प्राणशक्तीची अखंड बिजली वाचवा, तन आणि मन अजून स्मार्ट व तेजोमय होऊ द्या!: Save Your Infinite Life Force and Brighten the Mind, Body and Soul

मन मित्र आहे की शत्रु – नक्की काय?

भगवदगीतेमध्ये सांगितलेलं आहे की, आपल्याला वश झालेलं आपलं मन हे आपला मित्र असते आणि विस्कटलेलं चंचल मन हे आपला सर्वात मोठा शत्रू असते. ज्याने आपल्या मनाला जिंकलं, तो जणू काही स्त्रिलोकांमधला विजयी वीर मानता येईल. मनाची चंचलता आणि विषयलोलुपता प्रसिद्ध आहेच.

एक अनियंत्रित असलेलं मन एखाद्या अल्लड वासराप्रमाणे किंवा पक्ष्याप्रमाणे इकडे तिकडे, सर्व ठिकाणी, डोंगरदऱ्यात, कधी गुहेत, कधी रस्त्यावर कधी आकाशात उड्या मारतच असतं. मन सतत असंच अस्थिर राहिल्यामुळे माणसाचं जीवनही बऱ्यापैकी अस्थिर होऊन जातं. तुमच्या आकांक्षा भरपूर असतात. इच्छा असतात. कामना असतात. परंतु तुमच्या मनामध्ये सातत्य, दृढता आणि तत्परता जरा सुद्धा नसेल, तर अशा मनाची मनोभूमी काय उपयोगाची आहे? ती कायम चेष्टेचा विषयच ठरणार!

अशा अस्थिर मनामध्ये काही ना काही कारणाने असंतोष भरून राहत असतो. व्यावहारिक भाषेमध्ये ज्याला आपण जेलसी म्हणतो, अशा भावना मग आपोआपच यायला सुरुवात होते. मग कधी कधी एखाद्याची भरपूर प्रगती झालेली पाहून मनात जेलसी निर्माण होते. तर कधी कधी स्वतःच दुर्भाग्य पाहून खूप वाईट वाटतं. रडू येतं. बऱ्याचदा तुमच्या आयुष्यातील अपयशाचं खापर कोणावर तरी फोडण्याकडे तुमचा कल असतो. मन इतके विषण्ण होते की, स्वतःचं आत्मपरीक्षण करावं अशी इच्छा सुद्धा होत नाही.

स्मार्ट प्राण सप्लाय

दुर्दैवाने मनाची ही अशी असभ्य व असुसंस्कृत वागणूक आणि मनाच्या इच्छा पूर्ण करणं जगातील कोणत्याही गोष्टीने शक्य होत नसतं आणि मनाची ही अशी अवस्था झालेला कोणीही माणूस  अविवेकी बालिश बुद्धीने वागणारा, पेशन्स नसलेला व अविकसित बनत जातो.  हा व्यक्ती जनमानसामध्ये कॉन्फिडन्सने वावरू शकत नसल्यामुळे कधी कधी तर उगीचच कुप्रसिद्ध ही होतो.

मनाच्या एकाग्रतेतून काय साध्य करता येते? एक समजेल असं उदाहरण देते. एका ठिकाणाहून अविरत वाहणारा झरा किंवा जलप्रवाह तुम्ही पाहिलाच असेल आपलं मन या जलप्रवाहा प्रमाणेआहे, ते कसं हे पाहू. या सतत वाहणाऱ्या जलप्रवाहावर पाणचक्की म्हणजे टरबाइन बसवले तर या जलप्रवाहावरून आपल्याला वीज निर्मिती करता येते आणि ती वापरता येते. म्हणजे जोपर्यंत आपण या जलप्रवाहावर कोणताच वर्क केलं नव्हतं, तोपर्यंत हा नुसता वाहणारा जलप्रवाह होता. आपल्या मनाचंही तसंच आहे. जलप्रवाहावर टर्बाइन्स बसवल्यानंतर – इतके दिवस थोडे पाणी प्राप्त होण्याची सुविधा सोडली, तर काहीसा निरर्थक वाटणारा, झरा वीज निर्मितीमुळे खूप लाभदायक आणि उपयोगी वाटायला सुरुवात होते.

आपल्या मनामध्ये दडलेली जी प्रचंड प्राणशक्ती आहे, त्या शक्तीचे महत्व आणि नियोजन ज्यांनी जाणलं, ते आपलं संपूर्ण लक्ष या मनाला नियंत्रित करून त्याच्या शक्तीचा वापर करून घेण्याकडे असतं मनाच्या शक्तीला ओळखणाऱ्या व्यक्ती मनाची चंचलता थांबवतात आणि एकाग्रता वाढवण्याकडे लक्ष केंद्रित करतात. भरपूर अभ्यास करून पास होणारे विद्यार्थी, काही महत्त्वपूर्ण संशोधन करणारे शास्त्रज्ञ, हुशार वकील, निष्णात डॉक्टर, हुशार इंजिनियर्स आणि वेगवेगळे कुशल कारागीर या सर्वांना आपण का नावाजत असतो बरं?

तुमच्या अस्तित्वाला होणारा प्राणशक्तीचा पुरवठा

बरेच कवी, लेखक, चित्रकार, गायक, कलाकारांमध्ये जी प्रतिभा आपल्याला दिसून येते, ही त्यांच्या एकाग्रता व तन्मयतेचं फलित असतं. एखाद्या कुशल व्यापाऱ्याला तुम्ही पाहता ज्याने आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेलं असतं आणि तो यशस्वीपणे व्यवसाय करीत असतो. स्वतःचं ठरवलेलं लक्ष्य त्यालाच गाठता येतं, ज्याला अर्जुनाप्रमाणे बाणाचं टोक आणि चिमणी यांकडे लक्ष केंद्रित करता येतं. हे प्राणशक्तीचं केंद्रीकरण आहे.

तुम्ही एखाद्या भक्ताला किंवा साधकाला त्याच्या इष्ट देवामध्ये तन्मय व समर्पित झाल्यामुळे त्याला ईश्वरी कृपा व साक्षात्कार प्राप्त झालेला पाहिलाच असेल. तुम्ही समाधी हा शब्द ऐकलाच असेल. कदाचित समाधी अवस्था अनुभवलेली पण असेल ही समाधी अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या चित्ताला एकाग्र (प्राणशक्ती सम्मिलित करणे) करण्यामध्ये मिळालेलं परिपूर्ण यश असतं. म्हणजेच मनाच्या पातळीवर, ते आनंदासोबत ट्युन झालेले असतात.

या संपूर्ण चैतन्य जगतावर मनाचं साम्राज्य पसरलेले आहे. ज्यांनी मनावर – प्राणावर विजय मिळवलेला आहे, अशा ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये, त्यांच्या एकाग्रतेतून, पावित्र्यातून व सकारात्मकतेमधून वातावरणात जी स्पंदनं बाहेर पडतात, त्यांनी प्रभावित होऊन गाय आणि सिंह त्या आश्रमात एकत्र नांदताना तुम्ही पाहिलेले असतील. अनेक आत्मविश्वासपूर्ण प्राणशक्तीने भरपुर युगपुरुष आपल्या मनोबलातून आजूबाजूच्या जगाची विचारधारा बदलू शकतात. आपल्या देशात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांनी लोकांचे आयुष्य, त्यांचे विचार करण्याची पद्धत बदलवून टाकली आणि या सर्वांना मनाचे नियंत्रण व संयम शिकवले. 

पराप्रकृतीची चेतनाशक्ती :

आपली सृष्टी परा आणि अपरा अशा दोन विभागांमध्ये विभागलेली आहे. एकाला जडसृष्टी आणि दुसऱ्याला चैतन्य सृष्टी म्हणतात. शरीरामध्ये, मनाचे जे चैतन्य आहे ते पंचतत्वांचे सम्मेलन म्हणजे एकत्रित चैतन्य असे मानले जाते. आत्मा हा प्रकाश रुपी असतो. तरीही त्याला शरीराचाच अंश मानला जातो. आत्म्यालाही आपण माझा प्राण असे म्हणतो.

या शरीराप्रमाणेच विश्वव्यापी पंचतत्व अथवा पंचमहाभूते यांच्या संमेलित चैतन्याचे नाव ‘प्राण’ असे आहे. या प्राणशक्तीलाच जीवनशक्ती असे म्हणतात. ही प्राणशक्ती वायूमध्ये, आकाशामध्ये सर्वत्र सामावलेली असते. पण तरीही ती प्राणशक्ती या पंचतत्वांपेक्षा वेगळी आह। ज्याला आपण जड प्रकृती म्हणतो, म्हणजेच जड सृष्टी म्हणतो, ती सुद्धा वास्तविकत: जडसृष्टी नाही. त्यामध्ये सुद्धा प्राण भरून असत। एक गोष्ट लक्षात घ्यावी; ती म्हणजे प्राणांच्या अभावी कोणतीही वस्तू आपले कोणतेही स्वरूप धारण करून ठेवू शकत नाही. तसेच प्राणांच्या अभावी कोणत्याही वस्तूचे स्वाभाविक गुण स्थिर राहत नाही.

या प्राणांना आपण एक प्रकारची सजीव विद्युत शक्ती म्हणू शकतो. म्हणजेच लाईव्ह इलेक्ट्रिसिटी म्हणू शकतो. ही संपूर्ण प्राणशक्ती पूर्ण विश्वामध्ये आकाश, उष्णता आणि इथर यात पसरलेली आहे. सामावलेली आहे. हे प्राण तत्व ज्या प्राण्यांमध्ये अधिक प्रमाणात असतं किंवा वाढत असतं, तो अधिक स्फूर्तीवान, साहसी, सुदृढ व तेजस्वी दिसतो.  हा प्राण जेव्हा मनामध्ये व्यक्त होतो, तेव्हा त्याला मनाची प्रतिभा म्हणतात.

वीर्यामध्ये ही प्राणशक्ती भरपूर प्रमाणात असते. प्रत्येकाचा वर्ण कांती वेगवेगळी असते. सावळी गोरी, निमगोरी, गहू वर्ण परंतु ज्यांच्यामध्ये प्राणरुपी विद्युत शक्ती अधिक प्रमाणात असते त्यांच्या शरीरातून जणू काही तेज बाहेर पडत आहे, असे आपल्याला जाणवते. ही व्यक्ती किंवा जीव तेजस्वी दिसते आणि ज्याच्यामध्ये या प्राणशक्तीचा अभाव असतो ती व्यक्ती बाह्य सौंदर्याने कितीही छान असली तरीही समोरच्या माणसाला ती निस्तेज उदास अशी वाटते. याचाच अर्थ काय, तर आंतरिक तेजस्विता नसेल तर शरीराच्या बाह्य त्वचेतून दिसणारी सुंदरता निर्जीवच वाटते.

तुम्ही जेव्हा म्हणता की, एखाद्याचे अस्तित्व प्रभावशाली, लोभसवाणे व मनोहारी आहे, त्यावेळेला ते दुसरे तिसरे काही नसून त्याच्या प्राणशक्तीचे आधिक्य असते. आठवून पहा, तुम्हाला कुठे कुठे असे तेज आढळते – वनस्पती, वृक्ष, फुलं, छोटी बाळं वासरं, छोटी पिल्लं आकाशातले सुंदर दिसणारे चंद्र – तारे वृक्षांनी भरलेल्या डोंगर रांगांचे सौंदर्य तेजस्वी भासतं, हे त्यांच्यातल्या भरपूर प्राणशक्तीमुळेच जाणवतं. कधी एखादी व्यक्ती सुंदर वाटते, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्हाला छान वाटते.

एखाद्याची मधुर आणि मृदुलवाणी तुम्हाला आवडते. एखाद्याची विशिष्ट प्रतिभा व बुद्धिमत्ता तुम्हाला आवडते. एखाद्याचे कला कौशल्य तुम्हाला मोहित करते. एखाद्याचा भक्ती भाव समर्पण तुम्हाला खूप भावते. ही सर्व उदाहरणं तेजस्वी प्राण शक्तीची आहेत. या सर्वांच्यात प्राणशक्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला हे रेकग्निशन हृदयामध्ये जाणवतं.

प्राणशक्तीने परिपूर्ण मानव तुम्हीसुद्धा बनाल

काही जीवांमध्ये हे प्राण तत्व त्यांच्या पूर्वसंग्रहित संस्कार व पुण्याच्या संग्रहामुळे जन्मतःच भरपूर मात्रेमध्ये असते. हे त्यांचं सौभाग्य म्हणावं लागेल. पण तरीही  ज्यांच्यामध्ये ही प्राणशक्ती मूलतः कमी प्रमाणात आहे किंवा आता जाणवत आहे त्यांनी निराश व्हायची गरज नाही. आपल्या प्रयत्नांनी कोणीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आपल्यामध्ये प्राणशक्तीची वाढ करू शकतो. कुठून आणणार ही प्राणशक्ती, तर ती समस्त ब्रम्हांडात अखंड अविरत आणि भरपूर प्रमाणात पसरलेली असल्यामुळे ते मुबलक प्रमाणात सर्वांसाठी उपलब्ध आहे.

आपल्या वागणुकीतून म्हणजेच आचरणातून शिस्तबद्धतेमधून, साधनेमधून, योगांमधून, कला कौशल्या मधून, निस्सीम भक्ती मधून काही जण ही प्राणशक्ती भरपूर प्रमाणात प्राप्त करतात. लेखाच्या सुरुवातीला मन या विषयापासून सुरुवात केली आहे आणि मग प्राण या विषयावर मी विश्लेषण करीत आहे कारण ज्या मनाला आपण ओळखतो जाणतो त्याच्या ऍक्टिव्हिटीज पाहत असतो त्या मनाला आणि एकंदर शरीराला मुबलक प्रमाणात प्राणशक्ती हवी असते आपली प्राणशक्ती विविध मार्गाने वाया जात असते संपत असते.

तुम्ही म्हणाल की नेहमीच्या कार्यामध्ये म्हणजे आपल्या रूटीनमध्ये काम करण्यासाठी प्राणशक्ती ही लागणारच. मग ती वाया गेली असं कसं म्हणता येईल? तर मला तसं नक्कीच म्हणायचं नाहीय. या विश्वात आपलं जे अस्तित्व आहे, मन शरीर आत्मा यांनी युक्त असं हे जे अस्तित्व आहे, याला लागणारी प्राणशक्ती आपोआप आपल्याला विश्वाकडून प्राप्त होत असते. कारण आपण जिवंत तर आहोत. पण ही प्राणशक्तीची जाणीव (कॉन्शसनेस) तुमच्यामध्ये पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे, बऱ्याच अवाजवी ठिकाणी तुम्हाला मिळत असलेली प्राणशक्ती फुकट जाते आणि आजच्या युगाबद्दल भाष्य करावयाचे तर मॅक्झिमम प्राणशक्ती मनाच्या माध्यमातून वाया जाते.

आपला आहार विहार व्यवस्थित असेल तर आपण बलवान असतो. तसेच थोड्याफार प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात व्यायाम करून आपण आपले आरोग्य अजून शक्तिशाली बनवत असतो. माणूस कितीही सुदृढ असला तरी व्यायामाचे महत्त्व कमी होत नाही. तसेच आपले स्वास्थ्य कायम मजबूत राहावे म्हणून प्राणशक्तीची वृद्धी होईल व आधीपासून आपल्यात असलेल्या प्राणशक्तीचे संवर्धन होईल यासाठी प्रयत्न करायला हवे. 

प्राणशक्तीची अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने प्राणायामाचे महत्त्व विशेष आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर प्राणांच्या व्यायामाला प्राणायाम म्हणतात.

पुढील एका लेखात मी प्राणायामाची माहिती विस्तृतपणे देईनच. तर इथे विषय असा आहे की, आपल्याला वाया जाणारी प्राणशक्ती वाचवता येते व प्राणशक्ती कमी असेल तर ती वाढवता येते. एखाद्या हॅप्पी मूवी प्रमाणे कायम आनंदाने उत्साहाने भरलेलं आपलं आयुष्य नक्कीच नसेल; परंतु बुद्धीतील विवेक जागृत ठेवला व मनाला नेहमी सकारात्मक दृष्टिकोनाची सवय लावली, शक्य तितके कल्याणकारी व हिताच्या गोष्टींकडे आपले लक्ष आपले मन एकाग्र ठेवले, दुराचारी व घातक गोष्टी व मनोवृत्तींपासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न केला, स्वतःची उन्नती व उत्थान यासाठी मेहनत घेउन कायम गतिशील राहिले, तर आपली सर्वत्र वाया जाणारी प्राणशक्ती वाचायला सुरुवात होईल. तसेच अधिकाधिक प्राणशक्ती ग्रहण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आपोआप निर्माण होईल यात शंका नाही.

आयुष्यात अनेक ठिकाणी आपल्याला संघर्ष पेलावा लागतो. कधी बाहेरच्या विश्वासोबत संघर्ष, तर कधी स्वतःशीच संघर्ष! आपला बराच संघर्ष नकारात्मकते सोबत असतो. अशावेळी आपल्याला अतिरिक्त प्राणशक्तीची गरज नेहमीच भासत असत। जेव्हा आपण आत्मकल्याणाच्या मार्गावर चालत असतो त्या वेळेला प्राणशक्ती वाचवणे व प्राणशक्ती अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करणे अनिवार्य ठरते.

शरीर व मन यांत प्राणशक्तीचा अभाव झाला, ही प्राणशक्ती क्षीण झाली, तर असे शरीर सुद्धा क्षीण होते आणि मन ही कमकुवत होते. मेस्मेरिझम, हिप्नॉटिझम आणि स्वर विज्ञान यासारख्या अनेक वैज्ञानिक चिकित्सा पद्धतींमध्ये या प्राणांचाच विचार करून प्रणाली तयार केलेली आहे. तुम्ही आजारी पडता म्हणजे काय होतं तर तुमची प्राणशक्ती कुठे ना कुठे क्षण झालेली असत। ही अधेमध्ये क्षीण झालेली प्राणशक्ती संपूर्ण शरीराच्या व मनाच्या प्राणशक्तीचे संतुलन बिघडवते.

जपानचे सुप्रसिद्ध डॉक्टर शेराभुज  यांनी विशुद्ध रूपातील प्राणायामाच्या आधारे स्वतःचा क्षयरोग बरा केला आणि हा रोग बरा झाल्यामुळे त्यांनी अनेक लोकांना या पद्धतीने बरे करण्याचे ठरवले व तसे केले.

भारतातले योगीजन या प्राणांचा उपयोग शरीर आणि मनाची सर्वसाधारण प्रगती साधणे आणि भौतिक समस्यांवर तोडगा काढणे यासाठी या प्राणशक्तीच्या अभ्यासाचा उपयोग अनेक वर्षापासून करत आले आहेत.

श्वासोच्छ्वास व प्राण:

केवळ श्वासोच्छवासाच्या क्रियेमधूनच प्राणाला ग्रहण करणे शक्य असते.  यात गंमत अशी आहे की हा प्राण → वायुमध्ये मिक्स झालेला असतो. त्यामुळे आपल्याला फक्त वायुचा स्पर्श किंवा वायुची जाणीव समजते आणि या प्राणाच्या जाणिवेला आपण सहसा ओळखत नसतो. खरंतर प्राणवायु हा शब्द अशाच दोन गोष्टींच्या संयोगाने बनलेला आहे आणि तो आपण एकत्रितपणे का बोलतो कारण त्या दोघांचा संबंध दूध आणि गोडव्याचा संबंध जसा आहे तसाच आहे. दुधापासून गोडवा वेगळा काढू शकत नाही त्याप्रमाणे आहे.

आपल्या श्वासोच्छवासाच्या वेळी शरीरात आपोआप ग्रहण केला जाणारा प्राणवायू कधी कधी आपल्याला कमी वाटतो. याचं कारण हवेतला प्राण आपण कमी प्रमाणात घेतलेला असतो आणि समजा योग्य प्रमाणात घेतला तरी तो बऱ्यापैकी जास्त खर्च झालेला असतो प्राणायामासारख्या वैज्ञानिक योगक्रियामार्फत अजून प्राण आपल्याला आत घेता येतो.

बाहेरील विश्वातून घेऊन अधिकाधिक प्राण धारण करता येणे, म्हणजेच स्वतःची जीवनशक्ती वाढवणे, तसेच शरीराची व मनाची व आत्म्याची ताकद वाढवणे होय. जेव्हा विविध मार्गाने आजूबाजूच्या आसमंतातील प्राण आपल्याला हव्या तितक्या प्रमाणात आत मध्ये खेचून घेता येणे आणि त्याला धारण करून ठेवता येणे ही क्षमता जेव्हा माणसांमध्ये निर्माण होऊ लागते तेव्हा हा मानव देह एखाद्या मोठ्या विजेच्या पॉवर स्टेशन प्रमाणे बनतो. असे पॉवर स्टेशन ज्यामध्ये तो स्वतःचही कल्याण करतोच त्याचसोबत तो इतरांचंही कल्याण करण्याच्या पात्रतेचा बनतो.

जितकी पाहिजे तेवढी प्राणशक्ती जेव्हा हवी तेव्हा मिळवता येणे, ही आपली सर्वात मोठी जमापुंजी आहे, क्षमता आहे. याला आपण प्राणशक्तीवर राज्य करणे किंवा सत्ता गाजवणे म्हणून शकतो आणि ही सत्ता गाजवायला ज्या सत्ताधीशांना जमते, ते काम कोणताही धनाढ्य, बलवान अथवा सत्ताधारी व्यक्ती यांना जमू शकत नाही.

जिज्ञासू गुणिजन हो, तुम्हाला हे जेव्हा जमेल तेव्हा नक्कीच प्राप्त होईल. परंतु तोपर्यंत शरीर आणि मनाच्या पातळीवर होणारा प्राणशक्तीचा ऱ्हास थांबवणे, तुमच्या हातात आहे. किंबहुना तुम्ही ठरवलं तर प्राणशक्तीचा अपव्यय तुम्ही थांबवू शकता. नकारात्मकतेची औदासिन्याची कास सोडून द्या आणि आनंदी राहा. क्रिएटिव्ह राह। दुःखदायक क्लेशकारक व्हायब्रेशन्स पासून स्वतःला दूर ठेवा. आताच्या भाषेत सांगायचं तर स्वतःचं  एक्सप्लॉयटेशन होऊ देऊ नक। नेहमी अलर्ट रहा.

श्वासाद्वारेच प्राणांची ये-जा चालू असते हे आपण पाहिले. श्वासाचा आणि विचारांचा गहिरा संबंध आहे. आपल्या विचारांची गुणवत्ता बदलली की, श्वासांची ही गुणवत्ता बदलते. क्रोध, संताप, शोक यांनी जे विचार सुरू होतात, त्यांनी श्वासाची लय बदलते. तसेच अतिशय शांततेचे, मनोहारी मायेचे विचार जेव्हा सुरू होतात, तेव्हाही श्वासाची लय बदलते. अशा वेळेला आपली प्राणशक्ती खर्च होत राहते. हीच आपल्याला वाचवायची आहे व स्वतःला स्ट्रॉंग, धैर्यवान व तेजस्वी बनवायचे आहे.

आता नेहमीची विनंती — हा लेख आवडल्यास जरूर कळवा. अन्य लेखांप्रमाणेच हा लेख ही मी स्वतः लिहिलेला आहे हा लेख कॉपीराईटेड आहे कॉपीराईट कायद्याचे व कर्म सिद्धांताचे उल्लंघन करू नये. स्क्रीनशॉट किंवा copypaste करु नये. लिंक शेअर करा.

माझ्या सर्वच लेखांच्या शेवटी संपर्काचा नंबर दिलेला असतो. हिप्नोथेरपी व अन्य कोणत्याही थेरपी साठी संपर्क करावयाचा असल्यास दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर फक्त मेसेज कराव। उपचारांचे सेशन्स सुरू असतात. त्यामुळे डायरेक्ट फोन करू नये. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life Coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*