वटपौर्णिमा : बलशाली वडाचे वैज्ञानिक वास्तव | VatPaurnima: Scientific Reality of Sturdy Banyan Tree

वटपौर्णिमा : बलशाली वडाचे वैज्ञानिक वास्तव | VatPaurnima: Scientific Reality of Sturdy Banyan Tree

“या लेखातील काही माहिती संकलित आहे आणि उर्वरित माहिती मी लिहिलेली आहे, याची नोंद घ्यावी”

सर्वात आधी तेव्हाचा प्रसंग सांगते, जेव्हा मी लहान होते. एकदा आम्ही सर्वजण कोकणातील आमच्या निसर्गरम्य गावी नेहमीप्रमाणे गेलो होतो. वडाच्या झाडाबद्दल चर्चा सुरु होती. माझे बाबा म्हणजे झाडांचा एनसायक्लोपीडियाच!! झाडांवर माझे व बाबांचे प्रचंड प्रेम. बाबांनी मला सांगितले की, आपण समजा कुठे जात असू आणि वाट चुकली. आपण सैरभैर झालो आणि तहानभुकेने बेजार होऊन भटकत आहोत. अशा वेळी वडाचं झाड दृष्टीस पडलं की, समोर जायचं आणि हात पसरुन उभं राहायचं आणि प्रार्थना करायची की, मला प्राणशक्ती दे. तर लगेचंच आपल्या शरीरात प्राणशक्ती प्राप्त झाल्याचं जाणवतं. हे वडाचं विशेष आहे. वड हा सर्वात जास्त प्राणशक्तीने भरलेला वृक्ष आहे. ग्रेट ना!

आयुर्वेदामध्ये तर सुप्रजनन नावाचा एक विधी सुद्धा सांगितलेला आहे, ज्यात वटांकुरांच्या रसाचा वापर केला जातो. या विधीचा उद्देश स्त्रीच्या पोटी (वटवृक्षासमान) बलवान संतती जन्माला यावी असा असतो. खरोखरीच असे उत्तम फळ देणारा हा विधी असतो. असो. आता आपण मुळापासून वटवृक्षाची महती समजून घेऊया.

आपल्या संस्कृतीत येणारे सर्वच सण उत्सव निसर्गचक्राशी, कृषिजन्य संस्कृतीशी जोडलेले आहेत. याचा अर्थ वातावरणात होणार्‍या बदलांवर आधारित मानवाने स्वत:च्या जीवनशैली मध्ये कोणकोणते हितकारक बदल करावेत, हे सणांच्या माध्यमातून निर्मिलेले व योजलेले आहे.

तर मराठी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला वटसवित्री पौर्णिमा साजरी केली जाते. प्रसारित पौराणिक कथेनुसार या दिवशी सतीसावित्रीने मृत्यूच्या जबड्यातून आपल्या पत्नी व स्त्री सत्व सामर्थ्याने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. त्याची आठवण म्हणून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी मनोकामना करतात आणि उपवास करतात. या सणादिवशी वडाचे झाड अत्यंत पूजनीय मानले जाते. केवळ इतक्याच माहितीच्या आधारे आपण विविध ठोकताळे व निष्कर्ष काढत असतो. आपण एकदा वैज्ञानिक दृष्ट्या हे सर्व पाहुया.

खरं तर बारकाईने आणि विवेकनिष्ठ विचार केला तर हे सर्व सण उत्सव निसर्गचक्राशी, ऋतुचक्राशी सांगड घालताना दिसतात. देव ही संकल्पना व्यक्तीनिष्ठ असली तरी निसर्ग ही संकल्पना वस्तुनिष्ठ आहे. वडाच्या झाडाला ‘अक्षय वृक्ष’ असे म्हणतात, कारण वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात व झाडाचा विस्तार होतो. कधी कधी तो मैलोन मैलही असतो. बावनवड आपल्याला माहितच असेल.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

१९५० साली वडाच्या झाडाला ‘राष्ट्रीय वृक्ष’ म्हणून मान्यता मिळाली आहे. वडाच्या झाडाचा प्रत्येक भाग – म्हणजे मुळे, खोड, पाने, फुले, कोंब, चीक व साल यांचा उपयोग रोजच्या वापरात औषध म्हणून होतो. त्याची पाने आकाराने मोठी व संख्येने भरपूर असल्याने, ती पाने अनेक विषारी वायू शोषून घेऊन हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतात.

वडाचे झाड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकते, त्यामुळे हवेत आर्द्रता व गारवा निर्माण होण्यास मदत होते. हा सदोदित हरित वृक्ष आहे. एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड एक तासाला तब्बल ७१२ किलो ऑक्सिजन सोडत असते. अशा झाडाखाली जास्तीत जास्त वेळ घालवणे म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता करणे होय.

‘कूपादेकं वटच्छाया तथा मृद्रिर्मितंगृहम् शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम् |’

अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर – उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. आधीच्या काळात ही अशी घरे असायची तोवर एअर कूलर, एसी लागत नव्हता.

सत्यवान सावित्रिची कथा जाणून घेताना हल्लीच्या एका सोशल मीडियाच्या पोस्टमधून एक वैज्ञानिकदृष्ट्या केलेला विचार या कथेतून उलगडला. ज्येष्ठाच्या जीवघेण्या उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. (याला उष्माघात म्हणतात) उष्म्याने त्रासून प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सावित्रीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या पाण्याच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध असलेल्या सर्वाधिक ‘ऑक्सिजन’युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला, त्या वडाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाला धन्यवाद देणे म्हणजेच खरी वटपौर्णिमा !

त्याचप्रमाणे ‘साताजन्माची सोबत असू दे’ अशी मनीषा या व्रतात ठेवली जाते. त्यातही एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो. जीवशास्त्र सांगते, त्यानुसार आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात, नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो. अशा रितीने काही वर्षांमध्ये संपूर्ण शरीर नवीन बनते. म्हणजे या प्रत्येक नव्या नैसर्गिक सायकल ला नवा जन्मच आपल्याला प्राप्त होतो.

आतातरी लक्षात येतंय का, सात जन्माची सोबत म्हणजे काय ते?!!! आणि यावरुन विनोद करायला सर्वांनी सुरुवात केली आहे. तुम्ही म्हणाल की, आम्हाला कुठे हे माहिती होतं? हो ना, पण माहित होतं की नव्हतं, हा मुद्दाच इथे कसा येतो? तुमच्या दीर्घायुष्याची प्रार्थना, जर एक व्यक्ती निसर्गातील सर्वात बलवान झाडाकडे करत असेल, तर तुमचे पाच पन्नास खर्च झालेत का???? नाही ना! मी तर म्हणते तुम्ही पण पत्नी साठी दीर्घायुष्याची प्रार्थना करा. कारण दोघांनाही आयुष्य भर एकमेकांची साथ हवी असते. ज्यांना मुलं आहेत त्यांनाही आणि मुलं नसली तरीही, साथ हवी असते.

अशाप्रकारे, “शतायुष्याच्या प्रार्थनेसह हा निसर्गाच्या कृतज्ञतेचाही एक सोहळा” आहे. सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते. म्हणून तिचा सत्यवान वाचला. पण आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याचा दिवस म्हणजेच आजची ‘वटपौर्णिमा!’


लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*