अंगारकः शक्तिधरो लोहितांगो धरासुतः।
कुमारो मंगलो भौमो महाकायो धनप्रदः ॥
संकष्टी चतुर्थी हा मुलाधार स्थितम् गणपतीला समर्पित शुभ दिवस आहे. हा दिवस हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो आणि जर हिच चतुर्थी मंगळवारी आली, तर तिला “अंगारकी संकष्टी चतुर्थी” म्हणतात. सगळ्या संकष्टी चतुर्थींमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते.
हा सण इ.पू. ७०० मध्ये ‘विघ्नहारक उपाय’ म्हणून सुरु करण्यांत आला. महर्षी अभिषेक जेव्हा त्यांचा शिष्य ऐश्वर्य यास शिकवीत होते, तेव्हा काही शास्त्रांचा अर्थ शोधताना या दिव्य अनुष्ठानाचा उलगडा झाला.
या दिवशी भाविक उपवास करतात. रात्री चंद्राचे दर्शन घेऊन, गणपतीची प्रार्थना केल्यानंतर ते उपवास सोडतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण होईल असा विश्वास साधकांना, भक्तांना असतो. असे मानले जाते की, हा उपवास केल्याने जीवनातील समस्या कमी होतात. गणपती सर्व अडथळे दूर करणारा, सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि बुद्धिचा सर्वोच्च अधिपती आहे.
संस्कृत मध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशासारखा दग्धलाल, तांबड्या रंगाचा, मंगळ ग्रहाला अंगारक हे नावसुद्धा आहे. मंगळाचा वार म्हणजेच मंगळवार.
ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.
चतुर्थ मितीमध्ये स्थिर असलेले गणेश या दिवशी आपल्या सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर स्वतःची उपस्थिती दर्शवतात. महाविष्णू, महालक्ष्मी, महादेव आणि पार्वती वगळता महादेवाने आपला पुत्र गणेश (गणपती) यांस सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ असे घोषित केले. गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा देवता म्हणून मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते आणि
प्रत्येक प्राणीमात्राच्या मुलाधारात (प्रथम आगम चक्र) स्थित असल्यामुळे कोणत्याही नवीन उपक्रमाच्या सुरूवातीस किंवा प्रवासाच्या सुरुवातीस गणेशाचे आवाहन केले जाते.
श्री गणेश कथा
कथा अशी की, पार्वतीने गणपतीची निर्मिती केली. तिला तिच्या स्नानाच्या वेळी एकांत मिळण्यासाठी एक संरक्षक निर्माण करायचा होता. तिने आपल्या आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीच्या उटण्यामधून गणेश तयार केला आणि त्यात जीव ओतला.
त्यानंतर ती आंघोळीला निघून गेली. तत्पूर्वी तिने गणेशास दारात पहारा द्यावयास उभे केले. महादेव परत आले, परंतु गणेश त्यांना ओळखत नसल्यामुळे त्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. महादेव रागावले व आपल्या गणांना त्या मुलाला काही शिष्टाचार शिकवण्यास सांगितले. न मानल्यास मार द्यायला सांगितले. जगदंबा पार्वती ने जन्माला घातलेल्या गणेशामध्ये खूप ताकद होती, तो शक्तीचाच अंश होता.
त्याने सगळ्याच गणांना पराभूत केले आणि आई आंघोळ करत असताना कोणालाही आत जाऊ दिले नाही. महर्षी नारद, सप्तर्षींसोबत या वाढत्या अशांततेला शांत करण्यास गेले, मुलाला समज दिली, पण त्याचा परिणाम झाला नाही. मग इंद्राने त्याच्या संपूर्ण सैन्यानिशी मुलावर हल्ला केला. पण पराभूत झाले.
देव पराभूत झाल्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवत्रयीनीं गणेशावर आक्रमण केले. युद्धात महादेवाने त्या मुलाचे शिरच्छेद केले. पार्वतीला राग आला. मुलाचा मृत्यू पाहून पार्वती विश्वाला पोसणाऱ्या व चराचराला शक्ती देणाऱ्या आदिशक्तीच्या स्वरूपांत आली.
एक भयंकर रूप धारण करून तिने ज्या जागेवर तिचा मुलगा नाहीसा झाला त्या सृष्टीचाच नाश करण्याचा आणि एक नवी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. सगळे देव तिच्यापुढे नतमस्तक झाले आणि महादेवाने वचन दिले की तिचा मुलगा पुन्हा जिवंत होईल.
त्रिदेवांनी नव्या डोक्याला शोधण्यासाठी सगळं जग पालथं घातलं आणि एका बाळ हत्तीचे डोके घेऊन गणेशाच्या डोक्यावर बसवले. महादेवांनी जाहीर केले की, या दिवसापासून त्या मुलाला “गणेश” (गण + ईश: सगळ्या गणांचे स्वामी) म्हटले जाईल. अशाप्रकारे, गणेश हत्तीचे डोके असणारा देव म्हणून पूजला गेला.
आता ही अंगारकी चतुर्थी म्हणजे काय?
कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज होते. हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते.
ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं.
त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. (हाच तो दिवस होता अंगारकी संकष्टी चतुर्थी चा).
“स्वर्गात राहून अमृतप्राशन करण्याचे आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान” त्याने, त्याच्यावर प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा कडे मागितले. यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, “यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच “अंगारकी” ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील”.
“अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंकारका सारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील”.
त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हा पासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत / उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की, ज्यामुळे ‘२१ संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार’ असे वेदवचन ही दिले गेले आहे.
म्हणूनच उद्याच्या मंगळवारी (25/06/2024 | ज्येष्ठ कृ. ४ अंगारक संकष्ट चतुर्थी) येणारी संकष्टी चतुर्थीला अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्वाचे ईप्सित कामे मार्गी लागण्यासाठी, इच्छुकांनी उद्याची अंगारकी मात्र अवश्य धरावी.
कारण उद्या ब्रम्हांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य मंगल लहरी कैक सहस्र पटीने पृथ्वी कडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कुणीही उद्याची चतुर्थी धरणाऱ्यांस त्या पुण्यलहरींचा त्याला निश्चितच फायदा होतो आणि या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणुन, चंद्रदर्शन करुनच उपवास सोडावा. तसेच हेही ध्यानात असु द्यावे की, संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पध्दत मात्र अवलंबू नये.
कारण मुळातच बाप्पा ला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशा नुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करुन उपवास सोडणे केंव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच.
॥ श्री अंगारक स्तोत्रम् ॥
अंगारकः शक्तिधरो लोहितांगो धरासुतः। कुमारो मंगलो भौमो महाकायो धनप्रदः ॥१॥
ऋणहर्ता दृष्टिकर्ता रोगकृत् रोगनाशनः। विद्युत्प्रभो व्रणकरः कामदो धनहृत् कुजः ॥२॥
सामगानप्रियो रक्तवस्त्रो रक्तायतेक्षणः। लोहितो रक्तवर्णश्च सर्वकर्मावबोधकः ॥३॥
रक्तमाल्यधरो हेमकुण्डली ग्रहनायकः। नामान्येतानि भौमस्य यः पठेत् सततं नरः॥४॥
ऋणं तस्य च दौर्भाग्यं दारिद्र्यं च विनश्यति। धनं प्राप्नोति विपुलं स्त्रियं चैव मनोरमाम् ॥५॥
वंशोद्योतकरं पुत्रं लभते नात्र संशयः। योऽर्चयेदह्नि भौमस्य मङ्गलं बहुपुष्पकैः।
सर्वं नश्यति पीडा च तस्य ग्रहकृता ध्रुवम् ॥६॥
॥ श्री गणेशाय नम:॥
॥ गणपती बाप्पाची पारंपारिक आरती ॥
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.
Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.
Leave a Reply