मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा!

🌹🌻🌴 मराठी भाषा दिन 🌴🌻🌹 शुभेच्छा
नमस्कार.

एकदा मी मेसेज टाईप करताना, माझ्या समोर बसा आणि पहा की, किती फास्ट मराठी मध्ये टायपिंग करता येतं ते!! किती सोप्प् असतं मराठी टायपिंग ते पहा! जिकडे तिकडे ‘इंग्लिश अक्षरांमध्ये अजूनही मराठी’ टाईप केलेले दिसते, ते पाहून खूप आश्चर्य वाटते. बर्‍याच ॲपवर, इतक्या सोप्या पद्धतीने मराठी टायपिंग करता येते, तरीही सोशल मिडिया वर मराठी भाषेचा संपूर्णतः कडेलोट चाललेला आहे आणि पूर्वी तरी एखादी चूक अथवा सुधारणा आपण निदर्शनास आणून दिली, तर त्यावर कोणी भसकन् आगपाखड करत नव्हते. पण आज मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे.

अनेकांना शुद्ध मराठीमध्ये लिहायचा कंटाळा सुद्धा येतो आणि कोणी तसे लिहा, असे सूचित केल्यावर त्यांना खूप राग सुद्धा येतो. हे लोकं, अशुद्ध लिहिले म्हणून भरमसाठ कारणं देत असतात. समोरच्या व्यक्तीला एकतर गर्विष्ठ ठरवतात; नाहीतर ‘मोठ्ठा आलास सांगणारा तू’, असं म्हणून त्याला खूप शिव्याशाप देत बसतात. या प्रकाराला सध्याच्या भाषेमध्ये ट्रोलिंग हे लोकप्रिय नाव आहे!

आणि मग जो असे बदल सुचवत असतो, शुद्ध व्याकरणाचा योग्य सल्ला देत असतो, त्याला थोड्याच वेळात ही अशुद्ध भाषा लिहिणारी माणसं, 100 गुन्हे केल्याचा अपराधी भाव प्रदान करत असतात आणि त्याला वाट्टेल ते बोलत असतात. वाट्टेल ते म्हणजे, अक्षरशः त्याच्या संस्कारावरून, खानदानावरून, शाळेवरून, प्रोफेशन वरून आणि स्वभावावरून अनेक प्रकाराने टीका केली जाते.

तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, इतकं टोकाचं वर्णन करून या लेखाची सुरुवात मी का केली आहे? त्याचं कारण म्हणजे, खरोखरच आज मराठीची हीच अवस्था झालेली आहे. अलीकडेच घडलेली एक घटना सांगते. नवीनच पेव फुटलेल्या एका वृत्तवाहिनीसाठी काम करणारी एक पत्रकार एका घटनेचं वृत्तांकन करत होती. ती तिच्या सदोष मराठी उच्चारांनी मराठी भाषेवर अक्षरशः सपासप वार करत होती. इतकं भयाण मराठी बोलत होती की, काय सांगावं !!

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यावर मी सर्वसाधारण विधान लिहिलं होतं की, उच्चार जरा नीट करावेत. अनेक सुज्ञ मराठी लोकांनी या कमेंटची दखल घेऊन त्याला लाईकही केले होते. अर्थातच मी केलेली कमेंट ही कोणाही लोकांचे लाईक मिळवण्यासाठी नक्कीच नव्हती. भाषेचे वाभाडे निघताना, हृदयात जे दुःख होतं, त्यातूनच निघालेले ते शब्द होते.

झालं, लगेच अनेक भाषाप्रभुंना व्यक्ती स्वातंत्र्याचे धुमारे फुटले आणि त्यांनी माझ्या कमेंट वर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.

असो आज या विषयावर खूप काही लिहीत नाही. एखाद्या दिवशी विस्तृत लेख नक्की लिहीन. तर मराठी बाबत किंवा स्वभाषेबाबत ही जी नकारात्मकता आणि कमालीची अनास्था पसरलेली आहे ती दूर करणे आणि मराठी पुनरुज्जीवित करणे ही प्रत्येक मराठी माणसाने स्वतःची आत्मिक जबाबदारी समजावी आणि आपल्या रसातळाला चाललेल्या मराठी भाषेला पुन्हा एकदा जिवंत करावे, ही माझी कळकळीची प्रार्थना तुम्हा सर्वांकडे आहे.

जिथे कुठे मराठी भाषा अयोग्य पद्धतीने वापरली जात असेल, तिथे तुम्ही ती चूक दाखवून दिली पाहिजे आणि त्या भाषेला सुधारले पाहिजे. तरच आपली आत्ताची पिढी आणि पुढची पिढी ही मराठी भाषिक म्हणून तग धरु शकेल.

ज्या भाषेमध्ये आपला जन्म झाला, ती मातृभाषा आणि ज्या कर्मभूमी मध्ये आपण राहतोय, तिची जी भाषा आहे म्हणजे, मराठी भाषा, याबद्दल आपल्याला अभिमान असायलाच हवा. ज्ञान असायलाच हवे. परस्पर संपर्क साधताना तरी किमान मराठी भाषेचा वापर व्हायला हवा.

स्वतःच्या भाषेबद्दलची विलक्षण अस्मिता बाळगणे, हे मला माझ्या बाबांनी शिकवले भाषेचा योग्य व सन्मानपूर्वक वापर कसा करावा, याचे संस्कारही माझ्या बाबांनी मला दिले. तसेच माझ्या शाळेने ही ते संस्कार मला दिलेले आहेत.

“माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।”

हे पुन्हा एकदा नव्याने अनुसरायला सुरवात करुया ना?! तुम्हीच सांगा.

आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी”

डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281
संमोहन उपचार तज्ञ, लेखिका, महाराष्ट्र


लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

3 Comments

 1. लेख सविस्तर आणि खुप छान आहें. आईवडिलांचे ऋण, शाळा, गुरुजन यांची आठवण ठेवणे… खरंच छान संस्कार मिळाले आपणांस…. खुप खुप आभार आणि कौतुक.

  मराठी भाषदिनाच्या निमित्ताने माझे विचार… 👇
  कालच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी झाली आणि आज मराठी भाषा गौरव दिन. सावरकरांचं मराठी भाषा प्रेम किती जाज्वल्य होतं हें आपणाला अनेक उदाहरणावरून माहिती आहें. एका कार्यक्रमात “श्री. राहुल सोलापूरकर” यांनी सांगितलेला किस्सा अंगावर शहारा आणतो म्हणून आजच्या दिवशी इथे देत आहे.

  “सावरकरांनी १ फेब्रुवारी १९६६ ला प्रायोपवेशनाला सुरुवात केली. आणि १५ दिवसांनी रत्नागिरीचे नानू खोत त्यांना भेटायला आले, सावरकरांची प्रकृती खूप खालावली होती! बोलताही येत नव्हते.खोत सारखे त्यांचा हात दाबून बरे आहे का विचारत होते, पण सावरकर बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण शब्द फुटत नव्हता आणि त्यांना ढास लागल्यासारखी झाली, खोत घाबरले, त्यांनी जोरात “nurse” ला बोलवा असे सांगितले, तेंव्हा सावरकरांच्या तोंडून जोरात शब्द बाहेर पडले “परिचारिका म्हण रे बाबा”आणि त्यांची नखं खोतांच्या हातावर घट्ट रुतली होती! याला म्हणतात, भाषेचा जाज्वल्य अभिमान! धन्य ती राष्ट्रनिष्ठा.

  अजून एक छोटंसं उदाहरणं….माझ्या एका शालेय वर्ग मैत्रिणीचे दोन्ही मुलगे अमेरिकेत असतात सुना अमराठी भारतीय, नातवंडे अमेरिकेत जन्मली, वाढली, भारत पाहिलाच नाही अजून त्यां नातवंडांनी. पण मुलांनी, सुनांनी पण अमेरिकेत जन्मलेल्या मुलांवर, मराठी संस्कार केले, ती मुले शुद्ध मराठी लिहितात बोलतात, आई आजोबांना मराठीत लिहितात, मराठीचे व्हिडिओ बनवतात आणि संवाद पण मराठीत करतात….. ह्याला म्हणतात भाषेचा खरा अभिमान, गर्व, आवड, प्रेम आणि संस्कार……. शेवटी काय शाळेतील माध्यमापेक्षा घरातील संस्कार फार महत्वाचे. इंग्रजी ही काळाची गरज तर आहेच पण ती संवाद, शिक्षण, ज्ञान यासाठी आणि म्हणूनच तिच्यावर आपलं प्रभुत्व हें असलंच पाहिजे पण मातृभाषा हा प्रत्येकाचा मूळपिंड असतो, आत्मा असतो….आपला जन्म त्या त्या भाषेतील हा परमेश्वरी संकेतच असतो जणू म्हणूनच प्रत्येकाला आपापल्या मातृभाषेचा अभिमान, गौरव वाटला पाहिजे.

  मराठी भाषा बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी, अमराठी मित्रानां माझा सलाम. 🙏
  किरण गावडे.

  • मराठी भाषेचा, किंबहुना मातृभाषेचा ठामपणे पुरस्कार करणारे लेखन – प्रतिक्रिया म्हणून लिहिल्याबद्दल आपले खूपखूप आभार.

   आज संपूर्णपणे शुद्ध मराठी बोलणारी व लिहिणारी माणसं खूप कमी राहिलेली आहेत. जेव्हा मी स्वतः शुद्ध मराठी लिहिते, तेव्हा माझ्यावर पुणेरी असल्याचा किंवा उच्चवर्णीय असल्याचा शिक्का लावला जातो. अगदीच काही नाही, तर डॉक्टर आहे, म्हणून गर्व करत आहे, असेही म्हटलं जातं. असो. सांगण्याचा मुद्दा असा आहे की, शुद्ध भाषेत लिहिणं व बोलणं आपण चालू ठेवले पाहिजे. आजूबाजूला मराठी भाषेचा प्रचंड प्रमाणावर अपमान होताना, दिवसातून अनेकदा पाहायला मिळते आणि ते पाहून मन विषण्ण होतं.

   माझ्या वडिलांनी हा भाषेबाबतचा अभिमान आणि निष्ठा या दोन्ही गोष्टी मला शिकवल्या, त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानावे, तितके कमीच आहेत.

   ज्या ज्ञानपॉवर.कॉम या वेबसाईटवर आपण हे सर्व लेख वाचत आहात, त्या ठिकाणी पोस्ट केलेले जे लेख आहेत त्या लेखांमध्ये माझं म्हणणं लोकांपर्यंत सहज पोहोचवता यावं, म्हणून मी स्वतः माझी लेखनाची शैली मुद्दाम बदललेली आहे आणि व्यावहारिक भाषेतले काही शब्द, त्यामध्ये मुद्दामहून घेतलेले आहेत. माझी खरी लेखन शैली ही पूर्णपणे शुद्ध मराठीमध्ये असते. धन्यवाद. 🙏 डॉ. सुनेत्रा जावकर

Leave a Reply