पितृ दोष असणे आणि मृत्युसंबंधीत धार्मिक विधी यथोचित शास्त्रोक्त पूर्ण न केलेले असणे Pitru Dosh and Incomplete Rituals of The Deceased

नमस्कार. आधी पितृदोष या शब्दाचा अर्थ काय ते समजून घेउया. पितृ म्हणजे केवळ आपले पिताश्री नव्हे; तर त्या संपूर्ण घराण्यात जे कोणी गत झालेले असतात ते सर्वच जण म्हणजेच पितर अथवा पितृयोनी. पूर्वजांच्या सदोष कर्मांचे फलित त्यांच्या वंशजांना भोगावे लागतात, याला पितृदोष म्हणतात.

पितृदोषाची काही कारणे :
1)पितृंचे अस्तित्व पूर्णत: विसरणे
2)पितरांचे अंत्यसंस्कार व श्राद्ध दिवसकार्य न करणे / अर्धवट करणे
3)धार्मिक स्थळी वड पिंपळ झाड तोडणे
4)घरातील स्त्रीचा अवमान व छळ करणे
5)साप मारणे
6)मूळ पुरुषाचा अपमान/विस्मरण करणे

उत्तम करियर मध्ये, ज्यांचे लाईफ सेटल झाले आहे, आर्थिक नियोजन व्यवस्थित आणि अनेक पिढ्या बसून खातील इतका पैसा जमवला आहे, प्रॉपर्टी बनवली आहे, अशा लोकांना काय अडचणी असणार आहेत? असं आपल्याला नेहमी वाटते.

पण असं नाहीय. 3 – 4 लाख / महिना पॅकेज घेणारे अनेक जण पितृ दोषाच्या प्रभावातून उद्भवलेल्या समस्यांनी ग्रस्त व त्रस्त झालेले मी पाहिले आहेत. सर्वकाही चांगले असुनही सतत तब्येतीच्या तक्रारी, व्यसनाधीनता, आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेले अतिशय डिस्टर्ब व्यक्ती मी पाहिले आहेत. कधीकधी काही प्रॉब्लेम्स फक्त मानसिक पातळीवर असतात. पण आजच्या तारखेला या बहुसंख्य पिडित व्यक्ती इतर मुलभूत दोषांमुळे (घर, कुलदेवता, कुळाचार, पितृदोष) प्रभावित (संसर्गित) झालेल्या असतात. मग पैसा काय कामाचा? यांना होणारे त्रास अक्षरश: चहुबाजुंनी असतात. त्यांच्या जीवनावर हे त्रास स्लो हॅमरिंग करत असतात. एखाद्या क्षणी ते अतितीव्र झाले की, मग रडकुंडीला यायची वेळ येते. घुसमट सुरु होते. मग मार्ग शोधायला सुरुवात होते.

एखाद्या घरात अकाली मृत्यू, हत्या किंवा अपघात झाला असेल तर (घराण्याच्या आताच्या काळात किंवा आधीच्या इतिहासात) ते पितृदोषामुळे घडत असतं. घरात सतत कलह, आजारपणं असणे, घरात चोरी होणे, आग लागणे, नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होणे, घरात नेहमीच अंतर्गत वाद असणे, रिपोर्ट नॉर्मल असताना संतान प्राप्तीत अडथळे येणे, संतान न होणे आणि संतान झाले तर, ते दोषयुक्त असणे, सतत आर्थिक अडचण, ताण उत्पन्न होत राहणे, विवाहात अडचणी येणे, कोणत्यातरी कारणाने सतत भांडण तंटे होत राहणे, एकंदर ताणतणाव वाढतच राहणे, आळ येणे, अर्थार्जनाचे मार्ग खुंटणे, आयुष्यातील चांगल्या संधी चुकणे, अपयश येणे, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स, अतिव्यसनाधीनता, कर्ज प्रकरणे इत्यादी लक्षणे पितृदोष असल्याचे स्पष्ट करतात. देव्हारा नसलेली घरं सुद्धा मी पाहिली आहेत. सात्विकतेला संपूर्णतः तिलांजली देउन, तामसी वृत्तीने ओतप्रोत झालेली घरं मी पाहिली आहेत.

काही घरामध्ये एखाद्या अविवाहित व्यक्तीचे निधन होते. लहानग्या अर्भकाचे निधन होते. एखादी माता गर्भवती असताना अथवा अन्य शोकाकुल अवस्थेत गतप्राण झालेली असते. दुर्दैवाने काही घरात खून, विचित्र हिंसा, बलात्कार, पुरुष किंवा स्त्री वर अमानुष अत्याचार असे प्रसंग घडतात. अथवा पूर्वी घडून गेलेले असतात.

या अशा घरांमध्ये पितृदोष स्पंदनलहरी ‘हाय पीच’वर असतात. काही तात्पुरत्या उपायांनी त्या सौम्य होतात; पण नष्ट होत नाहीत. या पितृदोष स्पंदनलहरी कधीकधी तीव्र प्रभावी बनतात. मग हा दुष्प्रभाव, विचित्र दुर्दैवी घटना अथवा या घटनांची मालिका सुरु करतो.

आता हे सर्व सुरु असताना परिवारातील अनेकांना मानसिक तणाव वाढतो. (लक्षात घ्या, अनाकलनीय मानसिक आजार, मानसिक समस्या हे प्रखर पितृदोषाचेच लक्षण आहे.) इतका वाढतो की, स्ट्रेसची मेडिसीन्स सुरु होतात. शारिरीक आजार (बीपी, डायबेटिस, स्ट्रोक) बळावतात.

असो. आयुष्याची गाडी अशी रडतखडत पुढे जात असताना, कहाणीचा हा पितृदोषाचा अँगल कोणाच्याही लक्षात येत नसतो. दुर्दैव म्हणजे ‘मी मॉडर्न विचाराचा / ची आहे; या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नगण्य आहेत. असे नविन ट्रेंड निघालेले दिसतात. अरे पण का हे सर्व शॉर्टकट्स?
फक्त नावामध्ये ‘प्रबोधन’ धारण केलेले गृप्स (संस्था) आहेत, जे पितृ, सर्व धार्मिक परंपरा यांना कात्री लावण्याचं कार्य करत आहेत. असो. आपला तो विषय नाही.

दिवसकार्य म्हणजे स्मशानात जाळण्यापासून तेरावे पर्यंतचे कार्य, हे धर्मशास्त्रानुसार व्यवस्थित झालेच पाहिजे. आणि पुढील आयुष्यामध्येही पितृसंबंधित विधी, थोडक्यात हे पितृऋण पे ऑफ करण्यासंदर्भातील पारंपारिकता अनुसरावी. 365 दिवसांमध्ये फक्त एक पंधरवडाच पितृकार्याला असला तरी आपण संपूर्ण वर्षात, वेळोवेळी या पितरांच्या शांततेसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावीच.

हे वाचल्यावर खूप क्लिष्ट वगैरे वाटून घेउ नका. कारण ही भरपूर वेळ आणि पैसा खर्चणारी गोष्ट नाही. पितरांची जाणीव आणि शास्त्रीय परंपरा यांना केंद्र स्थानी ठेवून करण्याच्या या गोष्टी आहेत.

‘माझा मुलगा ऐकतच नाही’, ‘माझे मिस्टर अस्सेच वागतात’, ‘कर्ज प्रकरणं खूप वाढलीत’ या तक्रारी, तसेच लेखामध्ये वर सांगितलेल्या अडचणी यावर उपाय शोधून, वर्तमान जीवन सुसह्य करावयाचं असेल तर या विधींची आयुष्यातील अनिवार्यता समजून घ्या.

काहीजण म्हणतात की, तेरावा विधी रद्द करून त्याचे सर्व पैसे आम्ही अनाथाश्रमाला किंवा संस्थेला दान केले. पुण्य कमावले. कोण नाही म्हणतं दानाला हो! परंतु तो मृत व्यक्तीचा श्राद्ध विधी घरातील मोजक्या माणसांच्या उपस्थितीत विधिवत संपन्न केला आणि समांतर भावनेने अनाथांनाही मदत केलीत, तर ते अधिक रास्त ठरते, नाही का? तुम्ही मुलांना, नातवंडांना कुलदेवता, कुळाचार, पितृ संस्कार याबद्दल सांगितलेच नाही, तर कोण सांगणार?

या लेखावर आधारित एकच प्रश्न – आज जर तुम्ही म्हणताय की, हे सगळं थोतांड अथवा अतिरेक आहे, मी स्वत: तर करणार नाहीच आणि मुलांनाही तसा सल्ला देणार नाही. पण मग तुमच्या पुढच्या लेकरांच्या पिढीत वर सांगितलेले त्रास सुरु असतील आणि त्यांना ‘हे सर्व असं कर हो बाळा. मग समस्यामुक्त होशील’ असा सल्ला देणारंच कोणी नसेल तर??? तुम्ही पण तेव्हा नसाल तर? जस्ट इमॅजिन!

या लेखाचा अर्थ नक्कीच असा नाहीय की, हे सर्व विधी, पितृ हा विषय त्रास, ताप, दडपण निर्माण करणारे असतात. याउलट ‘पितृ’ हा विषय शुभाशीर्वादाचा आहे. गत पितरांना सदगती (परफेक्ट स्पीड) प्राप्त होण्याच्या प्रक्रियेचा आहे. आपण भगवंताचे (सुप्रीम एनर्जी) चैतन्यपूर्ण आविष्कार आहोत. मनुष्य म्हणून धर्मशास्त्र जाणून घेउन, त्याप्रमाणे अपटुडेट केलेले आचरण पितरांच्या सदगतीस मदत करते. आणि त्यांच्या शुभाशीर्वाद लहरींमुळे, मुलाबाळांच्या व आपल्या जीवनातील अडकलेले स्त्रोत मोकळे होतात. गूढ फरफट थांबते.

शांत चित्ताने ही माहिती एक दोनदा वाचा. मी इतकेच सांगेन की, अजून वेळ गेलेली नाही. ‘जब जागो तब सवेरा’. पण अजून जास्त क्षती होण्याआधी चिंतन करा आणि पावलं उचला. आपल्याला वैद्याने सांगितलं की, तुमचा वात दोष अथवा तुमचा कफ / पित्त दोष वाढला आहे. तर आपण वात पित्त कफ मोजत, पडताळत बसत नाही. तर इलाजांच्या मागे लागतो. ©

यातून योग्य मार्ग निघावा, यासाठी मी अनेकांना मार्गदर्शन करत असते. त्यांच्याकडून हे विधी, भौतिकतेच्या व जाणीवेच्या – या दोन्ही पातळीवर विधिवत करवून घेत असते. ‘पितृ देव शांती श्राद्ध कार्य’ या विषयांतर्गत हे श्राद्ध कार्य असते. चित्त श्रद्धायुक्त ठेउन, जे करावे तेच श्राद्ध.

लक्षात ठेवा, पितृ विधी संपन्न करणे म्हणजे सूक्ष्म जगतात पोहोचलेल्या शरीरविहिन पितरांना, त्यांच्या अस्तित्वाला शक्तिशाली जाणिवेतून केलेले गुडबाय आहे. हा काही फक्त अडचणी दूर करण्यासाठी केलेला खटाटोप नव्हे. हे तुम्हीच करु शकता. तुमची इनव्हॉल्वमेंन्ट महत्त्वपूर्ण आहे. ©

छोट्यामोठ्या रेमिडिज सांगणं म्हणजे आजाराचं गांभीर्य माहित असतानाही, रोज नवं मलम फासून प्रयोग करण्यासारखं आहे. तरीही एक गोष्ट सांगतेच; पिंपळ हा प्रत्यक्ष नारायण आहे. पिंपळसेवा सुरु करावी.
हा किंवा कोणताही अन्य उपाय – सर्व राहून गेलेल्या विधींसाठीचा ऑप्शन नाहीय, याची नोंद घ्यावी.

आयुष्यातील समस्यांना कुलदेवता, राहत्या घरासंबंधित, कुळाचार संबंधित असे इतरही अँगल्स असतात. त्यातील पितृदोष हा महत्त्वपूर्ण व अनिवार्य अँगल आहे. हे कोणतेही तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) अथवा काल्पनिकता नाही. धर्मात सांगितलेले शास्त्र आहे. आणि या शास्त्रालाही इतरांप्रमाणे संशोधनांचा बेस आहे. ©

हे सर्व वाचून, भारावून जाऊन किंवा लगबगीने, एखाद्या इत्यंभूत ज्ञान व समज नसलेल्या कोणत्याही सोर्सकडून विधी करवून घ्यायचा निर्णय घाईगडबडीने घेउ नका. नाहीतर अज्ञानामुळे एका ठिकाणी आजार आणि चुकीच्या ठिकाणी औषध असा प्रकार होतो. तसेच असे राहिलेले विधी अमुकतमुक श्राद्ध नावाने करवून देणार्‍या व्यक्तीच्या अज्ञानामुळे आणि कसेबसे झटपट उरकण्याच्या कृतीमुळे काय घडते तेही सांगते. या फास्ट घडवून आणलेल्या विधींमुळे, पितृ स्पंदनलहरी फक्त पाण्यात खडा मारावा, तशा ‘चाळवल्या’ जातात. आणि अचानक पितृदोष कमी होण्याऐवजी वाढतो. आणि आपल्याला मात्र वाटते की, मी तर मानधन देउन सर्व यथोचित, अमुककडून करवून घेतले होते. मग पुन्हा हे असं कसं होतंय आयुष्यात?
तरी काळजी करु नका. आवश्यकता असल्यास संपर्क साधावा. आणि हा लेख म्हणजे पितृ विषयांवरचा निबंध नाहीय! गंभीर वास्तवाचे स्वानुभूत विश्लेषण आहे, हे जाणून घ्यावे, ही विनंती आहे. ©

शुभम भवतु. 🙏

डॉ. सुनेत्रा जावकर डोंबिवली महाराष्ट्र ©
माईंड कौन्सेलर, (हिप्नोथेरपिस्ट) संमोहन तज्ञ, निसर्गोपचार तज्ञ. 9820373281

विशेष सूचना : हा लेख copyrighted आहे. उल्लंघन करु नये. प्रोफाइलच्या नावासहित अशीच्या अशी पोस्ट म्हणजेच लिंक शेअर करु शकता.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*