वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी “अक्षय तृतीया” हा सण साजरा केला जातो अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे याच दिवशी त्रेतायुगाचा आरंभ झाला. एका काळाचा अंत आणि दुसऱ्या युगाचा आरंभ अशी संधी या अक्षय तृतीयेच्या दिवशी साधली गेली. त्यामुळे हा अख्खा दिवसच मुहूर्ताचा मानला जातो. याचा अर्थ अंत आणि प्रारंभ यांच्या संधी काळाचा जो क्षण होता, तो क्षण या संधी काळात आल्यामुळे अख्या दिवसाचा मुहूर्त मानला जातो.
अक्षय तृतीयेच्या दिवशी देव आणि आपले जे कोणी मृत झालेले पितर असतील ते सर्व आशीर्वाद देण्यासाठी आपल्या समीप येतात. आपल्या मृत्यूलोकामध्ये उतरतात
“अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ॥”
अर्थात: (श्रीकृष्ण म्हणतात) हे युधिष्ठिरा, या (अक्षय तृतीया) तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून वारेमाप पुण्य मिळते. बरीच पापे न्यून (न्यूट्रल) होतात व पुण्यसंचय वाढतो. पुण्यसंचय वाढणे याचा अर्थ तुम्ही सकारात्मकता, सात्विकता, पावित्र्य यांची वृद्धी असा नक्कीच घेऊ शकता.
तर अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले पितृ कार्य व दानधर्म, देवभक्ती हे सर्व ईश्वरी तत्वाच्या समीप नेणारे ठरते.
कोणकोणते दान तुम्ही करू शकता ते आपण पाहूया:
1. जलकुंभ दान: अक्षय तृतीयेच्या दिवशी जलाने भरलेल्या कुंभाचे दान करावे
2. सामाजिक सेवा दान: अक्षय तृतीयेच्या दिवशी एखाद्या उपयुक्त सामाजिक उपक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यावा.
3. धनाचे दान: अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्यांना धनाची, वस्तुची आवश्यकता आहे, अशा गरजू व्यक्तीला धनाचे दान करावे.
4. मनाचे दान: अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराण्याच्या कुलदेवतेचे, घराण्याच्या मूळपुरुषाचे, ग्रामदेवतेचे मनोमन स्मरण करावे. आपल्या परिवारासाठी त्यांच्या मंत्राचा / स्तोत्राचा मानसिक जप करावा.
अक्षय तृतीयेचे अजून महत्त्व काय आहे ते पाहूया:
अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र कंपनलहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवरील मर्त्यलोकात (आपल्या) येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.
या अक्षय तृतीया तिथीला दत्तपूजन, विष्णुपूजा, जप, होमहवन, दान, आराधना इत्यादी सत्कर्मे केल्यास आध्यात्मिकता अधिक मजबूत होते. धन-शांतता-समृद्धी प्रत्येकाला हवी असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्या देवतेची, कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते.
अजून काय काय करता येईल अक्षय तृतीयेच्या दिवशी हे आपण पाहूया:
पितरांच्या नावाने तिळ तर्पण करा. पितरांना सदगती मिळावी, म्हणून ईश्वराकडे प्रसन्न मनाने प्रार्थना करा. यासाठी विष्णुसहस्त्रनामाचे वाचन करा. तसेच आपल्याला व आपल्या येणाऱ्या पुढील सर्व पिढ्यांना पितृंचे आशीर्वाद लाभावे म्हणून प्रार्थना करा. मातीचे पूजन करा. जलकुंभ दान करा. वृक्षारोपण करा. गरजूंना हव्या असलेल्या वस्तूंचे दान करा. नातेवाईकांना किंवा समाजात इतरही कोणालाही भेटताना मनात सात्विक निर्मळ प्रेमळ भाव ठेवून भेटा.
अक्षय तृतीयेच्या दिवशी भोजन काय करावे:
अक्षय तृतीयेच्या दिवशी मनाला भावणारे सात्विक भोजन करावे. पुरणपोळी करावी स्वतः खावी. देवाला खाऊ घालावी आणि पितरांनाही खाऊ घालावी. निसर्गातील पशुपक्षी कीटभ्रमरांनाही अन्नदान करावे.
पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्यासाठी किती सोप्या गोष्टी तुम्हाला सुचवल्या आहेत!! या अतिशय सोप्या आणि फलदायी आचरणातून आपण अक्षय तृतीयेचा सण प्रसन्न मनाने परम आनंदामध्ये साजरा करूया. सर्व पितरांचा सर्वांना शुभाशीर्वाद प्राप्त होवो आणि आपणा सर्वांवर ईश्वर व सदगुरुंची अखंड कृपा राहो.
लेख आवडल्यास जरुर फीडबॅक कळवा. हा लेख सुद्धा copyrighted आहे. स्क्रीनशॉट अथवा कॉपीपेस्ट करु नये. लिंक शेअर करावी. मी लिहिलेल्या माझ्या WhatsApp फोन नंबरवर मेसेज करावा. डायरेक्ट फोन करु नये. online व one to one संमोहन उपचार सेशन्स, शारिरीक व मानसिक निसर्गोपचार या कामांमध्ये मी व्यग्र असते.
डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर
9820373281 (WhatsApp only) Hypnotherapist, Mind Counselor, Life coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.
Nice & Useful Information for New Generation also.
धन्यवाद.
छान माहीती धन्यावाद ताई
thank you अभिप्राय दिल्याबद्दल. शक्य झाल्यास इतरही लेखा वाचा. अभिप्राय सांगा.