आपल्या पारंपारिकतेतून काही विशिष्ट संभाव्यता आपण अंगिकारलेल्या असतात. सर्वसाधारणत: तुमचा स्वभाव, तुमचं सामर्थ्य, तुमच्या वृत्तीप्रवृत्ती आणि गुणविशेष हे सर्वकाही तुमच्या वाडवडिलांकडून आलेलं असतं, हा अतिशय संकुचित व मूर्खपणाचा विचार आहे. कारण या मतप्रवाहामुळे आपल्या अस्तित्वाला आणि आंतरिक सामर्थ्याला उगीचच मर्यादा निर्माण होतात. तुमचं पृथ्वीवर अवतरण तुमच्या अंतर्मनातून घडलेलं आहे, हे विसरु नका. तुमच्या सर्व लेखाजोखा चं अपडेट ठेवणारं तुमचं अंतर्मनच तुमचा निर्माता आहे. ते सुजाण आहे, प्रेमळ आहे, तुम्हाला जसं हवं तसं फलित देणारं आहे.
त्यामुळे जरा जागृत व्हा. आपल्या विकासामध्ये नकारात्मक हस्तक्षेप करुन आपली प्रगती रोखणार्या व्यर्थ नियमांसोबत एकरुप होऊ नका, त्यांना झुगारुन द्या; स्वकल्याण साधा.
तर मनाचे स्वरुप (टिपिकल पॅटर्न) बदलावा. नविन जोम निर्माण करुन यशाचे, व्यवहाराचे, आचरणाचे, क्रिया प्रतिक्रिया (ॲक्शन, रिस्पॉन्सेस) यांचे नविन आराखडे बनवायला हवेत. चक्क ‘नविन मन’ बनवावे. हे मन, एक नविन सॉफ्टवेअर असते, जे नव्या योजना, बदल, क्रियाशीलता, कामांची पूर्तता, तुमची अभिनव इच्छाशक्ती यांचा स्विकार करणारे असते.
या अंतर्मनाच्या ताकदीच्या साहाय्याने तुम्हाला स्वत:चे कौतुक वाटावे, अशा गोष्टी तुम्ही पेलवायला सुरुवात करु शकता. परिवर्तन घडवुन आणू शकता. ‘परिवर्तन संसारका का नियम है। ‘ हे फक्त गीतावचनच नाही आहे, तर हे शास्त्रीय सत्य आहे. प्रत्येक क्षणी सृष्टीत व समस्त ब्रम्हांडात परिवर्तन सतत घडतच असते. आपणही नक्कीच घडवत असतो.
तुम्ही कधी विचार केलाय का, की अनेक महत्तम व्यक्ती अगदी हलाखीच्या परिस्थितीतून जन्माला येताना दिसतात. ते का बरं? त्यांचं वास्तव व त्यांची पारंपारिकता तर त्यांना गरीब म्हणून लेबल लावून मोकळी झाली होती ना? मग या व्यक्ती श्रेष्ठतम कशा बरं बनल्या? उत्तर एकच आहे. अंतर्मनाच्या अगाध ताकदीच्या जोरावर.
या सर्वांनी अंतर्मनावर कार्य केलं आणि स्वत:ची इच्छाशक्ती स्फटिकाप्रमाणे ध्येयकेंद्री (फोकस्ड) व सातत्यपूर्ण ठेवली. आणि मार्गक्रमण करत राहिले. मग एक दिवस सकल विश्वच त्यांच्या कर्तृत्वाने, कामगिरीने, संशोधनाने प्रभावित झाले आणि या जगानेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर बसलेली लेबलं काढून टाकली. आणि त्यांना महानता प्रदान केली.
हे सर्व घडलं व अनंत काळापर्यंत घडत राहील, ते फक्त आणि फक्त – आपलं अंतर्मन, बहिर्मन, बुद्धी व जाणीव यांच्या उत्तम मैत्रीमुळेच घडत राहील, याचा विचार आपण सर्वांनी करुया.
मग आजच सुरु करुया. काय काय मेन्यु मागायचा, आपण अंतर्मनाकडे मग?!! तर विवेक, प्रेम, शांतता, सुजाणता, ज्ञानग्रहण, विविध नविन संकल्पना आणि सर्वांची अंमलबजावणी करण्याची तूफान ताकद!!
संमोहनाच्या उपचार क्षेत्रात मी अनेक वर्षं काम करत असताना, अनेक मनं भेटली. लेचीपेची होऊन खिन्न बसलेली हीच मनं जेव्हा सकारात्मकतेने उजळून निघाली, तेव्हा ती सर्व दीपस्तंभ बनली! आणि त्यांच्या नैराश्याची काजळी जेव्हा समूळ नष्ट झाली, तेव्हा त्यांचा ‘परिसर’ त्यांच्याच प्रकाशाने उजळून गेला..
डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 हिप्नोथेरपिस्ट (संमोहन उपचार तज्ञ), माईंड कौन्सेलर, लाईफ कोच, नॅचरोपॅथ.
Leave a Reply