अतींद्रिय क्षमता मनाच्या अतिसूक्ष्म आण्विक स्तरातून उगवते- Great psychic powers – भाग तिसरा – पुर्वार्ध

प्राचीन इतिहासात अतींद्रिय क्षमतांच्या माध्यमातून घडून आलेल्या अनेक चमत्कारिक घटनांचे उल्लेख आढळतात. एक काळ असाही होता, जेव्हा या अतींद्रीय शक्ती मधून घडलेल्या चमत्कारिक घटनांना, समाजातील काही जण भूतांचा प्रभाव अथवा भूतांचे प्रताप असे समजत असत. म्हणजे त्यांना वाटायचं की, भूतांचा किंवा विशिष्ट देवतांचा एकतर प्रकोप झालाय किंवा एक तर कृपा झाली आहे. मग या घटनांना नवीन नवीन दंतकथांमध्ये बंदिस्त केले जायचे. बऱ्याच काळापासून अनेक देशांमध्ये या अतींद्रीय शक्ती व क्षमता यांवर संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास आजही सुरू आहे आणि तो तसाच पुढे चालू राहणार आहे.

असा वैज्ञानिक अभ्यास सुरु असल्यामुळे, आता अतींद्रीय क्षमतांना काहीतरी विचित्र भयंकर गोष्ट म्हणून पाहणं, अनेकांनी सोडून दिलं आहे. अतींद्रिय विषयाला एक वैज्ञानिक तथ्य म्हणजे रियालिटी म्हणून स्वीकार करायला सुरुवात झाली आहे. या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे अतींद्रिय क्षमता म्हणजे इंद्रियांच्या — सामान्य ज्ञानाच्या पलीकडची काहीतरी क्षमता आहे, हे प्राथमिक ज्ञान अनेकांना झालं आहे. अमेरिकन मनोचिकित्सक डॉक्टर बर्नार्ड जॉन्सन यांचे एक पुस्तक आहे. त्याचे नाव आहे ‘बियॉंड टेलिपथी’. त्यामध्ये अतींद्रिय क्षमतांवर भाष्य करणाऱ्या, अनेक सत्य घटनांचा उल्लेख केला गेला आहे. या विद्वान लेखकाने या गोष्टीची पुष्टी केली आहे की, बऱ्याचशा माणसांमध्ये अशा क्षमता असतात, ज्यामुळे ही माणसं खूप दूरवर घडणाऱ्या घटनांची माहिती आपोआप मिळवू शकतात. यासाठी त्यांना प्रत्यक्ष तिथे जावं लागत नाही किंवा तशी साधनं वापरावी लागत नाहीत.

इंद्रियातीत क्षमता विकसित होउ शकतात

या शास्त्रामधील जाणकारांचं हे मत आहे की, योगाभ्यास, विशिष्ट साधना यांचा अभ्यास करून व सराव करून आपल्या चित्तवृत्तींना थांबवता येते किंवा असं म्हणता येईल की चित्तवृत्तींवर नियंत्रण मिळवता येते. या नियंत्रणातून अनेक प्रकारच्या अलौकिक क्षमता आणि दिव्य शक्ती अशा अभ्यासकांना प्राप्त करता येतात. या जाणकारांच्या म्हणण्यानुसार अनेकांना अणिमा, लघिमा, गरिमा अशा अनेक सिद्धी हस्तगत करता येतात. अगदी दूरदर्शन, दूरश्रवण, भूत-भविष्य ज्ञान अशा विलक्षण क्षमता सुद्धा मनुष्य प्राप्त करू शकतो.

काही लोकांना हा कल्पनाविलास वाटू शकतो. पण घडलेल्या अशा अनेक घटना हे सिद्ध करतात की, अतीन्द्रिय सामर्थ्य हे एक संपूर्ण सत्य आहे. हा कल्पनाविलास नाही. योग साधनांच्या माध्यमातून आत्मशोधन आणि आत्मशुद्धी केली जाऊ शकते आणि त्यातूनच अतिंद्रिय क्षमता प्राप्त होण्याची शक्यता अधोरेखित होते.

अनेक प्रकारच्या साधना व सातत्यपूर्ण अभ्यासाने मनाच्या सूक्ष्म स्तरापर्यंत पोहोचता येते आणि अशा ‘व्यष्टी’ मनाद्वारे म्हणजेच सूक्ष्म झालेल्या मनाद्वारे या समस्त ब्रम्हांडात व्यापलेली जी परम चेतना आहे, तिच्याशी तादात्म्य पावता येणे ( संपूर्ण एकरूप होता येणे) शक्य आहे आणि असे तादात्म्य साधल्यानंतर या पृथ्वीवरील भौतिक समस्यांचे निराकरण करणे अथवा भौतिक प्रश्नांची योग्य उत्तरं शोधणे, तसेच येणाऱ्या काळामध्ये दुःखद अथवा आपत्ती जनक घटना घडणार असेल, तर त्याची पूर्वसूचना प्राप्त होणे, हे सर्व काही शक्य आहे. हीच तर ती अतीन्द्रिय क्षमता अथवा शक्ती.

अमेरिकेतील एक प्रसिद्ध डॉक्टर रुकेंस हे म्हणतात की, प्रत्येक जीवामध्ये (अर्थातच मानवालाच हे सर्व विकसित करणे शक्य आहे) अतीन्द्रिय क्षमता मुळातच असतात. त्यांना तुम्ही प्रयत्नपूर्वक अभ्यासाने जागृत करू शकता. कधी कधी तर असं घडतं की, या अतीन्द्रिय शक्ती आपोआपच जागृत होतात. कधी कधी एखाद्या विशिष्ट घटनेमध्ये किंवा कधी कधी एखाद्या आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा, अचानक या अतींद्रिय शक्ती ऍक्टिव्हेट होतात. हे असे अचानक घडल्यामुळे, अशी अतींद्रिय शक्ती जागृत झालेल्या व्यक्तीकडे खूप कुतूहलाने व आश्चर्याने पाहिले जाते.

परामानसशास्त्रांमध्ये जी संशोधनं होत असतात, त्यामध्ये अनेकदा हे सिद्ध झाले आहे की, नेहमीच्या रुटीन आयुष्यामध्ये माणूस नित्य कर्मे करण्यासाठी जेवढी मानसिक क्षमता वापरतो, फक्त तेवढीच मानसिक क्षमता त्याच्यात असते, असं नाहीय. ती भरपूर प्रमाणात आहे. मग ही उरलेली मानसिक क्षमता कुठे जाते? तर ही मानसिक क्षमता मनुष्यामध्ये सुप्त अवस्थेत पडून राहते. संपूर्ण आयुष्य जगून पूर्ण होतं. परंतु त्या क्षमतेचा उपयोग माणूस करू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, स्वत: जमवलेला सर्वच्या सर्व बँक बॅलन्स त्या फक्त एकट्या माणसाला जसा वापरता येत नाही, तसंच या मानसिक क्षमतांच्या बाबतीत घडतं. अगदी प्रत्येकाच्या बाबतीत असा अनुभव येतो.

बाहेर नको, आत वळा !!

प्राचीन काळातील काही प्रसिद्ध घटनांबद्दल आता मी सांगते. या अशा घटना आहेत, ज्यामध्ये अतींद्रिय क्षमतांच्या आधारे – दूरश्रवण, दूरदर्शन, अ‍ॅस्ट्रल प्रोजेक्शन व ट्रॅव्हल, शाप वरदान अशा गोष्टींचं वर्णन आणि विश्लेषण केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, ज्या वेळेला महाभारताचे युद्ध प्रत्यक्ष चालू होतं, त्यावेळेला त्या युद्धात चाललेल्या घडामोडी धृतराष्ट्राला जाणून घ्यायची तीव्र इच्छा होती. राजवाड्यात बसून काय किंवा रणांगणावर जाऊन काय धृतराष्ट्राला तो अंध असल्यामुळे हे युद्ध दिसणारच नव्हते. मग युद्धाचे अपडेट तर दूरच राहिले. अशा वेळेला भगवान श्रीकृष्णाने संजय याला तात्पुरती दिव्यदृष्टी प्रदान केली. टीव्हीवर ज्याप्रमाणे दृश्य दिसते, त्याप्रमाणे दूरदर्शन या सिद्धी द्वारे संजयला धृतराष्ट्राच्या जवळ, राजवाड्यात बसल्या जागी युद्धभूमीवर जे काही चालले होते, ते सर्व दिसू लागले. प्रत्यक्षात हे युद्ध राजवाड्यापासून भरपूर योजने दूर अंतरावर चालू होते. संजय या युद्धाची लाईव्ह कॉमेंट्री धृतराष्ट्राला सांगत होता.

आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक ऋषीमुनींना ही अतींद्रिय क्षमता प्राप्त असल्याचा उल्लेख आढळतो. अनेक जणांची वाणी सिद्ध होती हे सुद्धा आपल्याला माहित आहे. या वाणीतून शाप किंवा वरदान अशा माध्यमातून दुष्टपणाचे निर्दालन आणि साधारण मानवाला संरक्षण प्रदान केले जायचे. आपल्या पवित्र भारतभुमीवर जे देव देवता, दैवतं, अवतार, उच्च महात्मा नांदत आहेत, ज्यांची माहिती आपण जाणतो, ते सर्व इंद्रियातीत अतींद्रिय शक्ती व क्षमतांचे प्रकट महास्त्रोत आहेत.

आत्मस्वरूप जाणा आणि स्वाध्यायाने बुद्धिमंत बना

एक अतिशय प्राचीन ग्रंथ, ज्याचे नाव आहे ‘योग तत्व उपनिषद’ यामध्ये मंत्र योग, हठ योग आणि राज योगाबद्दल माहिती दिली गेली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, पूर्णपणे तन्मयतेने, मनःपूर्वक तल्लीन होऊन केलेली योग साधना, ही सफल होतेच यात कोणतीच शंका नाही.

“योगी अपनी आँखों से जो कुछ भी देखता है, उसे वह सब आत्मा (आत्मा, स्वयं) के रूप में समझना चाहिए। इसी तरह, वह जो कुछ भी सुनता है, गंध ग्रहण करता है, स्वाद लेता है और स्पर्श करता है, उसे आत्मा के रूप में सभी की कल्पना करनी चाहिए।” — योगतत्व उपनिषद

याचा अर्थ, फक्त सर्वांना ‘आत्मा स्वरूपात जाणणं’ इतकाच मर्यादित नसून, ही अद्वैत जाणीव चित्तामध्ये प्रकट होणे महत्त्वाचे असते. हे थोडंसं वाचताना कठीण वाटत असलं तरी, अभ्यासाने सर्व काही प्राप्त होतं. अभ्यासानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वाध्याय आणि सातत्य. ज्यांनी या क्षमता अभ्यासाने प्राप्त केल्या अथवा साधनेने प्राप्त केल्या, ती सर्व माणसं तुम्हाआम्हा सारखीच सामान्य माणसं होती, हे लक्षात असू द्या. हे योग तत्त्व उपनिषद सांगते की, जसजसे आपल्या चित्ताचे सामर्थ्य वाढत जाते, तसतसे दूरश्रवण, वाचासिद्धी, संकल्प सिद्धी, दूरदर्शन सिद्धी अशा विलक्षण सिद्धी टप्प्याटप्प्याने प्राप्त व्हायला सुरुवात होते. चित्ताचे सामर्थ्य आपल्याला वाढवायचे असेल, तर सुरुवात मनोनिग्रहापासून व्हायलाच हवी.

तुम्हा सर्वांना एका विचित्र व विस्मयकारक अशा उपचार कर्त्याचे माहिती आहे का पहा. त्याचं नाव होतं ‘फ्रांझ अँटॉन मेस्मर’. डॉक्टर मेस्मर यांच्या नावावरूनच त्याने निर्माण केलेल्या चिकित्सा पद्धतीला ‘मेस्मेरिझम’ हे नाव प्राप्त झालं. मेस्मर हा डॉक्टर कसे उपचार करायचा, हे तुम्हाला माहित आहे का? त्याची मेस्मेरिझम ही विद्या म्हणजे – मनुष्याच्या शरीरात वाहणारी चुंबकीय प्राण शक्ती प्रभावित करून, रुग्णाला बरं करणारी होती. त्याच्या उपचाराच्या सर्वच पद्धती विचित्र व विस्मयांकित करणार्‍या होत्या.

जसं की, एका धातुच्या पेटीमध्ये तो रुग्णांना झोपवायचा. या पेटीला दोन वायर्स चे कनेक्शन केलेले असायचे. या वायर्सची टोकं मेस्मर स्वत:च्या हातात ठेवायचा. रोगी माणूस काही वेळ आत झोपायचा. एक छोटासा जर्क किंवा इलेक्ट्रिक लहर त्या माणसाच्या अंगामधून संचारून जायची आणि त्यानंतर तो रोगी उठून व्यवस्थित होऊन आपल्या घरी निघून जायचा. कधी कधी मोठ्या पेटीमध्ये भरपूर माणसं एकाच वेळी झोपायची. सेम जर्कच्या प्रक्रियेने सर्वजण बरे व्हायचे. इथे गैरसमज नसावा. कोणत्याही बाहेरच्या इलेक्ट्रिक सर्किटला या वायरी जोडलेल्या नव्हत्या. उपचारकर्त्याच्या शरीरातील इलेक्ट्रिसिटी वापरली जात होती.

DEAR MESMER

रुग्णसंख्या जेव्हा खूपच वाढत गेली, तेव्हा मेस्मर ने एक टोलेजंग हॉटेलच विकत घेतले आणि असे चमत्कारिक उपचार करून तो रोग्यांना बरे करु लागला. तेही अपुरे पडल्यावर मोकळ्या पटांगणावरील, खूप मोठा घेर असलेल्या झाडालाच त्याने आपल्या इलेक्ट्रिक चुंबकीय शक्तीने ‘भारून’ टाकले. नंतर तो सर्व रोग्यांना या झाडाभोवती एकमेकांच्या हातात हात देऊन गोलाकार उभे राहत असे नेहमीप्रमाणेच रोग्यांना एक जर्क बसून हे रोगी पूर्ण बरे होऊन घरी जात असत. अक्षरशः मेस्मरच्या या पद्धतीमुळे तत्कालीन डॉक्टर्सचे व्यवसाय बंद पडू लागले. त्यांनी डॉ. मेस्मरला त्रास देण्याचे अतोनात प्रयत्न केले. मेस्मर मात्र लोकांचा लाडका निष्णात उपचारकर्ता होता.

Second Half: अतींद्रिय क्षमता मनाच्या अतिसूक्ष्म आण्विक स्तरातून उगवते- Great psychic powers: भाग तिसरा: उत्तरार्ध

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life Coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

Home » Therapy » Transcendental Energy » अतींद्रिय क्षमता मनाच्या अतिसूक्ष्म आण्विक स्तरातून उगवते- Great psychic powers – भाग तिसरा – पुर्वार्ध
About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

1 Trackback / Pingback

  1. अतींद्रिय क्षमता मनाच्या अतिसूक्ष्म आण्विक स्तरातून उगवते- Great psychic powers: भाग तिसरा: उत्तरार्ध - Dnyan Power: Ho

Leave a Reply

Your email address will not be published.


*