करते आणि चित्ताला अंतर्मुख बनवते.
श्री भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की, प्राणांच्या योग्य नियंत्रणाने योगी परमात्म्याच्या सान्निध्यात पोहोचतो. एकरूप होतो. अशा प्रकारे प्राण केवळ शरीरधारणेचा आधार नसून, तो आत्मज्ञानाचा सेतू, जीवनशक्तीचा स्तंभ आणि मोक्षमार्गाचा दीपस्तंभ ठरतो.
दरवर्षीच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी श्रीकृष्ण भक्ती मध्ये तल्लीन होऊन, काही ना काही लेखन भगवान श्रीकृष्ण माझ्याकडून लिहून घेतात.
“अर्जुनविषादयोगे प्रवृत्तः,
श्रीकृष्णेन विश्वोपयोगी गीते दिव्योपदेशः प्रदत्तः।” : (युद्धाच्या प्रसंगी) अर्जुनाला विषाद योग (डिप्रेशन) निर्माण झाल्यामुळे, श्रीकृष्णाने संपूर्ण विश्वाला उपयोगी होईल असा सुंदर आणि जीवनोपयोगी दिव्य उपदेश श्री भगवद्गीतेद्वारे दिला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा लेख लिहिताना श्री भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे कथन या लेखाच्या स्वरूपाने आपल्यासमोर मांडताना मला खूप आनंद होत आहे.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.
Leave a Reply