विष्णुनामोच्चारणाने उघडबंद होणारे अदभुत श्रीकृष्ण मंदिर: Amazing Phenomena: Temple’s Door Operates Chanting Lord Vishnu’s 10 Names

हा लेख म्हणजे केवळ संकलन आहे. मूळ लेखक व अनुभव श्री. पटवर्धन यांचा आहे. पण हा नक्कीच शेअर करावा असा आहे, म्हणून इथे ब्लॉग मध्ये लिहित आहे. 

कडी, कोयंडा, कुलुप नसलेले, मात्र विष्णुसहस्रनामातील दहा नामांच्या उच्चारणाने उघडणारे व बंद होणारे अद्भुत श्रीकृष्ण मंदिर !*

पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही सोमनाथ दर्शनासाठी गेलो होतो.त्यावेळी सोमनाथ जवळच हे अद्भुत कृष्णमंदिर आमच्या पाहण्यात आले.आमच्या मार्गदर्शकामुळेच आम्ही हे मंदिर पाहू शकलो.हे मंदिर प्रभासपट्टण पासून बरेच लांब असल्यामुळे सहसा येथे कुणी जात नाही.पर्यटक, यात्रेकरू, भाविक, या कुणालाच या मंदिराची माहिती नसते.मार्गदर्शक, टॅक्सीवाला,अशापैकी एखाद्याने या मंदिरात जाण्याचे सुचवले तरी अंतर बरेच असल्यामुळे मंदिरासारखे मंदिर असे म्हणत वेळ व पैसा खर्च करून जाण्यास सहसा कुणी तयार नसते.दैवात होते म्हणून आम्हाला असा मार्गदर्शक भेटला,आम्हाला जाण्याची श्रीकृष्णाने बुद्धी दिली व कृष्णाचे आणि कृष्ण मंदिराचे   दर्शन झाले.        

सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे सर्वांना माहीत आहेच.महंमद गजनवीने यावर अनेकदा स्वाऱ्या केल्या आणि मंदिराची नासधूस केली.अगणित संपत्ती लुटून नेली.या गोष्टी इतिहासाच्या पुस्तकातून सर्वाना माहीत झाल्या आहेत.आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या उद्ध्वस्त मंदिराचे पुनर्निर्माण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले.उद्घाटनाला त्यावेळचे राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद आले होते.

सोमनाथ गुजरातमधील सौराष्ट्र विभागात समुद्रकिनारी प्रभासपट्टण तीर्थक्षेत्री आहे. वेरावळ बंदराजवळ  हे तीर्थक्षेत्र व मंदिर आहे.

प्रभासपट्टण तीर्थ अनेक कारणांनी सर्वांना माहीत आहे. सोमनाथ मंदिर स्थापनेच्या अगोदर पासून हे तीर्थ होते. चंद्राला दक्षप्रजापती कडून शाप मिळाला. हा शाप का मिळाला त्याची कहाणी थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.

सोम म्हणजे चंद्र अत्यंत तेजस्वी, सुंदर परंतु शांत असे व्यक्तिमत्त्व होते. त्याची मोहिनी कोणत्याही व्यक्तीवर पडत असे. दक्ष प्रजापती हा राजा होता. त्याला सत्तावीस कन्या होत्या.त्याने त्यांचा विवाह सोम म्हणजेच चंद्र याच्याशी केला.या सत्तावीस कन्यांमध्ये रोहिणी ही अत्यंत सुंदर होती. सर्व कन्याना चंद्र समान वागणूक देईल अशी दक्ष प्रजापतीची कल्पना होती. सोम केवळ रोहिणीमध्येच रममाण होता.

दक्षाच्या इतर कन्यांनी वडिलांकडे चंद्राच्या वर्तणुकीबद्दल तक्रार केली. दक्षाने चंद्राला तुला क्षय होईल असा शाप दिला. दिवसेंदिवस चंद्र कृश व निस्तेज होत गेला. चंद्र निस्तेज  झाल्यामुळे वनस्पतींवर वाईट परिणाम होत होता. शापमुक्त होण्यासाठी विष्णूने चंद्राला  शंकराची उपासना करण्यास सांगितले. या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने प्रभासपट्टण येथे  शंकराची उपासना केली. तप केले. शंकर प्रसन्न झाले. चंद्र म्हणजे सोमला उ:शाप मिळाला. परंतु दक्ष प्रजापतीच्या शापापासून पूर्ण मुक्तता मिळाली नाही. पंधरा दिवस चंद्राचा क्षय होतो. अमावस्येला चंद्र लुप्त होतो.शुक्ल प्रतिपदेपासून पुन्हा पौर्णिमेपर्यंत तेजस्वी होत जातो. या कालखंडात तो दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस मुलींच्या प्रासादाना भेट देतो म्हणजेच सत्तावीस नक्षत्रांमध्ये फिरतो.

सोमच्या विनंतीवरून भगवान शंकर इथे राहिले. शंकराच्या मंदिराला सोमनाथ असे नाव पडले. बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे.

तीर्थस्थान म्हणून चंद्राने तपश्चर्येसाठी प्रभासपट्टण तीर्थक्षेत्र निवडले होते. येथे तीन नद्यांचा संगम म्हणजेच त्रिवेणी संगम आहे. सरस्वती कपिल व हिरन या त्या तीन नद्या होत.द्वारकेपासून याचे अंतर सुमारे दोनशे किलोमीटर आहे.यादव अनेकदा पर्वणीकाळात येथे स्नानासाठी येत असत.येथूनच श्रीकृष्ण निजधामास गेले.यादवांचा वारुणीच्या नशेमध्ये आपसात लढल्यामुळे येथेच विनाश झाला.हे सर्व आपल्याला माहीत असेलच.(श्रीकृष्णचा मुलगा सांब यादवांच्या विनाशाला कारणीभूत कसा झाला आहे याची कथा येथे विस्तारभयास्तव देत नाही.)  या तीर्थक्षेत्री अनेक मंदिरे आहेत. बहुतेक मंदिरे कृष्णाची आहेत परंतु काही मंदिरे शंकराची व इतर देवदेवतांची आहेत. येथे जैन मंदिरही आहे.

आम्ही वेरावळ येथे उतरलो होतो. आमच्या हॉटेलमध्येच रमाकांत नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ आमची चौकशी करीत आले. त्यांना हॉटेल मालकानेच आमच्याकडे पाठविले होते. मार्गदर्शक म्हणून तुमच्याबरोबर मी येऊ का? अशी विनंती त्यांनी केली. यात्रेला आलेल्या लोकांना मार्गदर्शक म्हणून ते काम करीत असत. त्यांचा स्वभाव आम्हाला आवडला. त्यांच्याबद्दल आमचे मत चांगले झाले. आम्ही त्यांच्याबरोबरच सर्वत्र फिरण्याचे ठरविले.

प्रत्येक ठिकाणी ते सविस्तर वर्णन करून इतिहास पुराणकथा इत्यादी सांगत असत. अर्थात त्यातील बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीत होत्या. काही नवीन गोष्टी कळत होत्या. माहीत असलेल्या गोष्टींची उजळणी होत होती. आम्ही त्यांना हे आम्हाला माहीत आहे ते आम्हाला माहीत आहे असे करून अडविले नाही. त्याची वर्णनशैली लाजवाब होती.त्यांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटत होते. त्यातून कित्येक नवीन माहितीही कळत होती. सकाळपासून दुपारपर्यंत आमची तीर्थयात्रा चालली होती.

आता सर्व यात्रा पुरी झाली म्हणून आम्ही हॉटेलवर परत येण्यास निघणार होतो.एवढ्यात रमाकांतनी आम्हाला एक विनंती केली.येथून जवळच सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर हिरण नदीच्या काठी श्रीकृष्णाचे एक अद्भुत मंदिर आहे.तुमच्याजवळ वेळ असेल आणि इच्छा असेल तर मी ते तुम्हाला दाखवतो असे ते म्हणाले.

सुमारे पन्नास किलोमीटर म्हणजे येऊन जाऊन निदान तीन तास लागणार. रस्ता चांगला असेल असे आम्ही गृहीत धरत होतो.  इतक्या लांब जाऊन त्यात पाहण्यासारखे ते काय असणार? कृष्णाची अनेक मंदिरे आपण पाहिली आहेत अशी आमची आपसात चर्चा सुरू झाली.त्यावर ते गृहस्थ म्हणाले तुमची चक्कर फुकट जाणार नाही.तुमचा वेळ व पैसा फुकट जाणार नाही.याची मी तुम्हाला खात्री देतो.तिथे एवढे अद्भुत काय आहे ते आम्हाला सांगा म्हणजे आम्ही जायचे की नाही ते ठरवतो असे आम्ही म्हणालो.

त्यावर रमाकांतनी जर तुम्हाला तिथे जाऊन,मंदिर पाहून, पुरेसा आनंद मिळाला नाही तर तुम्ही मला माझे पैसे देऊ नका.त्या मंदिराबद्दलची माहिती तिथेच देणे जास्त संयुक्तिक होईल.असेही ते पुढे म्हणाले. आतापर्यंत रमाकांतबद्दल आमचा अनुभव चांगला होता.ते मंदिर खरेच दर्शनीय असणार अद्भुत असणार असा तर्क आम्ही बांधला. शेवटी आम्ही ते मंदिर पाह्यला जाण्याचे ठरविले. 

हिरण नदीच्या काठाकाठाने होणारा प्रवास आनंददायी होता.कांही वेळा नदी जरी रस्त्यापासून दूर असली तरी बऱ्याचवेळा ती रस्त्याच्या जवळच होती.रस्त्याच्या एका बाजूला नदी व दुसर्‍या  बाजूला कोकणाप्रमाणे नारळाची झाडे व शेती पाहात असताना मंदिर केव्हां आले ते कळले नाही.

मंदिर छोटेसे असले तरी त्याचे प्रांगण मोठे होते. प्रांगणामध्ये लहानमोठी शोभेची व इतर झाडे लावली होती. एक लहानसे तळेही होते.बाहेरून मंदिर प्रशस्त प्रांगण व सर्व परिसर बघून आम्हाला आमचे पैसे वसूल झाले असे वाटले. आमची सर्व थकावट दूर झाली.

हा लेख मी लिहिलेला नाही आहे. पण तरीही हा ब्लॉग platform copyrighted आहे, त्यामुळे इथून हा लेख copy paste करु नये व याचे screenshot ही काढू नये. आपण फक्त या लेखाची लिंक शेअर करु शकता. सर्व लेख वाचा व फीडबॅक कळवावा.

अजून मंदिर उघडले नव्हते.प्रांगणात असलेल्या बाकांवर आम्ही बसलो.आमच्या पाठीमागे सूर्य पश्चिमेकडे कलला होता.समोरच मंदिर होते. मंदिराबद्दल कहाणी रमाकांत सांगू लागले.

अकराव्या शतकात राजा भोजने हे मंदिर बांधले असा उल्लेख शिलान्यासामध्ये सापडतो.मंदिराचे दोन भाग कल्पिता येतील.गाभारा व मंडप.गाभाऱ्यामध्ये सर्व शिल्पे संगमरवरी दगडातील आहेत.यमुना वाहात आहे. त्याच्याकाठी गाई चरत आहेत.एका कदंब वृक्षाखाली पारावर (चबुतऱ्यावर) बसून कृष्ण मुरली वाजवीत आहे. अशी शिल्पे आहेत.जवळजवळ हजार वर्षे झाली तरीही शिल्पे कालच तयार केल्यासारखी वाटतात. गर्भगृहाच्या बाहेरही भिंतीवर पौराणिक प्रसंगातील निरनिराळी शिल्पे आहेत. मंडपात कासव मध्यभागी आहे. बाजूला भक्तांना बसण्यासाठी भरपूर जागा आहे. गाभार्‍यात जाण्याची परवानगी फक्त पुजाऱ्याला आहे.पुढच्या बाजूला गज असलेला दरवाजा आहे.उरलेल्या तीन बाजूंना प्रशस्त खिडक्या आहेत.प्रत्येक खिडकीतून व पुढील दरवाजातून एकच दृश्य दिसते.शिल्पकाराची खुबी, त्याचे कसब असे आहे कि तुम्ही कुठूनही पाहिले तरी कृष्ण व गाई तुमच्याकडे पाहात आहेत असे वाटते.

म्हैसूरच्या राजवाड्यात आम्ही भिंतीवर घोड्यावर बसलेल्या   सैनिकांची  तैलचित्रे पाहिली होती.चित्रकाराची खुबी अशी होती की कुठूनही तुम्ही पाहिलेत; समोरून, डावीकडून, उजवीकडून, तरी सर्व सैनिक व घोडे तुमच्याकडेच पाहात आहेत असे वाटत असे.

चित्रकारांचे ते कसब पाहून आम्ही त्यावेळी आश्चर्यचकीत झालो होतो. शिल्पामध्येही तशीच शिल्पे तयार करता येतात याची आम्हाला कल्पना नव्हती. अजून तशी शिल्पे आम्ही बघितली नव्हती. मंदिरात जाऊन ती शिल्पे पाहण्यासाठी आम्ही उत्सुकतेने उठलो. तेवढ्यात रमाकांत म्हणाले अजून गोष्ट संपली नाही.मंदिरही बंद आहे. (गोष्ट ऐकताना मंदिर बंद आहे हे आम्ही विसरलोच होतो.) पुजारी एवढ्यात येतीलच.त्यांनी मंदिर उघडल्या शिवाय तुम्हाला आत जाता येणार नाही.

*या मंदिराला कडी, कोयंडा, कुलूप, अंगचे कुलूप, साखळदंड, इत्यादी कांहीही नाही. फक्त दोन दरवाजे आहेत.ते दरवाजे मंत्र म्हणून पुजाऱ्याने बंद केले की कुणालाही उघडता येत नाहीत. फक्त पुजाऱ्याला उघडता येतात. प्रत्येक दरवाज्याला एक गुंडी आहे. ती गुंडी धरून पुजारी मंत्र म्हणतो. त्यानंतर दरवाजा उघडतो. गाभाऱ्याचा दरवाजाही तसाच बंद होतो. कडी कुलुपा शिवाय दरवाजे कुलूप लावल्यासारखे बंद असतात.*

या मंदिराला कडी, कोयंडा, कुलूप, अंगचे कुलूप, साखळदंड, इत्यादी कांहीही नाही.

फक्त दोन दरवाजे आहेत. ते दरवाजे मंत्र म्हणून पुजाऱ्याने बंद केले की कुणालाही उघडता येत नाहीत.फक्त पुजाऱ्याला उघडता येतात.

प्रत्येक दरवाज्याला एक गुंडी (नॉब) आहे. ती गुंडी धरून पुजारी मंत्र म्हणतो.त्यानंतर दरवाजा उघडतो.

गाभाऱ्याचा दरवाजाही तसाच बंद होतो.कडी कुलुपाशिवाय दरवाजे कुलूप लावल्यासारखे बंद असतात. लोहचुंबक वगैरे कुठेही  कांहीही नाही. या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भारतात असे मंदिर कुठेही नाही. कृष्णाच्या अंगावर मोजकेच दागिने असतात. मुगुटावर हिरे लावलेले आहेत. त्यांतील कांहीही कुणालाही कितीही प्रयत्न केला तरी काढता येत नाहीत. हिरे सोने इत्यादी शिल्पामध्ये बेमालूम घट्ट बसविलेले आहे.शिल्प संगमरवरी दिसते.परंतु हातोड्याचे प्रहार केले तरीही त्याचा एकही कळपा उडत नाही.यासाठी कोणता संगमरवर वापरला माहीत नाही. कोणत्या हत्याराने संगमरवराची कताई केली ते कळत नाही. त्या संगमरवरामध्ये शिल्प तयार करताना हिरे आणि इतर रत्ने   कशी बसविली तेही कळत नाही.ही शिल्पे हे शिल्पकारांना व शास्त्रज्ञांना आव्हान आहे. मंडपातील भिंती शिल्पेही तशीच अभेद्य आहेत.     

भोज राजाने जेव्हां मंदिर बांधले तेव्हापासून ही अशीच रचना आहे. त्या बाबतीत एक आख्यायिका सांगितली जाते.भोज राजाचे एक गुरू होते. कोणतेही मंदिर चौवीस तास उघडे असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. कुणालाही कोणत्याही प्रहरी देवदर्शनापासून वंचित करता येणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.दरवाजाला कडी कुलूप नसले म्हणजे भक्त केव्हांही दर्शन घेऊ शकेल.जर दरवाजाच ठेवला नाही तर पक्षी वानर माकडे गुरे मंदिरात शिरतील.म्हणून दोन्ही ठिकाणी गर्भगृह व मंदिर याना   दरवाजा ठेवण्यात आला होता. भक्तांनी हातात गुंडी धरून कृष्णाचे स्मरण केले की दरवाजा उघडता येईल असा वर त्यांनी दिला होता.हे स्मरण अत्यंत भक्तीपूर्वक करणे आवश्यक होते.नेहमी येणार्‍या सामान्य भक्तांना गुंडी धरून दरवाजा उघडता येत नसे. कांहीच भक्त दरवाजा उघडू शकत असत. चौवीस तास मंदिर उघडे ठेवणे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे शेवटी बारा तास मंदिर उघडे ठेवण्याचे ठरविण्यात आले.  

त्यानंतर भोज राजाच्या विनंतीवरून त्या गुरूंनी रचनेत बदल केला.फक्त पुजाऱ्याला दरवाजा उघडता व बंद करता येईल अशी व्यवस्था केली. वंशपरंपरागत पुजारीपण चालत आलेले आहे. पुजारी आपल्या मोठ्या मुलाला दरवाजा उघडण्याची व बंद करण्याची शक्ती प्रदान करतो. ही शक्ती कशी प्रदान केली जाते त्याची कुणालाही कांहीही कल्पना नाही.  जर एखाद्या पुजाऱ्याला मुलगा नसेल तर तो पुजारी त्याचा वारस कोण ते निश्चित करतो.त्याची अद्भुत शक्ती तो त्या वारसाला प्रदान करतो.  जो दरवाजा बंद करतो तोच दरवाजा उघडतो.जो मंत्र दरवाजा बंद करताना म्हणावा लागतो तोच उघडताना म्हणावा लागतो.

हे सर्व ऐकल्यावर मी विचारले प्रत्येकवेळी मंत्र बदलला जातो का?तुमच्या सांगण्यावरून तसे वाटते.त्यावर मंद स्मित करीत रमाकांत म्हणाले बरोबर आहे.मंत्र पुढीलप्रमाणे असतो.विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूची हजार नावे आहेत.दरवाजा बंद करताना त्यातील कोणत्याही दहा नावांचा उच्चार करायचा असतो.जी दहा नावे दरवाजा बंद करताना गुंडीवर हात ठेवून उच्चारली तीच पुन्हा गुंडीवर हात ठेवून उच्चारावी लागतात.आता तुम्ही विचार करा.हजार नावातील कोणतीही दहा नावे घेतली तर क्रमपरिवर्तन आणि संयोजन (permutation and combination) यानुसार असंख्य गट निर्माण होतील.यातील कोणताही गट पुजारी घेऊ शकतो.

आम्ही रमाकांतच्या बोलण्यावर विचार करीत होतो. मी पुढे रमाकांतना विचारले,समजा पुजारी सोडून आणखी कुणी बरोबर तीच दहा नावे उच्चारली, तर दरवाजा उघडेल की नाही? त्यावर रमाकांत म्हणाले बरोबर तीच दहा नावे उच्चारणे जवळजवळ अशक्य आहे. तरीही जर ती उच्चारली गेली तर काय होईल माहित नाही. आमची मती गुंग झाली होती.प्रत्यक्ष जाऊन दरवाजा उघडून पाहावे असे आम्ही ठरविले.आम्ही दरवाजाजवळ गेलो. रमाकांतने सांगितल्याप्रमाणे दरवाज्याला कडी कोयंडा कुलूप कांहीही नव्हते. आम्ही दरवाजा ढकलून बघितला. दरवाजा अज्जिबात उघडला नाही. दरवाजा जसा कांही कुलूपबंद होता. रमाकांतच्या सांगण्यावर विश्वास होता आणि नव्हताही. तो खोटे सांगणार नाही याची खात्री वाटत होती. परंतु असे कांही असेल केवळ विष्णूची दहा नावे उच्चारून दरवाजा कुलुप बंद होईल आणि पुन्हा तीच नावे उच्चारून तो उघडेल,ही गोष्ट कुठेतरी बुद्धीला पटत नव्हती.

जगात अशा अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या नेहमीच्या तर्कशास्त्राला पटत नाहीत.बुद्धीला आकलन होत नाहीत. त्यामागे कांही वेगळेच तर्कशास्त्र असते. ते आपल्याला माहीत नसते.हे सर्व माहीत असूनही रमाकांतच्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता.

एवढ्यात संध्याकाळचे चार वाजले होते. जरी भोज राजाच्या गुरूंना मंदिर चौवीस तास उघडे असावे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते सकाळी व रात्री बारा तास उघडे ठेवले जात असे.सकाळी सहा ते बारा व संध्याकाळी चार ते दहा.पुजारी सकाळी सहाच्या अगोदर येऊन पूजा वगैरे सर्व करीत असत.

आम्ही पुजारी पाहून बाजूला झालो. पुजार्‍यानी गुंडीवर हात ठेवला. तोंडातल्या तोंडात कांहीतरी मंत्र पुटपुटला. रमाकांतच्या सांगण्यानुसार त्यानी विष्णूसहस्रनामातील दहा नावे उच्चारली  होती. त्यानी हळूच दरवाजा आंत ढकलला.दरवाजा कोणतीही कुरकुर न करता उघडला.रमाकांतने सांगितलेली गोष्ट खरी होती.पटत नसली तरी मान्य करणे भाग होते.

मंदिराच्या भिंतीवर रामायणातील निरनिराळ्या प्रसंगांची शिल्पे काढलेली होती.एका बाजूला शिल्पा मागून शिल्पामध्ये रामायणातील पूर्ण गोष्ट दाखविलेली होती.रामायणातील सुवर्ण हरिण व सीता हरणाचा प्रसंग शिल्पित केलेला होता.दुसर्‍या भिंतीवर निसर्ग शिल्पे होती.मंदिराला आंतून व बाहेरून रंगरंगोटी केलेली होती.मंदिर छोटेसे परंतु देखणे होते.

आम्ही श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्याजवळ गेलो.गाभाऱ्याचा दरवाजा बंद होता.त्यालाही कुठे कडीकोयंडा अंगचे कुलूप इत्यादी दिसत नव्हते.श्रीकृष्णाची मूर्ती बघण्याच्या बहाण्याने मी दरवाजा ढकलून पाहिला.दरवाजा उघडत नाही असे पाहिल्यावर जोर लावून उघडण्याचा प्रयत्न केला.दरवाजा जागच्या जागी होता.आम्ही आंतील शिल्प बघू लागलो.गाभाऱ्याच्या चारी बाजूंनी कुठूनही शिल्प बघितले तरी गाई कृष्णाकडे व कृष्ण आमच्याकडे म्हणजेच सर्व जण आमच्याकडे पाहात आहेत असे वाटत होते. हजार वर्षांपूर्वीच्या त्या अज्ञात शिल्पकाराला मी मनोमन नमस्कार केला.त्याचे कौतुक करण्याला शब्द अपुरे पडत होते.सर्व शिल्प संगमरवरामध्ये होते. छिन्नी चालविण्यामध्ये पॉलिश करण्यामध्ये किंचित फरक आणि सर्व शिल्प बिघडले असते. इतका अचूकपणा खरोखरच आश्चर्यजनक होता.पुजारी कुठेतरी बाहेर गेला होता. गुंडीवर हात ठेवून मी विष्णुसहस्त्रनामातील कोणते तरी श्लोक म्हटले. विष्णूची दहा नावे घेतली  दरवाजा अर्थातच उघडला नाही.आंतील दरवाजा पुजारी सायंआरतीच्या वेळी उघडणार होता.आरतीपर्यंत आम्ही थांबलो असतो तर  हॉटेलवर जायला उशीर झाला असता. तरीही आम्ही आरतीपर्यंत थांबण्याचे ठरविले. तोपर्यंत मंदिराच्या विस्तृत प्रांगणात एक चक्कर मारली.

तिन्हीसांजा  झाल्या होत्या. पुजार्‍यानी गुंडीवर हात ठेवून मंत्र पुटपुटला.दरवाजा अल्लद उघडला.सायंआरती झाली प्रसाद वाटण्यात आला. पुजारी अर्थातच रमाकांतच्या ओळखीचे होते. रमाकांतने पुजार्‍याशी आमची ओळख करून दिली. आम्ही त्यांच्याजवळ गप्पा मारू लागलो.  त्यानीही रमाकांतने सांगितलेल्या दरवाजा बंद करण्याच्या व उघडण्याच्या गोष्टीला दुजोरा दिला.

ते म्हणाले हे मंदिर भोज राजाच्या गुरूने सांगितल्यावरून येथे बांधण्यात आले. त्या गुरूंना दृष्टांत झाला होता.त्या काळात सुमारे हजार वर्षांपूर्वी भोज राजा व गुरू येथे आले.त्यांनी परिसराची पाहणी केली. गुरूंना दृष्टांतानुसार येथे कृष्णाची मुरली वाजवीत असलेली, कदंब वृक्षाखाली पारावर बसलेली, लहान मूर्ती मिळाली. येथे मंदिर बांधून त्यांत ती मूर्ती ठेवण्यात आली. यमुना गाय इत्यादी शिल्पे नंतर त्यावेळी तयार करण्यात आली.

गुरूंची इच्छा चौवीस तास मंदिर उघडे ठेवावे अशी होती.प्रत्यक्षात त्या काळीही ते व्यवहार्य नव्हते.शेवटी बारा तास मंदिर उघडे ठेवण्याचे ठरविले.गुरूंनी त्या वेळी मंदिर अभिमंत्रित केले होते.त्यामुळे अजूनही सहस्रनामातील विष्णूच्या कोणत्याही दहा नावांनी मंदिराचे दरवाजे बंद होतात व उघडतात.

या मंदिराची पुढील खास वैशिष्ट्ये सांगता येतील.

१) संगमरवरी शिल्प अभेद्य आहे. अभेद्य संगमरवर कुठून पैदा केला? का संगमरवरावर शिल्प तयार झाल्यावर कांही रासायनिक प्रक्रिया करून तो अभेद्य बनवण्यात आला. याचा उलगडा संशोधकच करू शकतील.   

२) संगमरवर अभेद्य असेल तर त्यातून शिल्प कसे तयार केले?त्यासाठी कोणती हत्यारे वापरली?

३) शिल्प तयार करून रासायनिक प्रक्रिया केली असेल तर ती रासायनिक प्रक्रिया कोणती? जर ती माहीत झाली तर आपल्याला शिल्पे अभेद्य करता येतील.(समाजकंटकांकडून शिल्पाची, पुतळ्याची, मोडतोड केल्याचे जे पाहायला,ऐकायला मिळते तसे समाजकंटकांना करता येणार नाही.)

४) तीन बाजूनी पाहिले तर शिल्पातील सर्व आपल्याकडे पाहतात असे कदाचित दिसू शकेल.परंतु पाठीमागील खिडकीतून  पाहिल्यावरही तसेच कसे दिसते?अशी शिल्पकला कुठेही आढळत नाही.या शिल्पकलेचे मर्म कुणी शोधून काढील काय?

५) केवळ विष्णूची कोणतीही दहा नावे उच्चारून दरवाजा कुलूपबंद कसा होतो? हे गूढ काय आहे? हे गूढ उकलते तर अनेक दरवाजांची कुलपे काढून टाकता येतील. केवळ मंत्रोच्चाराने दरवाजे कुलुप बंद होतील व उघडतील.

*आम्ही आश्चर्याने पुजारी सांगत होते ते ऐकत होतो. रमाकांत सांगत होते तेव्हां आम्हाला त्यांत कुठेतरी अफवा आहे असे वाटत होते. परंतु रमाकांत सत्यस्थितीचे वर्णन करीत होते. आम्ही पुन्हा एकदा कृष्ण दर्शन घेतले.बाहेरून एकदा मंदिराला व भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. टॅक्सीत बसून हॉटेलकडे निघालो.खरेच ते मंदिर, अद्भुत कृष्णमंदिर होते. आम्ही रमाकांतचे बोलणे डावलले असते, तिकडे लक्ष दिले नसते, तर खरेच एका मोठय़ा अनुभवाला मुकलो असतो.*

डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression, Life Coach & Crystal Healing Therapist.

Be the first to comment

Leave a Reply