एका गावात काही कोळी नदीकिनारी जमले होते. नदीमध्ये जाळे टाकून मासेमारी करायला ते आले होते. ‘पाण्यात जाळी टाकून आपण मस्तपैकी जेवायला जाऊया’, असे ठरवून सर्व कोळी आपापल्या घरी निघून गेले.

त्यावेळी नदीकाठच्या एका झाडावर एक माकड बसले होते. ते माकड या मासेमारी करणाऱ्या कोळ्यांचे बारकाईने निरीक्षण करत होते. जेव्हा सगळे कोळी जेवायला घरी निघून गेले तेव्हा या माकडाला वाटले की, “आपण त्या कोळ्यांसारखे जाळी टाकून मासे पकडावे”
ते माकड झाडावरून धपकन खाली उतरून नदीच्या दिशेने उड्या मारत गेले. तिथेच पडलेली एक जाळी घेऊन ते पाण्यात उतरले. कोळ्यांनी जशी जाळी पाण्यात टाकली, तशीच त्याने सुद्धा जाळी पाण्यात टाकली.

पण त्याने कोळ्यांना जाळी बाहेर काढताना पाहिलेच नव्हते, त्यामुळे ती जाळी पाण्यातून कशी काढावी हे त्याला कळलेच नाही. गोंधळून गेल्यामुळे ते माकड स्वतःच त्या जाळ्यात अडकले आणि त्याच्या नाकात तोंडात पाणी शिरू लागले, ते गुदमरू लागले.
त्यावेळी जाळ्यातून सुटका करण्याची धडपड करत असता माकड स्वतःशीच म्हणाले, “किती मूर्ख आहे मी! ज्या गोष्टीची मला काहीच माहिती नाही, अशा गोष्टीत मी पडलो त्यामुळेच आज मला ही शिक्षा भोगायला लागत आहे”
गर्विष्ठ बेडकी आणि बैल | मराठी बोधकथा | Prideful Frog and Ox
तात्पर्य:
ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही, ज्या गोष्टीबद्दल संपूर्णतः ज्ञान नाही, अशा गोष्टींच्या वाटेस आपण जाऊ नये.