गर्विष्ठ बेडकी आणि बैल | मराठी बोधकथा | Prideful Frog and Ox

garvishth bedaki मराठी बोधकथा

एका घनदाट जंगलात एक छोटासा तलाव होता. त्या तलावात बरेच बेडूक राहायचे. त्याच तलावात एक बेडकी आपल्या चार मुलांसह राहायची. तिथेच त्यांचे खाणे पिणे, खेळणे सुरू असायचे. भरपूर खाऊन पिऊन ती बेडकी आकाराने एकदम मोठी झाली होती.

तिच्या मुलांना वाटायचं, ‘आपली आईच काय ती जगातली सगळ्यात ताकदवान आणि एकदम मोठी, शक्तिशाली आई आहे.’ ती सुद्धा तिच्या मुलांना स्वतःच्या सामर्थ्याच्या, शौर्याच्या गोष्टी सांगत असे. त्या गोष्टी खोट्या असल्या, तरीही तिच्या मुलांना मात्र खऱ्या वाटायच्या. कधी तिची पिल्ले इतर बेडकांशी भांडू लागली तर ती त्यांना वाचवायला यायची. एकंदरीत तिला आपल्या सौंदर्याचा आणि शक्तिशाली शरीराचा फारच अभिमान वाटायचा.

असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी त्या बेडकीची मुले खेळता खेळता तलावाच्या बाहेर निघून गेली. तलावाजवळच असलेल्या एका गावात जाऊन ती पिल्ले पोहोचली. तिथे त्यांना एक भला मोठा बैल दिसला, त्या बैलाला बघताच त्यांना खूप आश्चर्य वाटले, “किती मोठ्ठा प्राणी आहे हा!” ते अवाक होऊन त्या बैलाला बघत बसले. तो बैल आरामात गवत चरत हळूहळू शेतात फिरत होता.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

थोड्यावेळाने मात्र त्यांना भीती वाटू लागली आणि ते आपापसात म्हणाले, “हा प्राणी आपल्या जवळ आला तर आपलं काही खरं नाही.” तेवढ्यात त्या बैलाने मोठा आवाज काढला, आणि पुन्हा चरायला लागला. त्याचा आवाज ऐकून पिल्लांना खूप भीती वाटली आणि त्यांनी तिथून जी धूम ठोकली, ते थेट आपल्या तलावात आईजवळ गेले.

आईने पाहिले की आपली पिल्ले खूप घाबरली आहेत. जवळ जाऊन तिने विचारले, “काय झालं बाळांनो? कोणी तुमचा पाठलाग करत आहे का?”

सर्व पिल्ले एका मागून एक बडबड करू लागली. एक पिल्लू म्हणाले, “आम्ही खूप मोठा प्राणी पाहिला”
दुसरे पिल्लू त्याला दुजोरा देत बोलले, “हो आई, खूप मोठा होता तो!”
तिसरे पिल्लू, “त्याने खूप मोठा आवाज केला, खूप ताकदवान होता तो, आम्ही घाबरलो आणि धावत पळत इथे आलो”
चौथे पिल्लू, “हो आई, खूप शक्तिशाली होता तो!”

Also Read: 444+ Helpful Affirmations for Everyday

हे ऐकून त्या बेडकीचा स्वाभिमान दुखावला. तिला वाटले, “आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्राण्याला आपली मुलं ताकदवान आणि शक्तिशाली कसं काय म्हणू शकतात? मीच त्यांना दाखवते कोण शक्तिशाली आणि ताकदवान आहे ते!”

ती हळूहळू आपले शरीर फुगवून मोठे करू लागली आणि मुलांना विचारू लागली, “एवढा मोठा होता का तो प्राणी?”
एक पिल्लू बोलले, “नाही आई, यापेक्षाही मोठा होता”
तिने तिचे शरीर अजून फुगवले, “एवढा मोठा होता का?”
दुसरे पिल्लू म्हणाले, “अजिबात नाही, याहीपेक्षा खूप मोठा होता तो”
तिने तिचे शरीर फुगवून अजून मोठे केले, “इतका मोठा होता का तो?”

सर्व पिल्ले म्हणाली, “अजिबात नाही याहीपेक्षा खूप मोठा होता तो, आई तुला अजिबातच जमणार नाही, त्या प्राण्या एवढं मोठं व्हायला.”

हे ऐकून तिने स्वतःचे शरीर अजून फुगवले. फुगवता फुगवता अचानक तिचे शरीर फुग्यासारखे फाटकन फुटले. अशा रीतीने तिला तिच्या गर्विष्ठ स्वभावामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले.

तात्पर्य

या कहाणीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की, कोणत्याही गोष्टीचा इतका गर्व करू नये की स्वतःचेच नुकसान होईल. आपल्या शक्तीचा अभिमान जरूर असावा पण वृथा गर्व असू नये, कारण ‘गर्वाचे घर खाली’ असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*