हनुमंत: भगवंतासोबत कनेक्टिव्हिटी (Hanuman: Connectivity with Almighty)

hanuman

खरंतर खूप लेट केलाय मी हा लेख पोस्ट करायला. पण आता अजून उशीर नको!! अगदी अलीकडच्या शनिवारची गोष्ट. मारुतीच्या म्हणजे नेहमीच्या पंचमुखी हनुमानाच्या मंदिरात गेले. दिव्य मारुतीदेवाला निरखून पाहत समोर उभी राहिले. खूप जुना मारुती आहे. तिथली स्पंदनं खूप मस्तच!! मस्त हायसं वाटतं, त्या भगवंताच्या दर्शनाला गेल्यावर. आपलं मन- तन- आत्मा यांचं संरक्षण तो बलशाली हनुमान बाप्पा करतो आहे, हे ह्रदयात खोलवर जाणवतं.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्वजण नमस्कार करीत प्रदक्षिणा घालत होते. बहुतेकांच्या मुखातून हनुमान स्तोत्राचं उच्चारण सुरू होतं. काहीजण हनुमान चालीसा म्हणण्यात गुंग होते. नेहमी असाच भक्तीचा महापूर ओसंडताना जाणवत असतो, तसा तो आजही जाणवत होता. माझ्या तीन प्रदक्षिणा घालून पूर्ण झाल्या आणि काही मिनिटं हनुमानासमोर मी स्तब्ध उभी राहिले. 

जो समर्पित भक्तीचा भोक्ता,
तो भक्तीला प्रतिसाद देणारच !!

अलीकडेच काही दिवसांपूर्वी या मंदिराचं सुशोभिकरण (रंगरंगोटी वगैरे) झालं. जिथे हनुमानाची मूर्ती आहे, तिथे मध्यभागी एक छोटसं, चारी बाजुंनी खुलं असलेलं गाभारा मंदिर आहे. त्यात पंचमुखी हनुमान विराजमान आहे. या छोट्याशा मंदिराचं आणि हनुमानाच्या मूर्तीचं खूप छान सुशोभिकरण झालेलं दिसतंय, हे माझ्या लक्षात आलं.

आता माझ्या मनात वेगवेगळे प्लॅनिंग सुरू झाले. कसले प्लॅनिंग सुरू झाले, तर रात्रीच्या वेळी अगदी उशिरा जर या मंदिराच्या इथे आलं, म्हणजे साडेदहा नंतर वगैरे उशिरा मंदिराजवळ आलं तर मंदिरातला लाईट बंद असतो. परंतु आतमधला देव, दाराच्या ग्रिलमधून संपूर्णपणे अगदी व्यवस्थित डोळे भरून पाहायला मिळतो, म्हणून आज थोड्या वेळाने आपण येउ या. कारण देवाला घातलेले सर्व हार त्यावेळेला काढून ठेवलेले असतात. त्यामुळे हनुमानाची मुळातच लहान असलेली ती प्राचीन  मूर्ती अंधारात का होईना, अगदी छान व्यवस्थित पाहता येते. नखशिखांत व्यवस्थित न्याहाळता येते. डोळ्यांत साठवता येते. मारुतीची अख्खी मूर्ती पाहायला मिळाल्याने खूप समाधान पण वाटते. 

फक्त त्यासाठी एक दुसरी फेरी साडेदहाच्या सुमारास मंदिराच्या इथे टाकावी लागते. माझ्या मनात असं प्लॅनिंग चाललं होतं की, आज आत्ता थोड्या वेळानंतर, म्हणजे साडेदहाच्या नंतर हनुमानाला पाहायला येऊया. सुशोभित केलेलं त्याचं संपूर्ण रूप अगदी व्यवस्थित मनसोक्त पाहूया.

एकदम भारी देखणं सुशोभिकरण !!

माझे हात जोडलेले होते आणि पूर्ण लक्ष मारुतीच्या मूर्ती कडे एकटक होतं आणि हा विचार आणि हे प्लॅनिंग मनामध्ये सुरू होतं त्याच क्षणी, अगदी काही सेकंदाचाही विलंब झाला नव्हता आणि अचानक जे सद्गृहस्थ मारुतीचे हार, भरपूर झाल्यावर अधूनमधून काढायला येतात, ते तितक्यात तिथे  आले आणि त्यांनी सर्व हार एकत्र उचलले. अर्थातच पुढे येणाऱ्या पुढच्या भक्तांना हार व तेल अर्पण करता यावे, म्हणून त्यांनी ते हार उचलले आणि त्यांच्या मागे भक्त हातात हार घेऊन उभे होते. 

त्यावेळेला अक्षरशः काही सेकंदासाठी मला हनुमानाचे सुंदर सुशोभित रूप संपूर्णपणे न्याहाळायला लगेचच मिळाले. ते काही सेकंद मला परमानंद देणारे ठरले. कारण माझ्या मनात चाललेले वेगवेगळे विचार आणि प्लॅन्स समोरच्या भगवंताला अगदी तत्क्षणीच कळले आणि भगवंतांनी क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब माझी इच्छा पूर्ण केली आणि मी एखाद्या लहान बालकाप्रमाणे प्रचंड खुश झाले. अहो नाही नाही, मला आता साडेदहा नंतर यायला लागणार नाही, म्हणून मी खुश झाले नव्हते हा!! हा..हा..हा सहज विनोद केला!!

मी खुश झाले होते, ते या सुंदर, तरल, भावातीत अशा कनेक्टिव्हिटी वर. अचानक माझ्या मनात इच्छा येते काय आणि ती इच्छा आसमंतामध्ये प्रसारित होते काय आणि भगवंतापर्यंत त्यांचे तरंग पोहोचून, माझी इच्छा तत्क्षणीच पूर्ण होते ती काय!! माझ्या दृष्टीने तो दिव्य चमत्काराचा क्षण होता!! आर्त, उत्कट भावांचं बेमालूमपणे जुळलेलं जे टायमिंग होतं ना, ते मस्त! 

हा हनुमंताचा वेगळ्या वेळी काढलेला फोटो आहे!
सुंदर रुप! प्रगाढ बंध!

ज्या सभोवतालच्या दुनियेमध्ये चमत्कारांना नावं ठेवणे आणि विज्ञानाचा उदोउदो करणे या उद्देशाने बिनबुडाच्या पोकळ चर्चा रंगतात, त्या दुनियेमध्ये असे सुंदर, दैदीप्यमान व भगवंताशी कनेक्टिव्हिटी जाणवणारे चमत्काराचे क्षण आपण नेहमी अनुभवायला पाहिजे. आज जे घडले त्याचा डीप कॉन्शसनेस म्हणजेच गहिरी जाणीव सर्वात जास्त मलाच जाणवणार, हे मला माहित आहे. परंतु तुमच्या सर्वांच्या आयुष्यात हे जे क्षण येतात, ज्यामध्ये आपल्याला उपकृत झाल्यासारखं वाटतं इंग्लिश मध्ये सांगायचं तर ब्लेस्ड फील होतं, असे क्षण अनुभवा आणि त्यांचा सकारात्मक आनंद घ्या. 

मात्र स्वतःशी आणि स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहा. या भावनाच तुम्हाला तुमची आध्यात्मिकता अनुसरण्यासाठी आणि फुलवण्यासाठी वृद्धिंगत करण्यासाठी मदत करत राहतील. या तरल भावनांना एखाद्या मौल्यवान खजिन्याप्रमाणे स्वतःच्या अंतःकरणात जपून ठेवा. अधूनमधून त्यांना उलगडूनही पहा. तसेच माझा तुम्हा सर्वांना एक सल्ला आहे की, भगवंतासोबत कनेक्टिव्हिटी दाखवणाऱ्या या क्षणांना विज्ञानाच्या भट्टीमध्ये शेकवायला, सोडून देऊ नका. तसं तर विज्ञान प्रत्येक गोष्टीमध्ये सामावलेलं आहे. आध्यात्मिकताही विज्ञानापेक्षा वेगळी नाहीय.

पण ही भट्टी म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे का? ही भट्टी कोणी पेटवलेली असते, माहितीय का? ज्यांना आयुष्यभर असं सिद्ध करायचं असतं की, भक्ती, श्रद्धा, आराधना, अद्वैत अशा विविध स्वरूपात जी आध्यात्मिकता विस्तारलेली आहे, ती आणि आधुनिक सायन्स हे एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले शत्रुच आहेत.

तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, असे म्हटले जाते की, एखाद्या खोट्याचा मारा सतत करत राहिला की, आपल्याला ते खोटं सुद्धा खरं वाटू लागतं हा नियम अनेक अश्रद्ध लोकांच्या अश्रद्ध वर्तणुकीमुळे, आजच्या तारखेला  हळूहळू सिद्ध होताना जाणवतो.

पण आपल्याला करायचंय काय? या लोकांचा विषय सोडून देऊया. आपण आपलं आपल्या भगवंतावर प्रचंड प्रेम करुया आणि कंजूसपणे नाही, तर दिलदारपणे प्रेम करूया आणि त्या प्रेमाला भगवंता कडून येणाऱ्या प्रत्येक प्रतिसादाची हृदयामध्ये पोचपावती (acknowledgement) साठवूया.

एका छोट्याशा बालकासमान, परंतु प्रबळ अशा असलेल्या माझ्या इच्छेला महा शक्तिशाली महाबली हनुमंताकडून तात्काळ पूर्ण केले जाणे, हा माझ्यासाठी अतीव आनंदाचा क्षण असतो. अशा प्रकारचे वेगवेगळे अनेक ‘आनंद’ मी हृदयाशी बाल्यावस्थेपासून साठवत आले आहे. ही अशी घटना माझ्यासोबत पहिल्यांदा घडलेली नाहीय. अनुभूतींचे असे अनेक सुवर्णकण मी चित्ताच्या कुपीत जपून ठेवले आहेत. अंत:प्रेरणा झाली, तरच शेअर करत असते. आज खरोखरच मनापासून वाटलं की, तुम्हा सर्वांसोबत शेअर करूया; म्हणून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला.

एकमात्र आवर्जून नमूद करते की, विविध आध्यात्मिक अनुभूती, यांची चित्तामध्ये होणारी गहिरी नोंद ही जिवात्मासापेक्ष वेगळी आणि विशिष्ट असू शकते. उगीचंच निराश नही होनेका!! तुम्हीही भगवंतासोबत संधान साधा. नातं जुळवा.

विविध आध्यात्मिक अनुभूती, यांची चित्तामध्ये होणारी गहिरी नोंद ही जिवात्मासापेक्ष वेगळी
आणि विशिष्ट असू शकते.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर

तुम्हाला हा लघुलेख कसा वाटला, ते जरुर कळवा.  हे सर्व लेख मी स्वत: लिहिले असून copyrighted आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढु नका अथवा कॉपीपेस्ट करु नका. पण मित्रमंडळींमध्ये जरुर लिंक शेअर करा. 

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life Coach, Naturopath, Past Life Regression Therapist, Spiritual Blogger & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*