चित्ताच्या विटेवरी उभा माझा श्रीहरी | मराठी बोधकथा | Marathi Bodhkatha

मराठी फेसबुक पेज “दत्त माझा, मी दत्ताचा” वरुन साभार सादर :

!!एक दिवसाचा पांडुरंग ….. नक्की वाचा !!

पंढरपूरच्या पांडुरंग मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडलोट करण्याची सेवा करत होता, तेव्हा एकदा त्याच्या मनात विचार आला कि, “विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देणाऱ्या पिता पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील.  असा विचार केल्यावर, एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, “देवा, तू आमच्यासाठी सतत उभा असतोस, तुझे किती पाय दुखत असतील, तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन” 

hindu guy temple

त्यावर पांडुरंगालाही या कल्पनेत मौज वाटली, तो म्हणाला, “ठीक आहे, तू माझ्या  जागी उभा राहा; पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, थोडक्यात कोणताच उपदेश करू नकोस. फक्त छान हसत उभा रहा.”

पांडुरंगाचे हे सुचनावजा बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे रोजचे येणे सुरु झाले, 

श्रीमंत भक्त : “देवा, मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे, आता माझ्या व्यवसायामध्ये खूपखूप भरभराट होऊ दे.” 

असं बोलून झाल्यावर, तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तिथेच विसरला. पण देवा  पांडुरंगाने काहीच न करता, फक्त उभे राहण्याचे सांगितलेले असल्याने, गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला. पुढे तिथे एका गरीब भक्ताचे येणे झाले.

गरीब भक्त : “पांडुरंगा, हा माझ्याकडील एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी छान भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व मुले 2 दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कणही नाही, पण माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल, नक्कीच ते तुझ्या इच्छेप्रमाणे होते व होईल असा मला विश्वास आहे, श्रद्धा आहे.”

असे म्हणून त्या भक्ताने आपले डोळे उघडले.  तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसलं. त्याला आनंद झाला. देवाचे आभार मानून, त्याने ते पाकीट घेतले व घरी घेऊन गेला व त्याने आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न दिले. हे सर्व कळुनही, गोकुळ काहीच न बोलता हसत उभा राहिला.

पुढे तिथे एक नावाडी आला व देवाला उद्देशून तो म्हणाला, “हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा माझा हा सर्व प्रवास व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे.”

असं म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागला.  तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे आला. तिथे पाकीट नसल्याचे बघून त्या श्रीमंत भक्ताने नावाड्यावर संशय घेतला आणि पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला पोलिसांमार्फत अटक करवली. 

तेव्हा गोकुळला फार वाईट वाटले. पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहिला.

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणाला, “हे पांडुरंगा, हा काय खेळ तू मांडला आहेस? मी तर काहीच नाही केले, तरी मला हि शिक्षा?”

हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरले. तो विचार करायला लागला की, आता स्वत: पांडुरंग जरी इथे असला असता, तरी त्याने दयेने काहीतरी केले असते. असा विचार करुन, न राहवून तो पोलीसांना म्हणाला की, “पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे” 

त्यावर पोलीसांनी नावाड्याला सोडून दिले. त्यामुळे नावाडी व श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून गेले.

रात्री पांडुरंग मंदिरात आला व त्याने गोकुळला विचारले, “काय, कसा होता तुझा आजचा दिवस?” 

गोकुळ म्हणाला, “देवा पांडुरंगा, मला वाटले होते की, इथे उभे राहणे फार सोपं काम आहे. पण आज मला कळले की, हे काम किती अवघड आहे ! यावरून कळत आहे की तुझे दिवस हे सोपे नसतात.”

“पण देवा, मी आज एक चांगले काम पण केले”, असे म्हणून त्याने सारी हकीकत देवाला सांगितली.

pandurang image hindu

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणाला, “शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितलं होते की, तू कोणालाही काहीही बोलू नकोस. पण तू ऐकलं नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही आहे. तुला काय वाटतं की, मी भक्तांच्या ह्रदयातील भावना ओळखू शकत नाही?”

गोकुळ  मान खाली घालून उभा राहिला.

पांडुरंग पुढे म्हणाला, “अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला. जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.

त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते. पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, या परिस्थितीत तो आपली नाव अजिबात वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला. जेणेकरून तो तिथे तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल. 

पण तुला वाटले की, आपण एक दिवसाचा देव झालो, म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर माझ्या खेळात मोडता घातलास, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले… “देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्या रचनेचा खेळखंडोबा करतो. ” 

तात्पर्य

देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे. फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*