संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान The Fourth Dimension: भाग पहिला Hypnotism is Turiya State of the Mind!

‘घट में फैला घनघोर अंधेरा। मन बोला जब जागो तब सवेरा।
‘तुरिया’ की झनकार सुन ले। डुबते जाओ पानी है बहुतही गहरा।’

– डॉ. सुनेत्रा जावकर

चेतनेच्या चौथ्या अवस्थेला ‘तुरिया चेतना’ असे म्हणतात. ही अवस्था महत्प्रयासाने प्राप्त होते. या अवस्थेमध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांमधील काहीही घडत नाही, ती या सर्वांच्या पलीकडील ज्ञानी अवस्था आहे. स्वच्छ आणि शांत पाण्याचा तळ ज्याप्रमाणे आपल्याला दिसू शकतो, त्याचप्रमाणे ही अवस्था आहे. जेव्हा तुम्हाला ही अवस्था प्राप्त होते, तेव्हा व्यक्ती आपल्या शरीराच्या पलीकडे असलेलं स्वतःचं चैतन्यस्वरूप अनुभवत असतो. या तुरीया अवस्थेमध्ये बरेच अद्भुत अनुभव प्राप्त होतात. ही तुरीया अवस्था ज्याने एकदा अनुभवली, त्याच्या अंतरंग आणि बहिरंग यातील अनेक कोलाहल शांत होतात. तुरीया अवस्था ही परम आनंदाची अवस्था आहे; जिथे विचारशून्यता येऊ शकते, अशी ही तुरिया अवस्था आहे. ©

तुरिया अवस्थेचे वर्णन कसे केलं आहे ते पहा. तुरीया अवस्था म्हणजे आजूबाजूला एक हलका उबदार दिव्य प्रकाश आहे, अशी जाणीव होते. त्याचबरोबर आपण स्वतः सुद्धा एक प्रकाश आहोत, अशी गहिरी जाणीव होते. हीच ती आत्मसाक्षात्काराची मिती आहे. तुरीया अवस्थेची अशी शब्दातीत जाणीव झाल्यावर, आपोआप व्यक्तीची प्रगल्भता वाढते आणि ज्या विचित्र दैनंदिन उहापोहामध्ये मन – बुद्धी – शरीर अडकलेले असते, तसेच त्यात जी बेचैनी रोज अनुभवाला येते, ही बेचैनी व ही अस्वस्थता दूर झाल्यामुळे ही ‘प्रगल्भतेची जाणीव’ आत मध्ये निर्माण होते. अशा प्रकारे पाहिलं तर ही तुरीया अवस्था ही उपचारक अवस्था आहे; जाणिवेच्या कक्षा रुंदावणारी अवस्था आहे.

कित्येक व्यावहारिक, सांसारिक, सामाजिक व आंतरिक गोष्टींची किंवा प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची असतात. त्यांच्यावर काथ्याकूट करायचा असतो; ऊहापोह करायचा असतो. ही संपूर्ण खळबळ या तुरीया अवस्थेमध्ये शांत होऊन जाते. अनेक प्रश्नांची, अनेक कोड्यांची, अनेक न सुटलेल्या गुंत्यांची उत्तरं या तुरीया अवस्थेमध्ये प्राप्त होतात आणि ही उत्तरं नेहमीच शब्दांच्या स्वरूपात असतील किंवा विचारांच्या स्वरूपात असतील असे नाही. तर ती उत्तरं बऱ्याचदा खोल जाणिवेच्या स्वरूपात असतात. ©

हे जे मी लिहिलं आहे, ते नीट स्पष्ट व्हावं म्हणून मी एक साधं व्यावहारिक उदाहरण देते. इतका वेळ झाला आणि आईचा अजून पत्ता नाहीय. “आई किती वाजता बाहेर गेली, आई नक्की कुठे कुठे जाणार होती, आई अजून कशी आली नाही, फोन पण लागत नाहीय, आईने काही खाल्ले असेल की नाही, आई आता किती वाजता नक्की घरी येणार आहे,” हे सर्व प्रश्न मनामध्ये चालू आहेत; कारण आई सध्या समोर दिसत नाहीय. तिच्याशी संपर्कही होत नाहीय. त्याच क्षणी मबात एवढा गोंधळ चालू असताना, संवादात घालमेल सुरु असताना, अचानक समोर दार उघडताक्षणीच आई समोर येऊन उभी राहिली, तर त्या क्षणी अंतःकरणात उठलेला सर्व धुरळा अचानक एकाएकी खाली बसतो आणि आई आहे ही फक्त एकच समाधानयुक्त जाणीव हृदयामध्ये स्थिर होते. ही आईला भेटल्याची परिपूर्ण जाणीव म्हणजे तुरीया अवस्था. ©

तसंच काहीसं या तुरिया अवस्थेमध्ये घडतं म्हणूनच या अवस्थेला मी उपचारक अवस्थाच मानते. उपचारक असं नाव मी सांसारिक मनुष्याच्या अनुषंगाने तुरीया अवस्थेला दिले आहे. संसार /परिवार विरहित योग्यांच्या दृष्टीने ही केवळ परमेश्वर प्राप्ती मधील परमानंदाची जाणीव देणारी ही अवस्था असू शकते किंबहुना ती तशी आहे.

आपण सर्वजण तीन मिती असलेल्या जगामध्ये जगतो; ज्याला आपण ‘थ्री डायमेन्शनल वर्ल्ड’ ( त्रिमितीय जग) असं म्हणतो. या तीन मिती प्रत्येक गोष्टीला आहेत हे आपल्याला नेहमीच अनुभवास येते. यामध्ये काही नवीन गोष्ट नाही आहे. परंतु एक पुढची चौथी मिती आहे, तिचं नाव आहे तुरिया अवस्था.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्थांमध्ये चौथी अवस्था म्हणजे तुरीया अवस्था, अशा पद्धतीने समाविष्ट झालेली असते, जसे एखाद्या माळेच्या मण्यांमध्ये धागा समाविष्ट असतो. हा धागा या सर्व मण्यांच्या अंतर्भागामधून पुढे जातो आणि त्याचबरोबर हा धागा या सर्व मण्यांचा साक्षीदार सुद्धा असतो. स्थूलमण्यांच्या आतमधून अस्तित्वात असणारा हा धागा म्हणजेच माणसाच्या आतमध्ये जसं कुणीतरी जागृत असावं, त्याप्रमाणे आहे.

जसे की, आपण जेव्हा झोपतो आणि आपल्याला स्वप्न दिसतं, म्हणजेच माणसाच्या आत स्वप्न बघणारा कोणीतरी आहे. झोपल्यानंतर सुद्धा कोणीतरी स्वप्न न्याहाळत आहे, म्हणजेच दिसणाऱ्या स्वप्नाच्या बाहेर सुद्धा कोणीतरी अस्तित्वात आहे आणि जागा असताना जेव्हा माणूस आपली रुटीन कामं करतो, त्यावेळेला सुद्धा माणसाच्या आतमध्ये कोणीतरी साक्षी भावनेने उपस्थित असतो.

माणसाने दिवसभरामध्ये कितीही व्यावहारिक कामं केली, इकडे तिकडे गेला, जगरहाटीमध्ये क्रियाशील राहिला, तरी त्याचा स्वतःचा असा एक विशिष्ट स्वभाव आहे (त्याचा पूर्णपणे व्यक्तिगत स्वभाव) आहे, या स्वभावामध्ये वर्णन केला जाणारा माणूस आहे, तो स्वभाव काही काळासाठी दबला जाईल, लपला जाईल किंवा विसरून टाकला जाईल. पण हा विशिष्ट स्वभाव ज्याच्यामुळे त्या माणसाची ओळख आहे, तो नष्ट होऊ शकत नाही. त्याचं अस्तित्व शिल्लक राहतंच.

हाच तो आतमध्ये असणारा कोणीतरी साक्षीदार आहे हे जे वर्णन केले गेले आहे, त्यातून हे स्पष्ट होतं की झोपेची किंवा स्वप्नाची अवस्था असू दे किंवा जागृतीची अवस्था असू दे या सर्वांच्या मागे कोणीतरी साक्षीदार आहे, यालाच तुरीया असे म्हणतात किंवा तुरीया अवस्था असे म्हणतात. ©

तुरीयाचा खरंतर अर्थ असा आहे, चतुर्थ – चौथी अवस्था. त्याचाच अपभ्रंश होऊन फक्त तुरिया हा शब्द उरलेला आहे. ज्या तीन अवस्था सांगितल्या गेल्या त्या तीन अवस्था म्हणजे तीन डायमेन्शन्स ( मराठीमध्ये मिती) आहेत. वरकरणी माणूस कितीही भरकटला, विस्कळीत झाला तरीही हे भरकटणं हे फक्त परिघाचं म्हणजे बाहेरच्या आवरणाचं व विविध तरंग लहरींचं म्हणजेच व्हायब्रेशन्सचं असतं. या सर्व गोष्टींचा अगदी सर्वसाधारणपणे विचार केला तर तुरीया ही जी अवस्था आहे, या अवस्थेला प्राप्त करायचे नाहीय किंवा तिला उपलब्ध करायचे नाहीय; तर तुरीया या अवस्थेला आविष्कृत करायचे म्हणजे तिला जाणिवेतून समजायचं. ©

ही तुरीया अवस्था प्रत्येकामध्ये आहे. फक्त ती पूर्णपणे एखादा खजिना मातीच्या आतमध्ये दबून पडून राहतो, त्याप्रमाणे ही अवस्था आपल्यामध्ये लपून राहिलेली अवस्था आहे. हा जो खजिना आहे जो मातीच्या खाली दबला गेलाय. फक्त आपल्याला मातीचा हा थर किंवा स्तर उचलून बाजूला करायचाय. की लगेचच हा खजिना दृष्टिक्षेपात यायला सुरुवात होईल म्हणजेच तो जाणवायला सुरुवात होईल. ©

असं बिलकुल नाहीय की, या तुरिया अवस्थारुपी खजिन्याची झलक कधीच माणसाला अनुभवता येत नाही. हा तुरीयारुपी खजिना माणसाला अधूनमधून अनुभवास येत राहतो. पण हा जो सहज येणारा तुरीया अवस्थेचा अनुभव आहे त्याकडे माणसाचं लक्ष जात नाही. तिकडे तो आपलं ध्यान घेऊन जात नाही.

उदाहरण सांगायचं झालं तर सकाळी जेव्हा माणूस उठतो, त्यावेळेला म्हणतो की, मला खूप छान गाढ झोप आली. एकदम छान वाटलं. फ्रेश वाटलं. त्यावेळेला माणूस हा विचार करत नाही की, हे नक्की कोणाला माहिती आहे, जो म्हणतोय की मला खूप छान झोप लागली किंवा मला खूप छान स्वप्न पडलं. म्हणजे याचा अर्थ तो झोपलेला असताना सुद्धा कोणीतरी एवढ्या गाढ निद्रेमध्ये जागा होता, म्हणून तर त्याला सर्वकाही दिसत होतं. अनुभवता येत होतं. जे स्वप्न माणूस बघतो, त्यावेळेला पण ही अशीच सेम सिच्युएशन असते की, स्वप्न व्यवस्थित आठवत असतं. तर कधी कधी थोड्याफार प्रमाणात आठवत असतं. परंतु हे पाहिलेले स्वप्न जेव्हा माणूस एकतर आठवतो किंवा दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला कधीच असा विचार करत नाही की, हे स्वप्न कोणी पाहिलं? हा बघणारा नक्की कोण आहे? हा साक्षीदार नक्की कोण आहे? ©

Hypnosis

आता जेव्हा माणूस दिवसा रुटीन लाईफमध्ये जागा आहे त्यावेळेला तो म्हणतो, मला भरपूर राग आला. मला भरपूर घृणा वाटली, तर तो कधी कधी म्हणतो की मला खूप प्रेम वाटलं. तेव्हाही त्याला कळत असतं की हा राग, ही घृणा, हा मत्सर किंवा हे प्रेम यांनी माझं ताबा घेतलाय. त्याला हे समजत असतं म्हणजे तो काहीतरी बघतोय. कोणाला? तर – रागावलेल्या स्वतःला, मत्सर मनात आलेल्या स्वतःला आणि प्रेमाने भरून गेलेल्या स्वतःला तो पाहतोय. ©

अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे माणसाचं लक्ष त्या भौतिक घडामोडींकडे व प्रसंगाकडे आपोआप वेधलं जातं. परंतु हे प्रसंग बघणारा जो कोणी आहे त्याकडे माणसाचं लक्ष वेधले जात नाही. जेव्हा माणूस हा विचार करायला लागेल की, हे सर्व काही बघणारा कोणीतरी आत आहे तेव्हा तो या चतुर्थ अवस्थेमध्ये आपोआप प्रवेश करेल. तेव्हा आपण म्हणू शकतो की, याला तुरीया अवस्था प्राप्त झाली. ©

भगवंताचं, योग्यांचं, संतांचं, महात्म्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या भावी जीवनाच्या संघर्षामध्ये व चढउतारांमध्ये प्रत्येक गोष्ट घडताना किंवा अधिकतम वेळी साक्षीभाव आपण मेन्टेन ठेवला तर जीवनाचं आणि जीवाचं कल्याण होईल. कारण साक्षी भाव हा जीवनामध्ये तुम्हाला अजिंक्य व पॉवरफुल ठरवणारा एक उत्तम व अंतिम भाव आहे आणि या संपूर्ण माया मोहमयी जीवनामध्ये जर काही शाश्वत असेल, तर ते फक्त आपल्यामध्ये असलेला हा साक्षीभाव आहे. हा साक्षीभाव सोडला तर आजूबाजूची प्रत्येक गोष्ट व प्रत्येक कण हा परिवर्तनशील आहे. ©

तुम्हाला ही गोष्ट नीट समजावी म्हणून चाकाचे उदाहरण घेऊया. जे चाक आहे त्याचा मध्यभाग जसाच्या तसा एकाजागी थांबतो आणि त्याचा जो परीघ आहे तो सतत फिरत असतो एक तर स्वतःभोवती फिरतो आणि त्याचबरोबर वाहनाला पुढे नेण्याचं काम करत असतो पुढे पुढे चाक जात राहतं. परंतु चाकाचा जो मध्यबिंदू आहे तो तसाच आपल्या जागी राहतो. इथपर्यंत वाचल्यावर लेख कसा वाटला, ते जरुर लिहा.

क्रमशः — भाग 1, भाग 2 व 3 सर्व लेख वाचावेत. या WORDPRESS वरील सर्व लेखांची मी लेखिका आहे. हे लेख मी स्वत: लिहिलेले आहेत. सर्व लेख copyrighted आहेत, स्क्रीनशॉट किंवा copy paste करु नये. copyright कायदा व कर्म सिद्धांत याचे उल्लंघन करु नये. या लेखाची लिंक शेअर करु शकता.

पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून दुसरा व तिसरा भाग वाचवा

संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग दुसरा

संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग तिसरा

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist, Spiritual & Mind blogger.

2 Trackbacks / Pingbacks

  1. संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग तिसरा – ज्ञान power
  2. संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग दुसरा – ज्ञान power

Leave a Reply