पूर्वजन्म प्रतिगमन: निराळ्या मितीतील विलक्षण प्रवास Past Life Regression With Hypnotherapy © Journey to Another Dimension!

Past life regression

“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकःl न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ll२३ll
अच्छेद्योsयमदाह्योsयमक्लेद्योsशोष्य एव चl नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोsयं सनातनः ll२४ll”

[भगवद्गीता- अध्याय दुसरा]

अर्थात- या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकवणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर व सनातन आहे.

अशी महती ज्याची सांगितली आहे, त्या आत्म्याला स्थूल भौतिक शरीर नष्ट झाले, म्हणून तो संपला असे म्हणणे अज्ञानाचे लक्षण आहे. तो आत्मा एका शरीरातून मुक्त होतो आणि काही विशिष्ट ऱ्हस्व-दीर्घ अंतराळानंतर सृजन होत असलेल्या अन्य शरीरात संचार करतो. अर्थात दुसरा माणूस म्हणून जन्म घेतो. आत्म्याच्या गूढ प्रवासाला समजून घेउन, वर्तमानातील काही अनाकलनीय प्रश्नांना, आजारांना, सुयोग्य उपचार केले जावेत, म्हणून अलीकडच्या काळात एक उपचार पद्धती उदयाला आली आहे, जिचं नाव आहे पूर्वजन्म प्रतिगमन – पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी. ©

आपण सर्वसाधारणपणे म्हणतो की, या जन्मीच्या अतृप्त इच्छा पुढील जन्मी पूर्ण करण्यासाठी आत्मा नवीन देह धारण करतो. नक्कीच तथ्य आहे या कथनात. एका जन्मातला देह सोडताना जो शेवटचा विचार जिवात्म्याच्या (व्यक्तीच्या) मनात असतो, त्या विचारांमधून उमटलेले भावतरंग घेऊन, हा आत्मा शरीरातून मुक्त होतो आणि मुक्त झाल्या झाल्या त्याला स्वतःच्या आत्मिक पातळीचे ज्ञान होते आणि मग ‘त्या’ ‘शेवटच्या विचारानुरूप’ परिस्थितीमध्ये तोच निवड करतो की, आता कोणत्या आईबाबांच्या पोटी जन्म घ्यावा.

उदाहरणार्थ- एका जन्मात अत्यंत कुपोषणग्रस्त भागात आयुष्य घालवले आहे, अशा माणसाचा मृत्यू अन्नावाचून तडफडून झाला, तर मरताना अन्नाचा अभाव, स्वतःची होणारी परवड, त्यामुळे बनलेलं लाचार कृश शरीर अशा अर्थाचे विचार मृत्यूसमयी जर त्याच्या मनात असतील, तर अन्नाची मुक्त सोय जिथे आहे, अशा ठिकाणी म्हणजे एखाद्या अत्याधुनिक भोजनालयातील भटारखान्यात किंवा एखाद्या खाण्यावर वारेमाप खर्च करणाऱ्या श्रीमंताच्या घरी त्याचा जन्म होईल. हा असा हिशोब असतो.

पूर्व जन्मात प्रतिगमन म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन हे व्यक्तीच्या वर्तमान आयुष्यातील शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक व नातेसंबंधित प्रश्न सोडवण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. हे स्पष्ट करणारे स्वामी परमहंस योगानंद यांचे पुढील विधान पहा- “तुमच्या वर्तमान मनाचे जे प्रभावी कल आहेत, त्यांच्या पृथक्करणाने तुम्ही या पूर्वी कशा प्रकारचे आयुष्य जगत होतात, याचा अचूक अंदाज करू शकता.”

स्वामी परमहंस योगानंद यांनी म्हटलेल्या या वाक्याचा काय अर्थ आहे? तर आज वर्तमान आयुष्यात आपल्याला विशेष रस असलेल्या, अनेक गोष्टींचं जर पृथक्करण केलं, तर हे समजून येईल की, त्यात रस असण्यामागे वर्तमानात जरी काही कारण सापडत नसले, तरी गत आयुष्यावर नजर टाकली की, कारणं स्पष्ट व्हायला सुरुवात होते. कधी कधी असं पृथक्करण आपल्याला ज्ञात असलेल्या भूतकाळावर नजर टाकूनही संपूर्ण होत नाही. म्हणजे तत्सम काही आठवत नाही. तर त्यासाठी अजून मागे डोकवावे लागते. मागे म्हणजे कुठे? तर आपल्याच अनेक पुर्वजन्मांमध्ये.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

पण हा खटाटोप करायचा कशासाठी, असा प्रश्न वाचकाच्या मनाला नक्कीच सतावत असेल. हा सर्व खटाटोप नवीन प्रश्न निर्माण करण्यासाठी नक्कीच नाही; तर आयुष्यातील काही ‘कायमस्वरूपी प्रश्नचिन्हे संपवण्यासाठी’ व उत्तरादाखल ‘एक नवा अक्षय दृष्टीकोन आतून जोपासण्यासाठी’ आहे. आता हे सर्व पास्ट लाईफ रिग्रेशन उपचार पद्धतीमुळे आपल्याला कळणे सहजसाध्य झाले आहे. एका संमोहन सजेशन्स सत्राची झलक इथे बघू शकता.

Press PLAY and Watch the video Right Here!

ही पहा एका उपचार सत्राची झलक….

स्थळ – संमोहन उपचार केले जातात, ती केबिन. केबिनमध्ये मी हिप्नोथेरपिस्ट सुनेत्रा व एक उपचारार्थ आलेली स्त्री. आणि वेळ – दुपारची.

पात्रे: एक समस्याग्रस्त महिला (महिलेचे नाव अनघा सातपुते समजूया), संमोहनकर्ता (मी).

अनघाचं सत्र सुरु झाले. प्रथम श्वासांचं सखोलीकरण, मग शरीराचं शिथिलीकरण, आणि हळू हळू भौतिक जगाशी धूसर होत चाललेला बाह्यमनाचा संपर्क.

संमोहनकर्ता (मी): अनघा

अनघा: हं..

मी:- आपल्याला अजून खोल जायचंय. तू आतापर्यंत ज्या मितीत (डायमेंशन) वर्तमान जगात जगत आहेस, वावरत आहेस, त्याहून वेगळ्या मितीत जायचंय. गेट रेडी फॉर दॅट…

अनघाचे हावभाव स्वीकृतीदर्शक. तिने होकारार्थी मान हलवली.

मग पुढची सर्व सूचनांची कार्यप्रणाली, जी कार्यान्वित करून काळाच्या खोल डोहात बुडलेली अनेक रहस्यं बाहेर निघायला सुरुवात झाली..

मी:- अनघा, आता तू कुठे आहेस? पायांना होणारा जमिनीचा स्पर्श पहा. कसा आहे?

अनघा आता वर्तमानात ३५ वर्षांची होती. ३५…. ३०…. २४…. असे वयाचे अनेक टप्पे पार करत करत अनघा भूतकाळात चालली होती. १९…. १०….. ५….

अनघा : नागपूरमध्ये आहे मी एका गावात.

मी:- गावाचं नाव काय? कोणतं वर्ष चालू आहे?

अनघा : (जरा वेळ थांबत) म्हसळा गाव.

मी:- वर्ष सांग.

अनघा: (धीम्या आवाजात) १८९१.

वयाच्या विविध टप्प्यांना स्पर्श करत अनघा वेगळ्या मितीत चालली होती. अधूनमधून त्या त्या वयातले प्रसंग वर्णन करत होती. सर्वात शेवटी ती आईच्या पोटात असलेल्या जन्माच्या अवस्थेपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर सुरु झाला अनघाचा दुसऱ्या जन्मात नेणारा कालातीत प्रवास.

या संपूर्ण सत्रात जो काही आम्हा दोघांमध्ये संवाद झाला त्याचा आशय असा : एका जन्मात अनघा एका छोट्या पण काहीशा प्रगत खेड्यात ‘विकास’ नावाच्या पुरुषाच्या जन्माला आली होती. आता अनघाची जी आई आहे, ती मागील जन्मी विकासची (तिचीच) आई होती. विकासची आई आजारी असायची, तरीही घरातली सर्व कामं करायची. विकासची काळजी घ्यायची. पण तरीही विकास आईला खूप त्रास देत असे. घालून पाडून बोलत असे. त्याचे लग्न झाले असून बायको अतिशय सोशिक होती. तीच स्त्री (बायको) या जन्मी ‘अनघाचा मुलगा’ आहे. स्वतःच्या बायकोला विकास गुरासारखा बदडायचा, वाट्टेल ते शिवराळ बोलायचा. विकासचा आवाज पहाडी होता, पण वाणी खूप अभद्र होती. शेजाऱ्यांशी तो सतत भांडत असायचा. त्याला एक मुलगा होता, जो समंजस होता आणि विकासचा मुलगा घरातल्या या सर्व गदारोळापासून स्वतःला अलिप्त ठेऊ शकायचा. उलट स्वतःच्या तामसी वडिलांनाच तो कधी कधी चांगला उपदेश द्यायचा (हा मुलगा या जन्मी अनघाचा काका आहे). कालांतराने याच मुलाच्या मांडीवर वयाच्या ५५ व्या वर्षी विकासचा मृत्यू झाला.

हा सर्व तपशील सांगत असताना अनघा अधूनमधून हुंदके द्यायची, मध्येच रागवल्यासारखं, मध्येच केविलवाणं झाल्यासारखी करायची. या सत्रानंतर चार सत्रे झाली तिची. अर्थात सत्रांचे हे प्रमाण व्यक्तीसापेक्ष आहे, याची नोंद घ्यावी. दर वेळेला सत्र संपल्यावर — अनघा स्वतःची ‘मुक्त झाल्याची आणि आरामदायी अवस्थेमध्ये पोहोचल्याची’ जाणीव निरनिराळ्या भावांमधून प्रगट करत होती. खूप रिलॅक्स वाटायचं तिला.

अनघा आता बरी होऊ लागली. तिला कोणते आजार होते ते सांगते – घशाचा विकार आणि डोकेदुखी. तिच्या दंडावर एक विशिष्ट जन्मखूण होती आणि तिची मुख्य समस्या होती, ती म्हणजे नातेसंबंधातील तणाव.

तर या सत्राचे विश्लेषण असे आहे (काळजीपूर्वक वाचावे):  मागील जन्मीची अनघाची आई या जन्मीपण आईच आहे; पण या जन्मात अनघाच्या संगोपनात आईकडून दिरंगाई झाल्यामुळे आई व मुलीत कमालीचा विसंवाद होता. मागील जन्मीची सोशिक बायको या जन्मी ‘अनघाचा मुलगा’ म्हणून आहे. इथेही मायलेकांमध्ये वितुष्ट आहे. तो अधून मधून फक्त आज्ञापालन करतो आणि विकास चा मागील जन्मीचा समंजस मुलगा, हा या जन्मीचा’अनघाचा काका’ आहे. ज्यांच्याशी अनघाचे खूप चांगले पटते. त्यांनीच उपचारासाठी वेबसाईटवर पत्ता शोधून माझ्याकडे तिला पाठवले. मागील जन्मी ओरडून रेकून आवाजाचा खूप गैरवापर झाल्याने या जन्मी अनघाला घशाचे विकार होते आणि तिच्या दंडावरची खूण, जिथे अधून मधून वेदना होत असे, ती म्हणजे मागील जन्मी बायकोसोबतच्या हाणामारीत दारावर हात जोरात आपटल्याने झालेल्या जखमेची खूण.

असो. पुढील काळात अनघाचे आजार हळू हळू कमी झाले व काही दिवसातच संपुष्टात आले. घशाचा विकार ही गेला. दंडावरच्या खुणेकडील वेदनाही कमी झाल्या. मुख्य म्हणजे नातेसंबंधातील दुरावा कमी होऊन, संपल्यामुळे डोकेदुखीही थांबली.

आता मला सांगा, ही काही जादू आहे का? मी केलेली? अजिबात नाही. हे आहे कर्मांचं matrix हे गणित आहे कर्मांचे, जे ज्याचं तोच सोडवत असतो. पण आपण मात्र ते सर्व अनुभवताना – याला – त्याला, परिस्थितींना, हुकलेल्या संधींना, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक तर कधी कधी राजकीय पार्श्वभूमिंना सुद्धा जवाबदार धरत असतो, देव पण सुटला नाही यातून. (म्हणजे देवाच्या नावाने पण आपण शंख करत बसतो)

‘मी एवढं देवाचे करतो, पण हे नशिबाचे नि कर्माचे भोग काही संपतच नाहीत.’ असं आपण बऱ्याचदा ऐकतो. विविध सिद्धांतानुसार आज आपण जीवशास्त्रीय उत्क्रांती जाणत आहोत. त्याप्रमाणे वरील विवेचनात ‘आत्म्याची उत्क्रांतीची प्रक्रिया’ असा अर्थ अभिप्रेत आहे आणि हे सर्व तत्वज्ञान किंवा कपोलकल्पित ज्ञान अजिबात नाही, तर शास्त्र आहे.

पूर्वजन्म प्रतिगमनाचे शास्त्र. इंग्रजीत ‘पास्ट लाईफ रिग्रेशन’चे सायन्स. पाश्चात्य देशात या सर्व पूर्वजन्मांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत बरेच संशोधन झाले आहेत. आजही अनेक संस्था हे कार्य करत आहेत. आपल्या देशात अनेक जुन्या ग्रंथांमध्ये, माणसाच्या अनेक जन्मांचे अस्तित्व, आत्म्याची उत्क्रांती, कर्माचा सिद्धांत या बाबत विस्तृत विवेचन आहे.

मनुष्याच्या सप्त कोषांपैकी प्राणमय व अन्नमय कोश मृत्युसमयी नष्ट झाल्यावर, अंतःकरण म्हणजे मन व बुद्धी घेऊन आत्मा म्हणजेच जीवात्मा बाहेर पडतो आणि इतर कोषांसाहित नव्या गर्भात प्रवेश करतो. म्हणजे नवीन भरती होते, पृथ्वी नावाच्या दर्जेदार शाळेत…!

वर म्हटल्याप्रमाणे या गर्भप्रवेशापूर्वी आत्म्याला पूर्ण ज्ञात असते की, आपली आत्मिक म्हणजेच आध्यात्मिक उन्नत्ती किती झालेली आहे ते. म्हणजेच किती धडे शिकले आहेत व पुढील पातळी गाठण्यासाठी किती व कोणत्या प्रकारचे धडे शिकायचे आहेत. इथे गोम अशी आहे की, हे सर्व आधीच ज्ञात असूनही, जगण्याच्या मिळालेल्या नवीन संधीमध्ये हा जीवात्मा, हे धडे नीट आणि परिपूर्णपणे कसा शिकतो, यावर हे सर्व येणे-जाणे अवलंबून आहे.

आता हे संमोहनाद्वारे केले जाणारे पूर्वजन्म प्रतिगमन म्हणजे PLR कशासाठी केले जाते हे जाणण्यासाठी कर्माचा सिद्धांत पाहूया. हा सिद्धांत काय सांगतो, तर असंख्य जन्मांमध्ये आपण इतर अनेक जीवात्म्यांच्या संपर्कात येत असतो आणि कर्मांच्या नवनविन गाठी बांधत असतो. कर्म ना चांगले असते ना वाईट, कर्म ना बक्षिस असते ना शिक्षा, ते देश, धर्म, जात, विचार, वंश, स्त्रीत्व, पुरुषत्व या सर्वांच्या पलीकडे असते. चांगले वाईट जर आपल्याला जाणवत असेल तर ती आहेत, कर्मांची स्पंदने.

जीवात्म्यावर विविध घटनांचा, समजुतींचा व जाणिवांचा खोल परिणाम करणारी स्पंदनं. PLR थेरपी मध्ये काळाच्या पलीकडे जाऊन, याच कर्मांच्या उर्जा स्पंदनांवर कार्य घडतं. पाटाचं पाणी शेतीच्या कामासाठी जेव्हा बांधून आणलं जातं, तेव्हा जर ते पाणी पुरेशा प्रमाणात गंतव्य स्थानी पोहोचत नसेल, तर आपण या पाटाच्या मार्गाचा मागोवा काढत मागे जातो आणि मार्गातले अडथळे दूर करतो, तशीच क्रिया आहे ही. PLR थेरपी चे प्रयोजन स्पष्ट करणारे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘Reliving is relieving.’ ©

तो गतक्षण पुन्हा अनुभवणे म्हणजे त्यातून (अक्षरशः अडकलेल्या उर्जेच्या गाठीतून) आत्म्याला मोकळे करणे. हे सर्व या उपचारांमध्ये होत असतानाच, अनेक अन्य गोष्टीही आपसुकच घडत असतात. उर्जेच्या ज्या गाठी पडलेल्या आहेत, त्या आत्म्याच्या अज्ञानामुळे पडल्या आहेत, हे व्यक्तीला खोल समजतं. वर्तमान आयुष्यातील किंवा वर्तमान जीवनातील समस्येचं कारण – जिवंतपणे अनुभवल्यामुळे ही जाणीव खोलवर होते की, जीवनातल्या प्रत्येक घडामोडींना, प्रसंगांना आपणच पूर्णतः जवाबदार आहोत. मग मनातले अनेक तिढे सुटतात. मन व्यापक बनते. जर मागचे काही जन्म विविध धर्मात झालेले व्यक्तीने पाहिले तर धर्माबाबतचा नवा दृष्टीकोन तयार होतो. पी एल आर झाल्यानंतर व्यक्तीला मानवता म्हणजेच माणुसकी आतून समजू लागते.

व्यक्ती नात्यांकडे निरोगी भावनेतून पाहू लागते. पूर्वग्रह दुषित दृष्टीकोन निघून जातो. बहुसंख्य व्यक्तींमध्ये मृत्यूची भीती कमी होते. कधी कधी नष्ट होते.

PLR थेरपी सोबतच व्यक्तिगत समुपदेशन व संमोहन अवस्थेत केलेले समुपदेशन, यामुळे व्यक्तीमध्ये सृजन घडते. नवा दृष्टीकोन व नवी विचारसरणी विकसित होते, अंगिकारली जाते, जुनाट आजार बरे होतात. भय, न्यूनगंड नाहीसा होतो.

बहुसंख्य वेळी परम चैतन्याशी, स्वतःच्या चैतन्य क्षेत्रात भेट होते. आमच्याकडे हे संमोहन उपचार केलेल्या व्यक्तींनी स्वतःला, विविध धर्मात जन्म घेतलेले पाहिले आहे. कुणी भगवान बुद्धाच्या काळात, कुणी भगवान श्रीकृष्णाच्या काळात, कुणी ख्रिस्ताच्या काळात, कुणी श्रीनृसिंह सरस्वतीच्या समवेत, कुणी प्रसिद्ध तीर्थक्षेत्री पण जुन्या काळात, तर कुणी आफ्रिकेच्या जंगलात, हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये वावरताना, जगताना स्वतःला पाहिले आहे, अनुभवलेले आहे. ©

लक्षात ठेवा, पूर्वजन्म प्रतिगमन (PLR थेरपी) हे निव्वळ उपचार नाहीत, तर तुमची (अंतर्मनाद्वारे) तुमच्याच अस्तित्वाच्या चैतन्याशी होणारी इच्छाभेट आहे. इथे मूळ उद्देश फक्त भूतकाळाची स्टोरी जाणण्याचा नक्कीच नाही, तर भूतकाळातील चैतन्य उर्जेचा विस्कटलेला स्त्रोत पुनर्प्रस्थापित करण्याचा आहे, ज्यामुळे वर्तमान आयुष्यावरील गतकाळाचा नकारात्मक प्रभाव मिटवता येतो. पी एल आर नंतर, पानगळ झडून गेल्यावर नविन पोपटी रंगाची पालवी फुटलेल्या झाडाप्रमाणे, नव्या आयुष्याला सुरुवात होते.

PLR थेरपीसाठी आमची ‘Quantum Hypnosis’ ही संस्था काही वर्षांपासून कार्यरत आहे. इथे समस्याग्रस्तांच्या संख्येपेक्षा, निवारणाच्या दर्जाला नेहमीच प्राधान्य दिले जाते. हे केवळ लोकांसाठीचे उपचार केंद्र नसून नवनविन अनुभवांनी आम्हालाही समृद्ध होण्यासाठी, असलेलं एक प्रशिक्षण केंद्र आहे. शरीर, मन, आत्मा, चैतन्य व भावना या सर्व पातळींवर बरं करणारी ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे.
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. लिंक शेअर करु शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 84 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

11 Comments

  1. अतिशय सुंदर विश्लेषण, बऱ्याच गोष्टी ची महिती मिळाली. कधी तरी प्रत्यक्ष भेटून बोलू. धन्यवाद.

      • जोशी आर.डी.केसरीनंदन ग्रुप मेसेज माहिती पूर्ण आहे असे मेसेज आपण ग्रुप वरही टाकू शकतात अगदी उत्तम

    • सर/ मॅडम नमस्कार, सदरची माहीती जवळपास श्रीमद्भाग्यवद्गीतेचा अर्कच आहे, जो श्रीकृष्ण भावनभावीत होऊन त्यात समरसून लिन होईल किंवा अंत्यसंमयी भौतिक शरीर सोडतांना जो विचार मनांत घेऊन प्राण सोडेल तशीच योनी पुरजन्म प्राप्त होईल……! हेच पुन्हा स्पष्ट करून ” ज्ञानकर्मसण्यासयोगात ” अंतर्भूत केले आहे. धन्यवाद.

  2. खुप छान माहिती मिळाली🙏
    कधीतरी प्रत्यक्ष भेटून एक सेशन अटेंड करायला आवडेल मला 🙏

  3. Very good , that’s great.
    Really it works !!, would like to see it happening .
    Interested in understanding very closely.
    Cam i call you.

1 Trackback / Pingback

  1. होल्डिंग ग्रजेस: नकारात्मकतेचा काटेरी वृक्ष Holding Grudges: The Prickly Timber of Negativity! - Dnyan Power

Comments are closed.