आपल्या महान भारतीय परंपरेमध्ये अनेकविध योगसाधनांचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यातील काही योग साध्य होण्यासाठी, कठोर शिस्तीचे व नियमांचे अवलंबन करणे अनिवार्य असते. अशा अतिशय प्राचीन काळापासून, ज्या योगाचे अनुसरण अनेक ऋषीमुनींनी केले; आजही करत आहेत आणि पुढेही करत राहतील, अशा एका योगामधील (हठयोगामधील ) एका विशिष्ट वैज्ञानिक साधनेबद्दल मी आज तुम्हा सर्वांना सांगत आहे.
ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.
खरंतर जनमानसांमध्ये ही विधा, ‘साधना’ म्हणून प्रचलित नसून ‘एकाग्रता साधण्यासाठीची क्रिया’ म्हणून त्याकडे पाहिले जाते आणि खरोखरीच या साधने मधून अथवा क्रियेमधून एकाग्रता चांगल्या रीतीने साधली जाते. तर या वैज्ञानिक साधनेचं किंवा विशिष्ट टेक्निकचं नाव आहे – त्राटक साधना. ज्याला इंग्रजी मध्ये ‘आय गेझिंग’ (eye gazing) असे नाव आहे.
जमेल तितक्या सोप्या शब्दांमध्ये मी आता त्राटक साधनेबद्दल किंवा त्राटक क्रियेबद्दल तुम्हा सर्वांना माहिती देत आहे. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की त्राटक का करायचे? तर याचे उत्तर असे आहे की, ऊर्जेचं एकत्रीकरण कसं करावं हे आपल्याला नुसते शब्दांचे व वाक्यांचे खेळ खेळून समजणे कठीण आहे. तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवायची आहे किंवा एखाद्या गोष्टीवर तुमचं तन-मन-धन समर्पित करून ते काम उत्कृष्ट रीतीने पार पाडायचे असेल, तर स्वतःच्या ऊर्जेचे एकत्रीकरण जमायला हवे.
मनाची शक्ती एकत्र करून वापरता यायला हवी. फक्त विद्यार्थीदशेमध्येच नव्हे, तर जीवनाच्या सर्व टप्प्यांवर, सर्व वयोगटातील व्यक्तींना एकाग्रतेची प्रचंड गरज असते. तसेच ऊर्जेचे एकत्रीकरण करून, त्याप्रमाणे नियमबद्ध वागून, आपापले (long term/ short term) ध्येय गाठायचे असते.
या आणि इतक्या बेसिक नीड वर म्हणजे प्राथमिक गरजेवर त्राटक साधनेचा बेस आहे. वरवर पाहता ही जरी बाह्य ‘साधनां’वर केली गेलेली एक विशिष्ट क्रिया वाटत असली, तरी ती तुमच्या मनाच्या शक्तीवर व आत्मिक ताकदीवर एकंदर खूप चांगला सकारात्मक परिणाम करत असते, हे आपण ध्यानात ठेवावे.
तसं पाहायला तर त्राटक एखाद्या ध्यानासारखेच असावे, असं सुद्धा तुम्हाला वाटेल; तर खरोखरच या दोन्हींमध्ये साधर्म्य आहे. त्राटक वेगवेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकते. या सर्व पद्धतींचा उद्देश, मनाला उत्तम पद्धतीने एकाग्र करणे हा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरच्या वस्तुवर दृष्टी एकाग्र करून त्राटक करता, तेव्हा त्याला ‘बाह्य त्राटक’ असे म्हटले जाते आणि जेव्हा तुम्ही डोळे बंद करून आंतरिक गोष्टींवर, आतली नजर एकाग्र करता, तेव्हा त्याला ‘आंतरत्राटक’ असे म्हटले जाते.
त्राटकाचे अनेक फायदे आहेत. त्राटकामुळे दृष्टी भेदक बनते. ज्याला आपण ‘फोकस्ड आयसाईट’ असं म्हणू शकतो.
त्राटकामुळे आपल्या आयुष्यातील व्यवसाय नोकरी, व्यावहारिक, शिक्षण संबंधी, अशा विविध सामाजिक ठिकाणी आणि अनेक वैयक्तिक गोष्टींमध्ये आपली एकाग्रता चांगल्या रीतीने वाढू लागते. नजरेमध्ये व बुद्धीमध्ये तेज निर्माण होते. त्राटक साधना सातत्याने केल्यास व्यक्तिमत्वात सुद्धा सकारात्मक बदल होतात.
आता आपण पाहूया की, त्राटक कधी करावे?
वास्तविक पाहता त्राटकाच्या अभ्यासासाठी सकाळची वेळ अतिशय योग्य आहे. परंतु आत्ताच्या स्पर्धायुगामध्ये प्रत्येक जण आपापल्या नित्य कामांमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे तुम्ही सकाळ अथवा संध्याकाळ यापैकी एक वेळ निवडू शकता. तसेच ज्याप्रमाणे अचानक भरपूर व्यायाम केल्यावर शरीर कंटाळते, दुखू लागते. त्याचप्रमाणे अगदी सुरुवातीपासून खूप ताण देऊन बराच काळ त्राटक बिलकुल करू नये. तर हळूहळू त्राटकाची वेळ वाढवत न्यावी.
आता आपण पाहू की, कोणकोणते वेगवेगळे त्राटक तुम्ही करू शकता?
आरसा बिंदू त्राटक
1 फूट बाय 1 फुट अशा मापाच्या आरशाला समोर ठेवावे. त्याच्या मधोमध साधारणपणे रुपयापेक्षा लहान नाण्याच्या आकाराचा काळा रंगाचा कागदाचा गोल तुकडा कापून चिकटवावा. या गोलाच्या बरोबर मध्यभागी राई एवढा पिवळा डॉट ड्रॉ करावा. त्याकडे बघत राहावे. दररोज या आरशाकडे एकटक पहात रहावे. सुरुवातीला दोन मिनिटं त्राटक करावे. नंतर हळूहळू हा वेळ वाढवत नेऊन, दहा मिनिटांचा करावा. हा आरसा साधारणपणे तुमच्यापासून चार फुटावर स्थिर ठेवून द्यावा.
बिंदू त्राटक
कागदाचा एक चौकोनी तुकडा घ्यावा. त्याच्या मध्यभागी एक रुपयाच्या आकाराचे गोल काढावे. या गोलाला आपण डोळ्यात जे काजळ घालतो, त्या काजळाने व्यवस्थित रंगवावे. नीट समसमान रंगवावे. या कागदाला पुठ्ठ्यावर चिकटवून साधारणपणे चार फूट अंतरावर हा पुठ्ठा टांगून ठेवावा. आता हे त्राटक तुम्ही जिथे करत असाल, ती खोली कशी असावी, ते समजून घ्या. जिथे त्राटक केले जाते, त्या खोलीत खूप उजेडही नसावा आणि खूप अंधारही नसावा. तसेच ती खोली खूप थंड पण नसावी व जास्त तापमानाची सुद्धा नसावी. त्राटक करत असताना मेरुदंड म्हणजेच पाठीचा कणा स्ट्रेट ठेवावा. शक्यतो मांडी घालून शरीर काटकोनात ठेवून बसावे. आधी सांगितल्यानुसार त्राटकाची वेळ दोन मिनिटांवरून दहा मिनिटांपर्यंत वाढवत न्यावी आणि दररोज त्राटक करावे. या गोलाकडे पाहत असताना तुम्हाला गोल फिरत आहे, असे कधी कधी जाणवेल. कधी वेगवेगळे रंग त्या गोलामध्ये दिसतील, किरणे दिसतील आणि कधीकधी कागद संपूर्ण पांढराशुभ्र दिसेल.
ज्योती त्राटक
त्राटकाची अजून एक चांगली पद्धत, म्हणजे ज्योती त्राटक. गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा पेटवावा. इथे सुद्धा चार फूट अंतरावर बसावे. काही जण या त्राटकासाठी मेणबत्ती वापरतात. परंतु ज्योती त्राटक हे गाईच्या तुपाच्या दिव्यावर करणे उत्तम आहे. दिव्याची ज्योत खूप जास्त हलणारी असू नये. एकटक नजरेने काही काळ दिव्याकडे म्हणजेच ज्योतीकडे पहात रहावे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे उत्तम त्राटक आहे.
आंतर त्राटक
ज्यांना वरील पद्धतीने बाह्य त्राटक करणे कठीण वाटत असेल, त्यांनी हे आंतर त्राटक करावे. ज्या एखाद्या बाह्य गोष्टीवर त्राटक करावयाचे असेल, त्या बाह्य गोष्टीला काही काळ सतत पहावे आणि डोळे बंद करून त्या गोष्टीचे चित्र नजरेसमोर आणून त्यावर आपली आंतरदृष्टी एकाग्र करावी. अशा पद्धतीने आंतरत्राटक केले जाते.
चंद्र अथवा तारा त्राटक
यामध्ये आकाशात दिसणारा चंद्र अथवा एखादा प्रकाशमान तारा, यांची निवड केली जाते. चंद्रावर त्राटक करताना चंद्रोदयाची वेळ निवडावी. कारण चंद्र जेव्हा डोक्यावर येईल, त्या वेळेला डोक्याला ताण देऊन तुम्हाला वर पहावे लागेल. डोळ्यांवर ही ताण येऊ शकेल. त्यामुळे चंद्रोदयाची वेळ त्राटकासाठी योग्य ठरेल. तर या तारा अथवा चंद्रावर दृष्टी स्थिर करून एकटक पाहत राहावे. दोन मिनिटांपासून दहा मिनिटापर्यंत त्राटकाची वेळ वाढवत न्यावी. तारा त्राटकासाठी आकाशात दिसणारा कोणताही तेजस्वी तारा निवडून त्यावर दररोज हे त्राटक तुम्ही करू शकता.
प्रकाश त्राटक
आपल्या जवळपास असणाऱ्या म्हणजेच चार पाच फुटावरील, एका विशिष्ट प्रकाशाकडे जो प्रकाश अतिशय प्रखर नसून सौम्य (डोळ्यांना त्रास न देणारा) असेल, अशा प्रकाशाकडे सतत एकटक पाहून हे त्राटक केले जाते.
आता आपण पाहूया की, त्राटक केल्यानंतर डोळ्यांची काय काळजी घ्यावी?
- त्राटक करून झाल्यावर गुलाबजल व अतिशय स्वच्छ असलेले पाणी एकत्र करून दोन्ही डोळे व्यवस्थित धुवावेत. समजा, तुमच्याकडे गुलाब जल नसेल, तर खूप व्यवस्थित स्वच्छ केलेले, गाळलेले ताजे पाणी सुद्धा डोळे धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता. एका वाटीमध्ये असे पाणी घेऊन आपल्या डोळ्यांची त्यात उघडझाप करावी.
- त्यानंतर जमल्यास स्वच्छ रुमाल पाण्यात भिजवून दोन-तीन मिनिटे तो डोळ्यावर ठेऊन निपचित पडून राहावे. डोळ्यांचे आरोग्य सुधारेल, अशा अन्नपदार्थांचे सेवन, या त्राटकाच्या प्रॅक्टिस दरम्यान करावे. दिवसभर शरीराला लागेल तसे भरपूर पाणी पित राहावे.
- थंडीचे दिवस असल्यास च्यवनप्राश किंवा बदामाची बर्फी अशा पदार्थांचे सेवन करावे. जर बाहेरील वातावरण व तापमान अतिशय गरम असेल, तर अशा वेळेला पाणीदार अन्नपदार्थाचे जसे की ताक, पेज, गाजर सूप, नाचणीचे शिजवलेले पाणीदार सत्व, अशा अन्नाचे सेवन करावे.
वर उल्लेख केलेल्या विविध त्राटकांपैकी, तुम्हाला जे त्राटक व्यवस्थित जमेल, ते त्राटक करायला सुरुवात करा आणि त्राटकादरम्यानचे तुमचे अनुभव मला जरुर लिहून कळवावेत. तुमच्या मनाची शक्ती व एकाग्रता, तसेच डोळ्यांचे तेज यामध्ये त्राटकामुळे खूप सकारात्मक बदल होताना तुम्हाला आढळेल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनत जाईल.
खरंतर त्राटक हा साधनेचा भाग आहे. त्याचा तुम्हाला व्यवहारात उपयोग व्हावा म्हणून मी या पद्धतीने त्राटकाची मांडणी तुमच्यासमोर केली आहे. त्राटक या महत्त्वपूर्ण टेक्निक बद्दल इथे लिहिलेली ही सर्व माहिती, मी स्वतः लिहिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते मला जरूर सांगा. तसेच या माहितीचा कोणताही स्क्रीन शॉट काढू नये. ही माहिती कॉपी-पेस्ट करू नये. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करू नये. या लेखाची ‘लिंक तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये कुठेही शेअर करू शकता.’
Leave a Reply