क्रिस्टल्स: भूगर्भीय विश्वातील स्वर्गीय स्पंद Crystals : Heavenly Vibrations in the Subterranean Universe

“परात्परतरं ध्येयं, नित्यमानंदकारकम् | हृदयाकाशमध्यस्थं, शुद्धस्फटिकसन्निभम् ||११३|| स्फटिकप्रतिमारूपं, दृश्यते दर्पणे यथा | तथात्मनि चिदाकार-मानंदं सोऽहमित्युत ||११४||”

(संदर्भ : स्कंदपुराण – गुरूगीता)

हा गुरुगीतेतला श्लोक सर्वश्रुत आहेच. पहिल्या श्लोकात पराहून पर, ध्यानाचे लक्ष्य, नित्य आनंद देणाऱ्या आणि हृदयाकाशाच्या मध्यभागी स्थित असलेल्या, शुद्ध स्फटिकासमान निर्मल अशा गुरूच्या चिन्मय स्वरूपाचे वर्णन केले आहे. तर दुसऱ्या श्लोकात म्हटलंय, जसे दर्पणात, आरशात शुद्ध स्फटिकाची प्रतिमा दिसते, त्याप्रमाणेच आत्मप्रकाशात चिदाकार तो मीच हा सोऽहं भाव प्रगट होतो. या श्लोकांचा अर्थाअर्थी तसा संबंध स्फटिक चिकित्सेशी नसला तरी स्फटिकाची शुचिता, पावित्र्य आणि माहात्म्य कळण्यासाठी या उपमा अतिशय सार्थ ठरतात. हे स्फटिक ‘क्रिस्टल्स’ या त्यांच्या इंग्रजी नावानेच प्रसिद्ध आहेत.

गुरूच्या रुपाला शुद्ध स्फटिकाची उपमा दिली आहे. तसेच चिदाकाश दर्पणात उमटणाऱ्या आनंदमयी सोऽहं भावालाही स्फटिकाची उपमा दिली आहे.

वाचकांनी इथे ध्यानात घ्यायला हवं की, स्फटिक म्हणजे क्रिस्टल व ग्रहांची रत्ने हे दोन वेगवेगळे विषय आहेत. साम्य म्हणावं तर आई धरित्रीच्या पोटातच दोन्ही सापडतात. हा क्रिस्टल शब्द आला कुठून? तर तो ग्रीक शब्द आहे ‘क्रिस्टेलॉस’ – म्हणजे पारदर्शक बर्फ किंवा पवित्र बर्फ. ध्रुवीकरण झालेली सूर्यकिरणे या क्रिस्टलमध्ये आविष्कार घडवतात. क्रिस्टल आणि माणसाचं नातं खूप जुनं आहे. सर्वच प्रमुख संस्कृतींमध्ये क्रिस्टलला अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक संस्कृती वर उल्लेखिल्यानुसार क्रिस्टल्सना शरीर, मन व आत्मा यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवू शकणारे ‘शक्तिशाली स्त्रोत’ समजतात. हे मनावर, बुद्धीवर, व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव टाकतात. इंग्रजीत या क्रिस्टल्सना ‘सेमीप्रेशियस स्टोन्स’ म्हणतात. कारण खरोखरच ते ग्रहरत्नांपेक्षा स्वस्त असतात. त्यांना साईड इफेक्ट नसतात. 

अगदी नाट्यपूर्णपणे या क्रिस्टल्सच्या दुनियेत मी प्रवेश केला. अनेक वर्षे मी व माझा भाऊ संमोहन उपचाराच्या क्षेत्रात आहोत. काही क्रिस्टल्सचे उत्तम परिणाम निदर्शनास आल्यामुळे, अर्थातच अनुभवल्यामुळे या क्रिस्टल्सच्या मनोहारी विश्वात आम्ही पाऊल ठेवले. त्यातल्याच एका ‘ब्लॅक टूरमालीन’ नावाच्या क्रिस्टलस्टोनला (ज्याच्या देवाच्या मूर्त्याही बनवतात, जो वाईट स्पंदनांना रोखण्यात अद्वितीय आहे) तर मी ‘एहसानमंद पत्थर’ असे नाव दिले आहे. वेगवेगळ्या स्वरुपात या क्रिस्टल ना आपण शरीराजवळ बाळगून, वास्तुमध्ये ठेऊन व वास्तुच्या जमिनीत ठेवल्यामुळे खूप फायदा होत असल्याचे लक्षात आले आणि त्यातूनच एका सखोल संशोधनाची निर्मिती झाली. 

कोणकोणत्या संस्कृतींमध्ये क्रिस्टलला पवित्र धार्मिक महत्व आहे ते पाहूया. अमेरिकेत चेरोकी आदिवासींच्या समाजात पारंपारिक मान्यता क्रिस्टल्सना आहे. ग्रीक, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी मध्ये क्रिस्टलला महत्व आहे. तिबेटीयन संस्कृतीत तर जीवनातील सर्व अंधकार दूर करू शकणारे, पावित्र्य व मांगल्य प्रदान करणारे, आध्यात्मिक प्रगतीला पोषक ठरणारे दैवी क्रिस्टल्स असे म्हटले जाते. 

क्रिस्टल्स मोहक आहेत, चित्ताकर्षक आहेत, त्यांना रंग- विविधता आहे, ते त्यांच्या गुणांनी सुवासिक आहेत, चिरतरुण आहेत. कुठल्याही काळामध्ये, ऋतूमध्ये, हवामानामध्ये स्वतःचं  अस्तित्व अबाधित ठेऊ शकणारे चमत्कृतीपूर्ण आविष्कार आहेत. विशेष म्हणजे त्यांची मोहकता पृथ्वीचा चुंबकीय दाब, अंतर्गत उष्णता, विविध भौगोलिक परिस्थिती या सर्वांच्या परिणामांनी कमी होत नाही, तर अजूनच वाढते. प्रत्येक रत्न मानवाला वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव देते, हिलिंग तरंगलहरी देते. आपल्याला सर्वांना माहितच असेल की, ‘ग्रहांची रत्ने’ फारच विचारपूर्वक घ्यावी लागतात आणि ती चुकल्यास परिणाम पण वेगळे असतात. ही रत्नं चुकीची धारण केल्यास, त्याचे नकारात्मक परिणाम सहन करावे लागतात. पण हे सेमीप्रेशिअस क्रिस्टल्स चुकून किंवा सौंदर्याविष्कार म्हणून परिधान केले तरी त्याचे मुलभूत काम ते करतच राहतात. हे क्रिस्टल्स अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असतात. अहोरात्र तुमच्यावर चांगला प्रभाव टाकतात. 

आता या क्रिस्टल्सचे मुलभूत काम काय? ही जिज्ञासा नक्कीच जागृत झाली असेल वाचकांची. क्रिस्टल्सचे मुलभूत काम म्हणजे क्रिस्टल्स वापरणाऱ्याचा ऑरा (प्रभामंडळ) निर्मल बनवतात. पॉझिटिव्ह एनर्जी प्रसारित करणे, निगेटिव्ह एनर्जी अ‍ॅबसॉर्ब करणे आणि जर काही विशिष्ट प्रोग्राम केल्यास निगेटिव्ह एनर्जी अनाकर्षित करणे, हे काम कोणताही क्रिस्टल करतोच. प्रोग्राम म्हणजे सिद्ध करणे. अर्थातच त्यांचे रासायनिक घटक, घनता, जडत्व व काठीण्य यातील विविधता क्रिस्टलचे विविध प्रकार दर्शवतात. अतिथंड व अतिउष्ण भागात क्रिस्टल्स बनतात. क्रिस्टल्स सतत वैश्विक ऊर्जा खेचत राहतात. या वैश्विक ऊर्जेची स्पंदने शरीर, मन, वास्तू व वातावरण यावर प्रभाव टाकतात. यातले अद्वितीय गुणधर्म शरीर, मन, बुद्धी, चेतना यावर परिणाम करतात, अर्थातच चांगला.

थोडं रसायनांच्या दुनियेत जाऊया. क्वार्ट्झ हा क्रिस्टल सिलिका + प्राणवायू या मिश्रणाने बनतो. ॲल्यु‍मिनियम + क्रोमियम + मॅग्नेशियम + सिलिका + पाणी या मिश्राने ब्लड स्टोन बनतो. गंधकयुक्त, क्षारयुक्त, ऑक्सिजनयुक्त वातावरणात क्रिस्टल्स बनतात. वेगाने सरकणाऱ्या काळाचा, उष्णतामानाचा, थंडीचा व दाबाचा परिणाम होऊन क्रिस्टल्स बनतात. वैश्विक किरण  वाहणारे क्रिस्टल्स उर्जेचे उत्तम वाहक आहेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे क्रिस्टलला आपण उत्तम प्रोग्राम करू शकतो. आपल्या व्याधी अथवा इतर आवश्यकतेनुसार. म्हणूनच तर घड्याळात व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणात क्रिस्टल्स वापरतात. तुम्ही घड्याळाच्या डायलवर quartz असा शब्द लिहिलेला पाहिला असेलच. क्वार्ट्झ फॅमिलीतील (गटातील) क्रिस्टल्स, जसे रोझ (गुलाबी पारदर्शक) क्वार्ट्झ, क्लिअर (सफेद पारदर्शक) क्वार्ट्झ, अ‍ॅमेथिस्ट (जांभळा पारदर्शक – जंबुमणी) यांना उत्तम प्रोग्राम करता येते.

रोग्याच्या किंवा वापरकर्त्याच्या आवश्यकतेनुसार, डिमांडनुसार क्रिस्टल प्रोग्राम करता येतात. मात्र जो प्रोग्राम केला आहे, तो ध्यानात ठेवावा. तसेच अकल्याण करणार्‍या विपरीत सूचना क्रिस्टलला देऊ नयेत. कारण तो दिव्यातून बाहेर पडणाऱ्या किंबहुना दिव्यातच राहणाऱ्या जीनिप्रमाणे आहे, “जो हुकुम….” म्हणणारा. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह सूचनाच द्याव्यात. 

क्रिस्टल्स पारदर्शी व अपारदर्शी दोन्ही असतात. अपारदर्शींना सेमीप्रेशिअस स्टोन्स म्हणतात. त्यांचे विविध रंग व भौमितिक आकार आपली चक्रे प्रभावित करतात. चला, आपण क्रिस्टल्सच्या या अद्वितीय दुनियेची सफरच करुया आता.

हृदय व चयापचयावर काम करणारा हिरवा अ‍ॅमेझोनाईट, उत्तम आध्यात्मिक प्रगती साधणारा व ब्रेन डेव्हलपमेंट करणारा जांभळा अ‍ॅमेथिस्ट (जंबुमणी), कॅल्शियम भरून काढताना मदत करणारा पिवळा केशरी कॅलसाइट, ओटीपोटावर कार्य करणारा लाल कार्नेलिअन, पचन व मज्जासंस्थेवर प्रभाव टाकणारा सिट्रीन, त्वचारोगावर काम करणारा हिरवा अ‍ॅव्हेन्च्युरिअन, रक्तनिर्मिती व रक्ताभिसरणास मदत करणारा लाल ब्राऊन ब्लडस्टोन, नकारात्मकता घालवणारा काळा ऑनिक्स, किडनीस लाभदायी असणारा जेड, थायरॉइडवर काम करणारा व अतींद्रियशक्ती वाढवणारा गडद निळा लापिस लाझुली, प्रजननास मदतगार असा स्मोकी, भित्र्या माणसामध्येही धडाडी (डेअरिंग) निर्माण करणारा सोनेरी तपकिरी टायगर आय, नकारात्मक शक्तींशी दोन हात करणारा काळा टूर्मालीन, फुप्फुसासाठी उत्तम असा पिवळा पायराईट, इ. असे विविध परिणामकारक क्रिस्टल्स आहेत. क्वार्ट्झ फॅमिलीतील सर्व क्रिस्टल्स खूपच उत्तम ‘प्रोग्रामर’ आहेत. काही विशेष यवनी क्रिस्टल्स पण प्रभावी आहेत.

सात चक्रांसाठी वेगवेगळे क्रिस्टल्स सुचवले जातात, ते पुढीलप्रमाणे, मूलाधारचक्र – रेड जास्पर, स्वाधिष्ठानचक्र – कॅलसाइट, मणिपूरचक्र – सिट्रीन, अनाहतचक्र – जेड, विशुद्धचक्र – टरक्वाईझ, आज्ञाचक्र – लापिस लाझुली, सहस्त्रारचक्र – अ‍ॅमेथिस्ट. या व्यतिरिक्त प्रत्येकाच्या सूर्य राशीनुसार (दिनांकावर आधारीत) क्रिस्टल्सचे कॉम्बिनेशन सेट दिले जातात.

क्रिस्टल्सचा वापर आम्ही सप्तचक्र हिलिंग साठी करतो. यात व्यक्तीच्या प्रत्येक चक्रावर त्या चक्रांसाठी विशिष्ट कार्य करणारे क्रिस्टल्स (गुळगुळीत स्टोन्स) ठेवले जातात. तसेच शरीराभोवती ही रचना (ग्रीड) केली जाते. हिलरच्या हातामध्ये क्रिस्टलचाच लोलक (लंबक) धरला जातो. हिलरच्या आदेशानुसार व आवश्यकतेनुसार हा लंबक फिरत राहतो आणि वैश्विक ऊर्जा त्या चक्राला पोचवत राहतो. अणूच्या ‘अ‍ॅटोमिक स्ट्रक्चर’चे जे चित्र आपण नेहमी पाहतो, नेमके तशाच स्वरुपात या लंबकाचे फिरणे असते. हिलिंग करून झाल्यावर हा लंबक थांबतो. एखादे चक्र पूर्णपणे सुव्यवस्थित असेल तर लंबक जागीच थांबतो, फिरत नाही, हा लंबकसुद्धा क्रिस्टलचा घ्यावा. सर्वात चांगले लंबक (पेंडूलम) हे गुलाबी क्वार्ट्झ, सफेद क्वार्ट्झ व अ‍ॅमेथिस्टचे असतात. तसेच आतातर सात चक्राचे स्टोन्स एकत्र असलेले पण लंबक (लोलक) असतात. या क्रिस्टलच्या लंबकाचा वापर प्रश्नोत्तरे शोधण्यासही केला जातो. ज्याला ‘लंबक विद्या’ (पेंडुलम विद्या) म्हणतात. हे लंबक मात्र टोकाशी शेवटी निमुळते होणारे असतात. वरचे टोक दोऱ्याला बांधलेले असते. हातात धरलेला क्रिस्टल लंबक जेव्हा लीलया हवा तसा फिरू लागतो, तेव्हा क्रिस्टलच्या वैश्विक ऊर्जावाहकतेची खात्री पटते.

हे सर्व क्रिस्टल्स गळ्यात घालता येतील अशा पेन्सील पेंडट आणि लॉकेटच्या स्वरुपात, हातात घालण्याचे ब्रेसलेट (यात विविध क्रिस्टल्सने बनवलेले पैलू पाडलेले मणी असतात), गळ्यात घालण्याच्या माळा आणि फॅशन स्टेटमेंट पूर्ण करणारे नेकलेस, कानातले डूल अशा विविध स्वरुपात येतात. चिमुकल्या पिरॅमिडपासून मोठ्या पिरॅमिडपर्यंत सर्व प्रकारचे क्रिस्टल्स असतात. या विशिष्ट पिरॅमिड आकारामुळे ईश्वराकडून ऊर्जा घेऊन ते आपल्या विश्वात पसरवण्याचे काम हे क्रिस्टल्स चोखपणे करतात. हा सर्व माझा क्रिस्टल मित्रपरिवार आहे!

वास्तूचे नुतनीकरण, बांधणी करत असताना किंवा नविन वास्तू बांधत असताना हे क्रिस्टल्स (तज्ञांच्या सल्ल्यानुसार निवडावे) चुऱ्याच्या स्वरुपात जमिनीत टाकावे. त्याचा संपूर्ण वास्तूवर उत्तम प्रभाव पडतोच, पण जमिनीखालचे ऊर्जाप्रवाह म्हणजेच ‘जिओपॅथिकल स्ट्रेस’ नियंत्रित करण्यासाठी यांचा उत्तम उपयोग होतो. या जिओपॅथिकल स्ट्रेसबद्दल खूप कमीजण जाणतात. हे प्रवाह आपल्या आरोग्यावर, मनावर, आत्म्यावर व वातावरणावर विपरीत परिणाम करत असतात. या अहितकारी स्पंदनांना आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून क्रिस्टल्स रोखतात. अर्थात हे सुद्धा प्रोग्राम केलेले असावेत.

आश्चर्याची बाब म्हणजे हे क्रिस्टलचे अणु (परमाणु) थ्री-डायमेंशनल रचनेत आढळतात. क्रिस्टलचे कितीही तुकडे करा, तो आपली मुलभूत रचना बदलत नाही. ही रचना घन, त्रिकोण, चौकोन, षटकोन अशी कोणतीही असू शकते. निसर्गामध्ये एवढे आघात सोसूनही त्यांची मूळ भौमितिक रचना बदलत नाही, कायम राहते. क्रिस्टलचा हा गुण म्हणजेच देवत्व असावं. क्रिस्टलचे पिरॅमिड स्वरूपसुद्धा विशेष परिणाम देणारे आहे.

क्रिस्टलचा रंग त्याची स्पंदनशक्ती ठरवते. आपल्या शरीरातही विविध रासायनिक प्रक्रियांची स्पंदने असतात. त्यांच्याशी जुळवून घेण्याचं काम क्रिस्टल्स करतात. आम्ही अनेक वर्षे संमोहन उपचारात कार्यरत असताना क्रिस्टल थेरपीकडे वळलो, ते त्यांच्या क्वांटम भौतिक गुणधर्मांमुळे. ‘क्वांटम भौतिक शास्त्र’ म्हणजे अध्यात्माचे आधुनिक नाव. जरा पाहूया काय साम्य आहे अध्यात्मशास्त्र व भौतिकशास्त्र यामध्ये. भौतिक शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे आणि जिथे ऊर्जा आहे तिथे अणुचं अस्तित्व चलायमान आहे. म्हणूनच प्रत्येक गोष्ट जीवित आहे. तसेच विश्वात प्रत्येक गोष्ट स्पंदित होत आहे, आकुंचित व प्रसारित होत आहे. वेदना हे आकुंचन आहे, तर आनंद हे प्रसारण आहे. क्रिस्टल्स आनंद प्रसारित करतात, वेदना अनाकर्षित करतात. परिधान केलेल्या किंवा बाळगलेल्या क्रिस्टलसोबत एक नाते प्रस्थापित करावे, जेणेकरून तो खूप आश्चर्यकारक परिणाम दाखवतो. ही अंधश्रद्धा व तत्वज्ञान नाही, तर शास्त्र आहे. कदाचित हेच मर्म जाणून आपल्या पूर्वज संतमहात्म्यांनी क्रिस्टल्स चा अंगिकार केला असावा.

क्रिस्टल थेरपिस्ट्स या नात्याने क्रिस्टलकडे वस्तू वा सेमि-प्रेशिअस स्टोन असे फक्त न पाहता एक जीव म्हणून पहावे, अशी आग्रही भूमिका क्रिस्टल्स देत असताना मी ठेवते, जेणेकरून चमत्कारिक सकारात्मक परिणाम दिसून येतात. क्रिस्टलला प्रिय व्यक्तीप्रमाणे वागवा व  आपले ईप्सित साध्य करा. या क्रिस्टल्सना ‘क्लिन्स’ करणे म्हणजे निर्मळ करणे मात्र गरजेचे आहे, अन्यथा काही काळानंतर त्यांची प्राणशक्ती वातावरणातील नकारात्मक उर्जेच्या प्रभावाने क्षीण झालेली आढळेल. क्रिस्टल्सना क्लिन्स करण्याचा एक उपाय म्हणजे मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवणे आणि हे शक्य नसल्यास (म्हणजे क्रिस्टल्स ज्वेलरी मध्ये मेटल पार्ट असल्यास) घरातील देव्हाऱ्यात ठेवणे. इतरही अनेक उत्तम उपाय आहेत. त्यांची माहिती व क्रिस्टल्सचे सखोल ज्ञान आम्ही प्रशिक्षणाच्या वर्कशॉपमध्ये देतो. 

क्रिस्टल्सची माहिती मिळवत असताना वर उल्लेखलेल्या सर्व क्रिस्टल्सचा संग्रह विविध स्वरुपात करण्यास मी सुरुवात केली आणि ज्यांनी ते वापरले, त्यांना सुयोग्य परिणाम मिळाल्याचे समाधान आम्हाला मिळाले. दुर्दैवाने क्रिस्टल्सच्या विश्वामध्ये डूप्लीकेट क्रिस्टल्सचा केव्हाच शिरकाव झाला आहे. त्यामुळे आमचा मुख्य व्यवसाय क्रिस्टल ज्वेलरी विक्रीचा नसतानाही केवळ अस्सल खरेपणा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी क्रिस्टल्सची एक्झिबिशन्स भरवायला आम्ही सुरुवात केली. अर्थात ‘कोणता क्रिस्टल कोणत्या गोष्टीसाठी’ याचे ज्ञान नसतानाही तुम्ही तो बाळगू शकता, परिधान करू शकता किंवा घरात ठेऊ शकता. कारण वर उल्लेखिल्यानुसार याचे साईड इफेक्ट नाहीत.

आणि आता सर्वात शेवटी क्रिस्टल्सच्या कॉम्बिनेशनचा वापर करून एक अतिशय प्रेक्षणीय, मोहक, शोभिवंत व वैश्विक ऊर्जा खेचण्याची जबरदस्त ताकद असलेले अनोखे एनर्जी डिव्हाईस आम्ही बनवले आहे, त्याची थोडक्यात माहिती देते. या डिव्हाईसमध्ये तांब्याच्या तारेची ‘टेस्ला कॉईल’ वापरली आहे, त्याच्या मध्यभागी व सभोवती क्रिस्टलची विशिष्ट भौमितीय रचना केली आहे. इथे वाचकांच्या माहितीसाठी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, टेस्ला कॉईल ज्या शास्त्रज्ञाने बनवली त्याला स्वामी विवेकानंद यांनी प्राण व आकाश या तत्वांचे विश्वाशी असलेले नाते स्पष्ट केलेले होते. त्याचे नाव ‘निकोला टेस्ला’. तो सात्विक प्रवृत्तीचा होता. ही टेस्ला कॉईल कुंडलिनी जगदंबेच्या वेटोळ्याप्रमाणे त्याला दिसली व त्याने ती जगासमोर आणली. टेस्ला कॉईलच्या ‘पिझो-इलेक्ट्रिक इफेक्ट’मुळे परमात्मा ऊर्जा (डिव्हाईन एनर्जी/ वैश्विक ऊर्जा) आपल्याप्रमाणे पोहोचते किंबहुना एक कनेक्शन प्रस्तापित होते. अशा शास्त्राधाराने उत्पादित केलेले हे डिव्हाईस नकारात्मक उर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये रुपांतरीत करू शकते. ते पिरॅमिड, गळ्यातील पेंडंट, खिशात ठेवण्याचे अ‍ॅम्युलेट, इ. विविध स्वरुपात बनतात. याची सर्व माहिती ब्लॉग वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल.

वरील सर्व माहिती अनुभवांच्या शिदोरीवर आधारीत असली, तरी मायबाप वाचकांनी ध्यानात ठेवावं की, हे क्रिस्टल्स कोणत्याच औषधाला पर्याय म्हणून नाही; तर रोग बरा करण्यासाठी मदतगार म्हणून आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे माणूस म्हणून जगताना आपलं अस्तित्व हे उच्चतम आहे. त्यामुळे एखादा क्रिस्टल तुम्ही वापरत आहात म्हणून पूर्ण परावलंबी व अंधश्रद्धाळू बनू नये, तर त्यांच्या सायन्स बेस्ड सकारात्मक परिणामांवर श्रद्धा ठेवावी. क्रिस्टलच्या या अभूतपूर्व दुनियेची सफर तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका. लेख मी स्वत: लिहिलेला आहे. लेख copyrighted आहे. copy paste अथवा स्क्रीनशॉट काढू नये. मात्र या लेखाची लिंक तुम्ही मित्रपरिवारांमध्ये शेअर करु शकता.

डॉ. सौ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 संमोहन उपचार तज्ञ (हिप्नोथेरपिस्ट), निसर्गोपचार तज्ञ. क्रियायोगी. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट, निसर्गोपचार तज्ञ व क्रिस्टल थेरपिस्ट, डोंबिवली. महाराष्ट्र.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*