बंडखोर माईंडला अनुभवा | Experience Your Rebellious Mind

Press PLAY and Listen to this article NOW!

तुम्ही हे असं केलंय का? तुम्ही कधी डोळे मिटून, अगदी स्वस्थ बसून तुमच्या स्वतःच्या विचारांची हालचाल, व्हायब्रेशन्स अथवा चलबिचल अवलोकन केलीय का? तुमच्या मनाचं कार्य तुम्ही अनुभवलं आहे का? बरं ते जाउ देत, तुमच्या मनाने ते स्वतः कसं काम करतं त्याचं निरीक्षण केलं आहे का? तुमचे विचार कसे आहेत, तुमच्या भावना कशा आहेत, तुम्ही झाडांकडे, फुलांकडे, पक्ष्यांकडे, लोकांकडे कशा दृष्टीने पाहता, समोरुन येणाऱ्या एखाद्या सूचनेला तुम्ही प्रतिसाद कसा देता किंवा एखाद्या नव्या कल्पनेला तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, ते नुसते पाहिलेत का हे विचारतेय. हे तुम्ही कधी केले आहे का? केले नसेल तर तुम्ही जीवनाच्या एका महत्त्वाच्या एक्सपिरीअन्सला अनुभवलं नाहीत. ©

आपले मन कसं कार्य करतं, ते जाणणे हा शिक्षणाचा मूलभूत हेतू आहे. तुमचं मन प्रतिक्रिया कसं करतं हे तुम्हांला कळत नसेल, तुमच्या मनाला त्याच्या स्वतःच्या व्यापारांचे भान नसेल तर भोवतालचा समाज हा कसा आहे हे तुम्हांला कसं कळायचं बरं?!!

नक्की तुम्ही समाजशास्त्राची पुस्तके वाचाल, समाज शास्त्राचा अभ्यास कराल; पण तुमचं स्वतःचं मन कसं कार्य करतं, ते जर तुम्हांला समजलं नाही, तर समाज कसा आहे, ते तुम्हांला खरोखरी कळणारच नाही, कारण तुमचे मन समाजाचाच अंश आहे, नव्हे ते म्हणजेच समाजमन आहे. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या श्रद्धा, तुमचे मंदिरात जाणे, तुम्ही घालता ती वस्त्रे, तुम्ही जे काय करता आणि जे करत नाही तसेच तुम्ही कसला विचार करता या साऱ्यांचाच समाज बनलेला असतो. ©

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

तुमच्या मनात जे काय चाललेले असते, त्याचेच ते प्रतिबिंब (रिफ्लेक्शन) असते. म्हणजेच तुमचे मन समाजापेक्षा वेगळे नसते. तुमची संस्कृती, तुमचा धर्म, तुमचे वेगवेगळे वर्गभेद आणि अनेकांच्या महत्त्वाकांक्षा आणि वादविवाद यांच्यापेक्षा ते भिन्न नसते. समाज म्हणजे हेच सर्व काही असून तुम्ही त्याचाच भाग आहात. समाजापेक्षा वेगळे असे तुम्ही नसताच.

आता समाज हा नेहमी तरुणांच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा, त्यांना विशिष्ट आकार, वळण देण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्ही जन्मल्यापासून व तुम्हाला थोडीफार जाण येऊ लागल्यापासून, तुमचे आई व वडील, सदोदित तुम्ही काय करावे, काय करु नये, कशावर श्रद्धा ठेवावी व कशावर ठेवू नये हे तुम्हाला सांगत असतात. ईश्वर आहे तुम्हांला सांगितले जाते किंवा अशा बर्‍याच गोष्टी मनावर बिंबवल्या जातात. त्यामुळे असे होते, की तुमचे मन जे कोवळे असते, ग्रहणक्षम, जिज्ञासू, शोधक असते, ते हळूहळू चौकटीत बसविले जाते.

संस्कारित करून त्याला असा आकार दिला जातो, की तुम्ही विशिष्ट समाजाच्या साच्यात पक्के बसाल आणि क्रांतिकारक होणार नाही. अशा रीतीने विशिष्ट चाकोरीतच विचार करण्याची सवय तुमच्या ठायी दृढ झाली असल्यामुळे तुम्ही जरी बंड केलेत, तरी ते त्या चाकोरीत मर्यादितच असते.

आपल्याला अधिक चांगले अन्न मिळावे, जास्त सुखसोयी मिळाव्यात म्हणून तुरुंगातील कैदी बंड करतात; पण ते तुरुंगातल्या तुरुंगातच जसे असते, तसेच हे तुमचे बंड असते. तुम्ही जेव्हा ईश्वराचा शोध घेता किंवा योग्य प्रकारचे सरकार कोणते हे शोधण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ते नेहमी समाजाच्या साच्यानुसारच असते. तो समाज म्हणत असतो, हे खरे आहे आणि ते खोटे आहे, हे चांगले आहे आणि ते वाईट आहे. हाच नेता योग्य आहे आणि हे ‘संत’ लोक आहेत.”

तेव्हा महत्त्वाकांक्षी किंवा अत्यंत चलाख माणसांनी घडवून आणलेल्या तथाकथित क्रांतीप्रमाणेच तुमचे बंड हे नेहमीच भूतकाळाने मर्यादित (पास्ट रुल्स) झालेले असते. तेव्हा ते बंड नव्हेच, ती क्रांती नव्हेच, ती केवळ अधिक जोराची चळवळ असते. हा एका चाकोरीतच घडणारा अधिक तीव्र विवाद असतो. साचेबंदपणा तोडून बाहेर पडणे आणि त्याच्या बाहेरच शोध घेणे म्हणजेच खरे बंड होय, हीच खरी क्रांती होय. ©

समाजातील बरीच जवाबदार माणसं ही केवळ या समाजरूपी तुरुंगातील परिस्थितीची सुधारणा करण्याची काळजी करीत असतात. तुम्ही समाजाशी जुळवून घेउ नका, जे पटत नाही, तिथे प्रश्न करा, असे ते तुम्हांला सांगत नाहीत. “चुकीच्या नियमांच्या आणि अधिकारशाहीच्या भिंती पाडून बाहेर या, मनाला बंदिस्त करणारे नकारात्मक विचार झटकून टाका,” असे ते कधीच सांगत नाहीत.

पण खरं शिक्षण तेच आहे. खरं शिक्षण म्हणजे तुम्ही घोकून तयार केलेल्या विषयाची परीक्षा उत्तीर्ण होणे नव्हे किंवा तुम्ही तोंडपाठ केलेल्या काही गोष्टी उतरवून काढणे नव्हे; तर तुमचे मन ज्या तुरुंगात अडकलेले आहे, त्याच्या भिंती जाणून घेण्यास तुम्हांला मदत करणे होय.

समाज नेहमी आपल्या सर्वांवर प्रभाव पाडत असतो. आपल्या विचारसरणीला नेहमी वळण लावत असतो आणि बाहेरून येणाऱ्या या दबावाचे रूपांतर हळूहळू आंतरिक दबावात होत जाते; पण ते दडपण कितीही खोल शिरलेले असले, तरी ते बाहेरूनच आलेले असते आणि जोपर्यंत तुम्ही या विचारसरणी तून ब्लास्ट होउन बाहेर पडत नाही, तोपर्यंत ‘अंतरंगातली’ अशी काहीही गोष्ट नसते.

तुम्ही काय विचार करता हे तुम्हांला कळले पाहिजे. तुमचा कशावर विश्वास आहे आणि कशावर नाही, त्याचंही तुम्हांला भान असलं पाहिजे. हा सारा सामाजिक साचाच असतो आणि जोपर्यंत तुम्ही तो सावधानपूर्वक ओळखून त्यातून फुटून बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपण स्वतंत्र आहोत, असं तुम्हांला वाटत असलं तरी तुम्ही कैदीच असता.

आश्चर्य म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जणांना या तुरुंगातल्या मर्यादेतच बंड करायला हवं असतं. आपल्याला जरासं अधिक चांगलं ताजं अन्न, थोडा व्यवस्थित प्रकाश हवा असतो. आपल्या घराची खिडकी जरा मोठी प्रशस्त हवी असते, म्हणजे आपल्याला थोडं जास्त आकाश दिसेल. ©

तुरुंगात स्वातंत्र्य कधीच नसते. स्वातंत्र्य भिंतीबाहेर असते, समाजाच्या पठडीबाहेर असते; पण त्या पठडीपासून मुक्त होण्यासाठी तुम्हांला त्या समाजाचा सर्व आशय समजला पाहिजे. म्हणजेच तुम्हांला तुमचं स्वतःचं मन समजले पाहिजे. स्वतःचं ज्ञान असणं, तुमच्या सर्व कृतींचं, तुमच्या विचारांचं आणि भावनांचं भान असणं फार महत्त्वाचं आहे आणि शिक्षण म्हणजे हेच असतं, नव्हे का? कारण जेव्हा तुम्हांला स्वतःचं संपूर्ण अवधान असतं तेव्हा तुमचं मन अतिशय संवेदनशील, अतिशय अलर्ट, प्रतिसादात्मक बनतं.

हा प्रयोग तुम्ही करा. दूरच्या भविष्यकाळात एखाद्या दिवशी नव्हे, तर उद्या किंवा आजच दुपारी हे करून पहा. तुमच्या खोलीत पुष्कळ माणसे असली किंवा घरात जास्त गर्दी असली, तर एकटे बाहेर पडा, एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या नदीकाठी जाऊन शांत बसा आणि तुमच्या मनाचं कार्य कसं चालतं ते अवलोकन करा. ‘मी माझ्या मनाला आता लिटरली पहात आहे; ते मन कितीही सूक्ष्म, इन्विजिबल असलं तरी ते मला चक्क दिसत आहे.’
आता ना त्यात दुरुस्ती करायला जाऊ नका. “हे बरोबर आहे आणि ते चूक आहे,” असं काहीच म्हणू नका. जजमेंटल होऊ नका. ©

त्या गोष्टींना मुवी पाहता, तसं नुसतंच पहा. तुम्ही मुवी पहायला जाता, तेव्हा त्यातील घटनांत भाग घेत नसता. Actor व Actress भाग घेत असतात; तुम्ही फक्त पाहत असता. तुमचं मन कसं कार्य करतं ते अशाच प्रकारे पाहा. यु विल एन्जॉय इट !! हे फार गमतीचं असतं, मुवीपेक्षाही खूप गमतीचं असतं, कारण तुमचं मन म्हणजे सर्व जगाचं सार असतं आणि सर्व मानवांनी अनुभवलेलं सारं काही त्यात असते. जस्ट इमॅजिन!

कळतंय ना सर्व? तुमचं मन म्हणजे अखंड विश्वातील माणसं असं फील होईल आणि हे फील झालं तर तुमचं मन अपार करुणेने भरून येईल. या बोधातून अपार प्रीती उदयास येते आणि असे होईल तेव्हाच सुंदर वस्तू पाहिल्यावर सौंदर्य म्हणजे काय ते तुम्हांला कळेल. आपणही या बहारदार निसर्गाचा भाग असलेले सर्वसाधारण जीव आहोत, हे उमजेल. अखंड आज्ञाधारकपणे चालणार्‍या श्वासोच्छ्वासाचं अगदी कौतुक वाटेल.

नक्की अनुभव घ्या आणि मला कळवा. हिप्नोथेरपी उपचार घेण्यासाठी आलेली माणसं जेव्हा अतिशय प्रगाढ (डीप) संमोहन निद्रेत जातात, तेव्हा समाधान वाटतं. मला कमालीचं रिलॅक्स वाटलं, (never before) असं ते आवर्जून सांगतात. लेख आवडल्यास कमेंट्समध्ये मला सांगा. धन्यवाद. © copyrighted. लिंक शेअर करु शकता

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

Be the first to comment

Leave a Reply