जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा! | Wishing Everyone A Happy World Poetry Day!

1} भाव नाही ज्यात । राम नसे त्यात । जाणिवांचे गणगोत । विखुरलेले ॥
– ज्या गोष्टीत भाव उरलेला नाही, त्यात राम नाही आहे. ह्रदयामध्ये ज्या विविध गोष्टींच्या जाणिवा होत असतात, जसं आपण म्हणतो की, मला असं जाणवलं, तसं वाटलं – हे सर्व – भाव नसल्यामुळे, विखुरलेल्या अवस्थेत आहे. जाणिवांचे गणगोत म्हणजे जाणिवांचे नातेवाईक (अर्थात अनेक लहानमोठ्या विखुरलेल्या जाणिवा).

2} भावनांचे आडंबर । विचारांचे कंदन । प्राणांचे सम्मिलन । होवावे कैसे ॥
— भावना वेगवेगळया गोष्टींनी उफाळून येतात. कधी रागाने, कधी त्वेषाने. आणि मनात विचारांचे कंदन म्हणजे युद्ध, द्वंद्व चालते. अशा ऊहापोहामध्ये प्राणांचे एकत्रीकरण कसं बरं होणार आहे? (एकाग्रता कशी साधणार?)

3} कुटिल जटिल घटित । मन पंडित पंडित । आत्म्याचे अर्जन । सांडोनि व्यर्थले हे ॥
— कुटील कारस्थानं, जटिल प्रसंग, संकटं येणं वगैरे जे चालु असते, त्यात मनाला वाटतं की, आपल्याला (मनाला) सर्व ज्ञान आहे. भरपूर सर्व कळतंय. आपण पंडितच आहोत जणू! मनाच्या या अशा अ‍ॅटिट्युड मुळे, आत्म्याला जे शिकायचं, ते शिकता येत नाही. त्यामुळे घडलेलं सर्वच फुकट जातं. अनाकलनीय ठरतं.

4} बहुयत्ने अगम्य आता । यशापयशाची गाथा ॥ विवेकांचे नियोजन । काळोखे लोपियले ॥
— नुसते प्रयत्न करत राहणे हीच आता यशापयशाची गाथा बनली आहे. डोकं चालवणं म्हणजे आपला विवेक (सारासार बुद्धी) वापरणं. पण जो तणाव म्हणजे डिप्रेशन येत चालले आहे, त्याने आपला हा विवेक अंध:कारात लोपत चालला आहे.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

5} फक्त लेखणी ही हाती । परम तूच सांगाती। संसाररवी मंथने । नवनीत तितुके प्रसारले ॥
तर हे भगवंता, माझ्या हातात काय आहे? (मी स्वत:, सुनेत्रा) तर ही मनातलं लिहिणारी लेखणी फक्त आहे. या लेखणीचाच वापर मी संसार रुपी दह्याचे मंथन (दही घुसळणे) करण्यासाठी करत असते. (लेखणी: घुसळणारी रवी) तर असेच मंथन मी केले, आणि जनमानसांसमोर (नवनीत म्हणजेच लोणी म्हणजेच सारांश) सादर केले. तर या सांसारिक गोष्टीतून मार्ग कसा काढावा, आता मी भगवंतावर (स्वत:च्या ह्रदयातील भगवंत) सोपवत आहे.
कविता व अर्थ वाचल्याबद्दल धन्यवाद . 🙏


लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*