भरमसाठ ऊर्जा नष्ट करणाऱ्या तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या हट्टी सवयी: EVERYDAY HABITS THAT DRAIN YOUR ENERGY

Everyday habits that drain your energy

Taking things personally: सर्व गोष्टींना पर्सनली घेणे:

तो मला का असं बोलला, ती मला अशी का ओरडली? ते सगळेजण जे बोलत होते ना, त्यांनी मला म्हणजे फक्त मलाच टार्गेट केलेलं होतं. मलाच ते टोचून बोलत होते. मी कुठे गेले, तरी मला अशीच वाईट वागणूक दिली जाते. अगदी मुद्दाम दिले जाते.  अरे काय, काय, चाललंय काय? सगळ्या दुनियेचे कॅमेरे फक्त तुमच्यासाठीच लावलेत का?? बऱ्याचशा गोष्टींना का बरं इतकं पर्सनली घ्यायचं? मेंदुचा तळलेला मेंदुवडा!!

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

Holding on to the past: भूतकाळातल्याच गोष्टींना धरून राहणे:

त्यावर्षी मी ना त्या स्पर्धेत भागच घ्यायला नको होता. मला अमुक तमुक काका किती काय काय बोलून गेला होता तेव्हा? मी लहान असताना मला त्या आमच्या शेजारच्या परिवाराने भरपूर मानसिक त्रास दिला होता. आम्ही अमुकनगरला राहत होतो ना तेव्हा. अरे, तो भूतकाळ होता. गेला तो केव्हाच. किती दिवस पकडून ठेवायचाय तो भूतकाळ?

Always checking Facebook, Instagram:  सतत सोशल मीडियावर काय चाललंय हे चेक करत राहणे:

आज लाईफ मध्ये हे असं चाललंय; चला बघूया फेसबुक वर, इन्स्टा वर काय काय दिसतंय!! का पण, संबंध काय आभासी दुनियेमध्ये काय चाललंय त्याच्याशी! तुमच्या कोणत्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या दुनियेमध्ये लिहिलेलं नाहीय. उलट मेंदूचे अधिकाधिक गोंधळ इथे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या माहिती मधून होत असतात. फेसबुक आणि इन्स्टा या साईट म्हणजे आपलं आयुष्य नव्हे; तर फक्त मेंदूला एंगेज करून ठेवणारी आणि सतत मनात वेगवेगळे विचार आणून, बऱ्याचदा थकवणारी ही दुनिया आहे. याचं व्यसन लागू देऊ नका.

Over- stressing: कमालीचा अतिरिक्त ताण तणाव घेणे:

मान्य आहे की, तुम्हाला पुष्कळ कामं असतात. बऱ्याच गोष्टींचे नियोजन करायचं असतं. बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार असता किंवा तुम्हाला जबाबदार म्हणून धरलं जातं. तरी सुद्धा प्रचंड ताण घेऊन, डोक्यामध्ये भरपूर गोष्टींचा उहापोह करून स्ट्रेस लेव्हल वाढवत नेऊन, कामं व्यवस्थित कशी होणार आणि ताणतणावामुळे स्वतःच्या शरीरावर होणारा परिणाम कसा थांबवता येणार?

Sleeping late at night: रात्री खूप उशिरा झोपणे:

तुम्ही नक्कीच वटवाघूळ किंवा घुबड नाही आहात.  काय तीर मारणार आहात रात्री जागून? अख्खी पृथ्वी “बायोलॉजिकल क्लॉक” (जैविक घड्याळ) नुसार चालते; जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो. एक्सपर्ट अ‍ॅडव्हाईज अशी आहे की, झोपेच्या गुणवत्तेसोबतच त्याच्या कालावधीचीही काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा लोकांच्या झोपेच्या चक्रात मोठी समस्या दिसून येते. अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय असते. ही सवय सामान्य वाटू शकते, परंतु तिचे आरोग्यावर अनेक नकारात्मक गंभीर परिणाम (negative results) होऊ शकतात.

Fueling drama: आधीच भडकलेल्या आगी मध्ये तेल ओतणे:

ओ हो! ड्रामा अँड ऑल!! जोरजोरात वादविवाद चाललेत. बरं, ओके, आपण त्याला मतमतांतरं  म्हणूया; मग चालेल? तुम्हाला त्रास होतोय. आवाज वाढत चाललाय. वाद बंद होण्याचं नावंच घेत नाहीय. घर डोक्यावर घेतलं जाते किंवा घराच्या बाहेर असाल तर तिथलाही कलकलाट संपायचं नाव नाहीय. अशा वेळेला शांततेची गोळी द्यायची की, आगीत तेल ओतायचं तुम्हीच काय ते ठरवा बरं आगीत तेल ओतल्याने तुम्हाला कोणता मानसिक आनंद प्राप्त होणार आहे? तर ही सवय असेल तर ताबडतोब बंद करा.

Having a poor diet:  आहाराच्या विचित्र सवयी असणे:

आज पिझ्झा खाल्ला. उद्या शेजवान डोसा खाल्ला. परवा चायनीज खाऊया.  आता उशीर झालाय; मस्त दोन प्लेट भेळ खाऊया. स्टेशनला वडापाव किती छान मिळतो! मस्तपैकी दोन वडापाव खाऊया. अरे किती, किती भरायचं पोट!! आणि कोणत्या वेळी!!  बाहेरचं अन्न खाऊच नये, असं मला म्हणायचं नाहीय. परंतु अनेकांना खाण्यापिण्याच्या वाईट सवयी असण्याचं प्रमाण सर्वाधिक असू शकतं. सतत काही ना काही चरवत राहणं, प्रक्रिया केलेलं अन्न (प्रोसेस्ड फूड) अतिप्रमाणात खाणं, खाण्याच्या विचित्र सवयी, मध्यरात्री खाणं, नेहमीच जास्त कॅलरी खाणं यासारख्या सवयी काहींना असू शकतात. या अन्न खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे स्थूलपणा, डायबेटिस, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पचनाचे अनेक विकार, आणि सॉरी टु से धिस → अनेक प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तुम्ही मांसाहारी असलात तरी, प्रचंड तिखट व अतिशय तेलकट पदार्थ टाळलेलेच बरे. शरीरात फायबरयुक्त पदार्थ जास्त जाऊ द्या आणि उगिचची साखर खाणं कमी करा. (साखर सोडायला सांगत नाहीय) दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्या. चांगल्या आरोग्यासाठी आहार नियंत्रण गरजेचं आहे.

Complaining all the time: सतत तक्रार करत बसणे:

आज पाण्याचा फोर्स खूप कमी वाटत होता. आज सकाळपासून माझी काम धड होत नाहीय. तू इथे का बसलेला आहेस? तुम्ही तुमची गाडी अशी का लावली आहे? ही भाजी अशी नीट का दिसत नाहीय? ही अशीकशी स्वच्छता करून ठेवली आहे? आज कचरा नेणारी गाडी किती उशिरा आली. आज ऑफिसमध्ये सर्वजण किती गोंधळ घालत होते. अरे अरे, या तक्रारी नेमक्या संपणार आहेत कधी? कशाला सतत तक्रारी करत बसायच्या? सोल्युशन निघत असेल तर काढा आणि मोकळे व्हा.

Overthinking: सतत व अति विचार करत राहणे:

ओह! गुडन्यूज!! देशाला पंतप्रधान नेमलेले आहेत; राज्याला मुख्यमंत्री नेमलेले आहेत. तुम्ही जिथे राहताय तिथे सुद्धा कोणी ना कोणी देखरेख करण्यासाठी नेमलेले आहेत! मग एवढे ढीगभर विचार कशाला करत बसताय!?! हे कसं होणार, ते कसं होणार, त्याने असं केलं, मी हे करायला हवं होतं, बाबांनी असं करायला हवं होतं, मिसेसने असं करणं गरजेचं होतं, माझ्या करिअरमध्ये अमुक गोष्ट अशी घडायला हवी होती. आयुष्यात हे काय चाललंय? विचारांची मालिका संपणार तरी कधी आहे? थांबवा थांबवा सर्व काही!

Gossiping: दुसर्‍याच्या चुकीच्या व स्वरचित गोष्टींवर कानगोष्टी करणे:

अगं, विजय ना पुन्हा लग्न करतोय म्हणे. ती रुमा आहे ना, तिचे दोन बॉयफ्रेंड आहेत. त्या अरुणाची सून खूप दिवस माहेरी राहिलीय. गणेशला भरपूर बेकार मित्र आहे। अजय फॉरेनला जातोय म्हणे; बापाकडे भरपूर पैसा दिसतोय! किती घाणेरडी सवय आहे ही. मी स्वतः वैयक्तिक पातळीवर गॉसिपिंग चा पूर्णपणे निषेध करते. तुमची काही तासांची मजा पूर्ण होते. पण तुम्ही कोणाचं तरी वैयक्तिक आयुष्य त्यासाठी पणाला लावत असता. हे गॉसिप कृत्य चीड निर्माण करणारे आहे. नॉर्मल गप्पा जरूर माराव्यात! पण कधीही गॉसिपिंग करू नका. अतिशय घाणेरडी सवय आहे ही!

Not living in the moment:  वर्तमान क्षणांकडे बिलकुल लक्ष नसणे:

काल सर्व कामांची वाट लागली. मागच्या वर्षी दोन किलो गहू फुकट गेले. मी केलेल्या आधी च्या जॉब मध्ये मला सर्वजण खूप त्रास द्यायचे. भाज्यांचे भाव असेच कडाडत राहणार आहेत. मला यावर्षी सुद्धा फिरायला जायला मिळणार नाही. या वेळच्या रविवारी सुद्धा काम धड होतील असं वाटत नाही. अरे हे काय चाललंय? जगताय ते वर्तमान काळामध्ये आणि बकबक चालली आहे ती भूतकाळाबद्दल, तर कधी भविष्यकाळाबद्दल. मग आताच्या वर्तमान क्षणामध्ये कधी थोडं जगून पाहणार आहात?

Trying to please others:  प्रत्येक वेळी दुसऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे:

तुम्ही स्वतःच मनोरंजन चॅनल बनवलं आहे का?? हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. मी ह्याला इम्प्रेस करतो. मी त्याची मर्जी जिंकतो; माझी छाप त्यांच्यावर पडलीच पाहिजे. समोरचा माहौल माझ्यावर खुश झाला पाहिजे. याला, त्याला, दुनियेला खुश ठेवण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचं स्वत्व हरवून बसणे; हे योग्य आहे का बघा. यावर विचार करा आणि स्वतः स्वतःच्या समाधानासाठी कार्य करा. स्वतःच्या आनंदासाठी रुटीनची कामे करा. टेंशन नही लेने का!!

पुन्हा भेटुया पुढच्या लेखामध्ये. हा लेख कसा वाटला, ते नक्की कळवा. या लेखातील सर्व माहिती copyrighted आहे. मी स्वत: ही माहिती लिहिली आहे. लेखाची लिंक शेअर करु शकता. पण स्क्रीनशॉट अथवा copypaste ला परवानगी नाही आहे. कायद्याचे उल्लंघन करु नये.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*