प्राणायामेन युक्तेन सर्वरोगक्षयो भवेत्। आसनेन रुजो हन्ति प्राणायामेन पातकम्।” प्राणायामाने रोग निवारण व आत्मशुद्धी

Inner Purification & Disease-free Life through Pranayam Breathing

“चले वाते चलं चित्तं निश्चले निश्चलं भवेत् ।
योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायुं निरोधयेत् ॥”

(हठयोग प्रदीपिका – २.२)

श्वास आणि मन यांचा संबंध स्पष्ट करणारा हा अत्यंत लोकप्रिय श्लोक आहे.

या श्लोकाचा अर्थ: जोपर्यंत शरीरात वायू (श्वास) चल असतो, तोपर्यंत चित्त (मन) देखील चंचल राहते. जेव्हा श्वास स्थिर होतो, तेव्हा मनही स्थिर होते आणि योगी स्थिरता प्राप्त करतो. म्हणून श्वासावर नियंत्रण (कुंभक) मिळवणे आवश्यक आहे. (प्राणायामातील कुंभक क्रिया)

प्राण आणि जीवनशैली:
प्राणमय कोश आणि त्यातील प्राणांवर आपल्या जीवनशैलीचा खोल प्रभाव पडतो. व्यायाम, घरातील धावपळ व ऑफिस मधील काम, झोप, आहार आणि कामजीवन यांसारख्या शारीरिक घडामोडी आणि क्रिया शरीरातील प्राण-प्रवाह व त्याच्या वितरणावर परिणाम करतात. मनातील विविध भाव, विचार आणि कल्पना यांसारख्या मानसिक शक्ती प्राण शरीरावर तीव्र प्रभाव पाडतात.
जीवनशैलीतील अनियमितता, आहाराविषयीचा अविवेक आणि ताणतणाव यांमुळे प्राणिक -प्रवाह क्षीण होतो आणि त्यात अडथळेही निर्माण होतात. यामुळे लोकांना शक्ती कमी झाल्याचे व थकवा आल्याचे जाणवते. एखाद्या विशिष्ट प्राणातील ऊर्जा क्षीण (कमी) झाल्यावर, त्या प्राणाद्वारे नियंत्रित होणाऱ्या अवयवांमध्ये प्राणहीनता जाणवते; परिणामी आजार निर्माण होतात किंवा चयापचय (metabolism) बिघडते.
प्राणायाम तंत्रे प्राणमय कोशातील विविध प्राणांना ऊर्जावान व संतुलित करून ही बिघाडाची प्रक्रिया उलटवून लावतात. एकात्मिक (समन्वित) योग- कार्यक्रमाअंतर्गत आसनांनंतर प्राणायामाचा सराव केला पाहिजे.

श्वास, आरोग्य आणि प्राणायाम:
श्वास ही शरीरातील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती प्रत्येक पेशीच्या कार्यप्रणालीवर परिणाम करते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ती मेंदूच्या कार्याशीही अतिशय घट्टपणे जोडलेली आहे. माणूस एका मिनिटात सर्वसाधारणपणे १५ वेळा आणि दररोज २१,६०० वेळा श्वास घेतो.
श्वसन हे ऑक्सिजन आणि ग्लुकोजच्या ज्वलनासाठी इंधन पुरवते, ज्यामुळे प्रत्येक अवयवाचे काम, प्रत्येक स्नायूंचे आकुंचन, ग्रंथींचे स्राव आणि अनेक शारीरिक व मानसिक क्रिया चालवण्यासाठी ऊर्जा निर्माण होते. श्वासाचा मानवी अनुभवाच्या सर्व पैलूंशी जवळचा संबंध आहे.
बहुतांश लोक त्यांच्या फुफ्फुसांच्या क्षमतेचा फार थोडा भाग वापरून चुकीच्या पद्धतीने श्वसन करतात. अशा स्थितीत श्वसन उथळ होते आणि त्यामुळे शरीर उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन खरंतर प्राणवायू व प्राणापासून वंचित राहते.
साधक (अभ्यास करणारा) श्वसन-प्रक्रियेविषयी संवेदनशीलता विकसित करतात आणि फुफ्फुसांच्या स्नायूंना पुन्हा प्रशिक्षित करून, त्यांची प्राण-क्षमता वाढवून त्यांना प्राणायामासाठी तयार करतात.

लयबद्ध, खोल आणि मंद श्वसन:
लयबद्ध, खोल आणि मंद श्वसन मनाच्या शांत व संतोषपूर्ण अवस्थेला प्रेरित करते आणि स्वतःही या अवस्थेमुळे प्रेरित होते. अनियमित श्वसन मेंदूच्या सामंजस्यात (समतोलात) बिघाड निर्माण करते, ज्यामुळे शारीरिक, भावनिक आणि मानसिक अडथळे निर्माण होतात. त्या अनुषंगाने नंतर अंतर्गत संघर्ष, असंतुलित व्यक्तिमत्त्व, विस्कळीत जीवनशैली आणि आजारपणाची स्थिती उद्भवते. प्राणायाम ही प्रक्रिया उलटवून लावतो आणि या नकारात्मक चक्राला तोडून नियमित श्वसनाची सवय लावतो. प्राणायाम केल्यामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना, प्रणाली यांना (सिस्टिम्स) ऑक्सिजनचा छान पुरवठा होतो. श्वासांवर नियंत्रण मिळवून तसेच शरीर आणि मनाची नैसर्गिक, शांत लय पुन्हा प्रस्थापित करून प्राणायाम हे कार्य पूर्ण करतो.

जरी श्वसन ही प्रामुख्याने एक अचेतन (अजाणतेपणाने होणारी) प्रक्रिया असली, तरी कोणत्याही क्षणी तिच्यावर सचेतन (जाणीवपूर्वक) नियंत्रण मिळवता येऊ शकते. परिणामी, ती मनाच्या चेतन आणि अचेतन भागांमधील एक सेतू (ब्रिज) तयार करते. विक्षिप्त आणि अचेतन मनात कुठेतरी अडकून पडलेली ऊर्जा प्राणायामाच्या सरावाने अधिक सर्जनशील आणि आनंददायी कामांमध्ये वापरण्यासाठी मुक्त केली जाऊ शकते.

श्वसन आणि दीर्घ आयुष्य:
श्वसनाच्या लयबद्धतेमुळे जीवनाच्या दर्जाव्यतिरिक्त आयुष्याच्या दीर्घतेवरही (आयुष्यमानावर) परिणाम होतो. प्राचीन योगी आणि ऋषींनी निसर्गाचा अतिशय सखोल अभ्यास केला. त्यांनी पाहिले की मंद गतीने श्वास घेणारे प्राणी- जसे की अजगर, हत्ती आणि कासव- दीर्घायुष्यी असतात; तर जलद गतीने श्वास घेणारे व चंचल हालचाली करणारे प्राणी – जसे की पक्षी, कुत्रे आणि ससे – कमी आयुष्य असलेले असतात, ते काही वर्षांपर्यंतच जगतात. या निरीक्षणावरून त्यांनी मानवी आयुष्य वाढवण्यासाठी मंद श्वसनाचे महत्त्व ओळखले.
जे लोक पटकन (घाईघाईने) श्वास घेतात, त्यांचे आयुष्य मंद आणि खोल श्वसन करणाऱ्या लोकांपेक्षा कमी असण्याची शक्यता असते. शारीरिक पातळीवर याचे कारण असे की श्वसनाचा थेट संबंध हृदयाशी असतो. मंद श्वसनाचा दर हृदयाला मजबूत व निरोगी ठेवतो आणि दीर्घ आयुष्याची संधी देतो. खोल श्वसनामुळे प्राणमय कोशाद्वारे ऊर्जा शोषून घेण्याचे प्रमाण वाढते, ज्याच्या परिणामी कार्यक्षमता, प्राणशक्ती आणि सर्वसाधारण आरोग्यात वृद्धी होते.

प्राणायाम आणि आध्यात्मिक साधक:
प्राणायामाच्या अभ्यासाने प्राणमय कोशातील अडथळे दूर होतात, ज्यामुळे प्राण शोषून घेण्याची क्षमता वाढते आणि परिणामी एक निरोगी शरीर तयार होते. आध्यात्मिक साधकासाठी अध्यात्म-साधनेचा अनिवार्य भाग म्हणून मनाची शांती ही अत्यंत आवश्यक असते. यासाठी प्राणायामाच्या अनेक पद्धतींमध्ये ‘कुंभक’चा (श्वास रोखून धरण्याचा) वापर प्राण-प्रवाहावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे मन शांत होते आणि विचारप्रक्रिया नियंत्रित होते. अलीकडच्या काळामध्ये कुंभकाची माहिती व महत्त्व बऱ्याच ठिकाणी सांगितले जाते.

मन शांत होणे आणि चेतनेचा विकास:
मन पूर्णपणे शांत (निश्चल) झाल्यावर तसेच नाड्या आणि चक्रांमध्ये प्राणाचा मुक्त प्रवाह सुरू होताच चेतनेच्या विकासाचे दार उघडते. त्यानंतर साधकांसाठी आध्यात्मिक अनुभवाच्या उच्च पातळीवरील (सोपानांवरील) मार्ग सुकर होतो. स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू आणि थोर योगी स्वामी शिवानंदांनी त्यांच्या ‘प्राणायाम विज्ञान’ या पुस्तकात लिहिले आहे, “श्वसन, नाडी-प्रवाह आणि अंतर्गत प्राण किंवा प्राणशक्तीच्या नियंत्रणामध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध असतो. शारीरिक पातळीवर प्राण हालचाल व क्रियेच्या रूपात आणि मानसिक पातळीवर विचारांच्या स्वरूपात दिसून येतो. प्राणायाम हे ते साधन आहे ज्याद्वारे योगी आपल्या लहानशा शरीरात संपूर्ण ब्रह्मांडाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो आणि सृष्टीच्या सर्व शक्ती प्राप्त करून आत्मिक पूर्णत्व मिळवू इच्छितो.”

अष्टकुंभक मुख्य श्लोक (अध्याय २, श्लोक ४४)

“सूर्यभेदनमुज्जायी सीत्कारी शीतली तथा ।
भस्त्रिका भ्रामरी मूर्च्छा प्लाविनीत्यष्टकुम्भका: ।। ४४ ।।”
भावार्थ: सूर्यभेदन, उज्जायी, सीत्कारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्च्छा आणि प्लाविनी हे आठ प्रकारचे कुंभक (प्राणायाम) आहेत.

साधकांसाठी सामान्य सूचना:
प्राचीन ग्रंथांमध्ये प्राणायामासंदर्भात असंख्य नियम आणि सूचना दिल्या आहेत. मुख्य गोष्टी म्हणजे – अंतर्गत व बाह्य चिंतन आणि राहणीमानात संयम, समतोल व समंजसपणाचे वर्तन ठेवणे. परंतु ज्यांना प्राणायामाचा प्रगत (उच्च) सराव करायचा आहे, त्यांच्यासाठी मार्गदर्शक कुशल योग-शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे.

▪️मर्यादा (बंधने): आजारपणाच्या काळात प्राणायाम करू नये. मात्र, श्वासाविषयीची जागरूकता आणि शवासनामध्ये पोटाचे श्वसन (abdominal breathing) यांसारखे सोपे सराव केले जाऊ शकतात. प्रत्येक सरावासोबत दिलेल्या मर्यादा काळजीपूर्वक लक्षात ठेवाव्यात.

▪️सरावाची वेळ: प्राणायामाच्या सरावासाठी सर्वोत्तम वेळ सकाळची आहे, जेव्हा शरीर ताजेतवाने असते आणि मनात विचारांचे तरंग खूप कमी असतात. जर सकाळी वेळ काढणे शक्य नसेल, तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे सूर्यास्तानंतर लगेचच. शांतता देणाऱ्या प्राणायामांचा सराव रात्री झोपण्यापूर्वी केला जाऊ शकतो. शक्य असल्यास दररोज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी नियमितपणे सराव करण्याचा प्रयत्न करावा. सरावातील सातत्य (नियमितता) आपली क्षमता व संकल्पशक्ती वाढवते, तसेच शरीर आणि मनाला वाढलेली प्राणशक्ती स्वीकारण्यासाठी अनुकूल बनवते. कधीही घाई करू नये. मंद आणि स्थिर प्रगती अत्यंत आवश्यक आहे.

▪️स्नान: सराव सुरू करण्यापूर्वी स्नान करावे किंवा हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुवून घ्यावे. सरावानंतर अर्ध्या तासापर्यंत स्नान करू नये, जेणेकरून या काळात शरीराचे तापमान पुन्हा सामान्य होईल.

▪️कपडे : सरावाच्या वेळी ढिले, आरामदायक आणि नैसर्गिक धाग्यांपासून (अकृत्रिम रेशे) बनवलेले वस्त्रच परिधान करावेत. थंड हवामानात शरीर चादर किंवा घोंगडीने झाकून घ्यावे. डासांपासून संरक्षण करण्यासाठीही हे आवश्यक आहे.

▪️रिकामे पोटी : सकाळी उपाशी पोटी प्राणायामाचा सराव करावा किंवा जेवण केल्यानंतर कमीत कमी ३-४ तासांनी सराव करावा. पोटात अन्न असल्यामुळे मध्यपट (डायफ्राम) आणि फुफ्फुसांवर दाब पडतो, ज्यामुळे पूर्ण आणि खोल श्वसन करण्यास अडचण येते.

▪️आहार: प्राणायामाच्या बहुतांश सरावांसाठी प्रथिने (प्रोटीन), कार्बोहायड्रेट्स, मेद (फॅट्स), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि खनिजे (लवण) यांनी युक्त असा संतुलित आहार सर्वात योग्य आहे. धान्ये, डाळी, ताजी फळे आणि भाज्यांसोबत आवश्यकतेनुसार काही दुग्धजन्य पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो.
प्राणायाम सुरू केल्यावर बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवू शकते. मल घट्ट (कडक) झाल्यास मीठ आणि मसाले यांचा वापर बंद करावा आणि भरपूर पाणी प्यावे. जुलाब (लूज मोशन) झाल्यास काही दिवसांसाठी सराव बंद करावा आणि या काळात भात (तांदूळ) व दह्याचे सेवन करावे.
प्राणायामाच्या प्रगत (उच्च) अभ्यासांसाठी आहारात विशिष्ट बदलांची गरज असते. या संदर्भात मार्गदर्शनासाठी गुरुंचा सल्ला घ्यावा.

▪️सरावाची जागा: सराव शांत, स्वच्छ आणि हवेशीर (सुखदायक) खोलीत करावा, जिथे स्वच्छ हवा येत असेल आणि खूप जास्त वारा नसेल. व्हेंटिलेशन उत्तम असेल तर एसीची गरज नाही. सामान्यतः कडक उन्हात सराव करू नये, कारण उन्हामुळे शरीर जास्त गरम होते. फक्त सकाळचे कोवळे ऊन आल्हाददायक आणि स्फूर्तीदायक असते, त्यामुळे ती वेळ योग्य आहे. वादळी वारा, एअर कंडिशनर (AC) किंवा पंख्याच्या वेगवान हवेत सराव केल्याने शरीराचे तापमान बिघडू शकते आणि थंडी वाजून येण्याची (गारठा लागण्याची) शक्यता असते.

▪️श्वसन (श्वास घेणे): नेहमी नाकानेच श्वास घ्यावा, तोंडाने कधीही घेऊ नये. विशेष क्रियांचे निर्देश दिल्याशिवाय तोंडाने श्वास घेऊ नये. दोन्ही नाकपुड्या उघड्या असाव्यात आणि श्वासाचा प्रवाह अडथळामुक्त असावा. कफाचे (श्लेष्मा) अडथळे ‘नेती’ किंवा ‘कपालभाती’द्वारे दूर केले जाऊ शकतात. जर दोन्ही नाकपुड्यांमधून समान प्रवाह वाहत नसेल, तर ‘पादाधिरासन’सारख्या श्वसन-संतुलन पद्धतीद्वारे श्वास संतुलित करून घ्यावा.

▪️क्रम: षट्कर्म आणि आसनांनंतर व ध्यानापूर्वी प्राणायाम करावा. प्राणायामाच्या प्रत्येक सत्रामध्ये ‘नाडी शोधन’चा सराव केला पाहिजे, कारण त्याचे संतुलित करणारे आणि शुद्धिकारक प्रभाव हे यशस्वी प्राणायामाचा पाया आहेत. प्राणायामाच्या सरावानंतर काही मिनिटांसाठी शवासनात पडावे (विश्रांतीकारक आसन).

▪️बसण्याचे आसन: सराव करताना अडथळामुक्त श्वसन आणि शारीरिक स्थिरता मिळवण्यासाठी ध्यानाच्या कोणत्याही आरामदायक व स्थिर आसनात बसणे आवश्यक असते. प्राणायामासाठी सिद्धासन, सिद्धयोनी आसन किंवा पद्मासन ही सर्वोत्तम आसने आहेत. सरावाच्या काळात शरीर जास्तीत जास्त शिथिल (रिलॅक्स) असावे, तसेच पाठीचा कणा, मान आणि डोके एका रेषेत (सरळ) असावे. घडी घातलेली घोंगडी (कंबळ) किंवा नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेल्या वस्त्रावर बसावे, जेणेकरून सरावाच्या वेळी जास्त ऊर्जेचा क्षय (ऱ्हास) होणार नाही. जे लोक काही कारणास्तव ध्यानाच्या आसनात बसू शकत नाहीत, ते पाय पसरून भिंतीचा आधार घेऊन बसू शकतात किंवा पाठीचा कणा सरळ राहील अशा खुर्चीवर बसू शकतात.

▪️तणावापासून दूर रहावे (अतिताण टाळा): प्राणायामाचा सराव भरपूर केला म्हणून एका रात्रीमध्ये आपली क्षमता भरपूर प्रमाणात वाढत नसते. अधिक प्रगत (उच्च) सराव किंवा श्वासाच्या विशिष्ट प्रमाणात (अनुपातात) जाण्यापूर्वी जर एखाद्या विशिष्ट कालावधीपर्यंत प्राणायामाचा सराव करण्याचा सल्ला दिला असेल, तर समंजसपणे त्या निर्देशाचे पालन केले पाहिजे. तसेच, सहज आणि सुखद वाटेल तितकाच वेळ ‘कुंभक’ (श्वास रोखून धरणे) केला पाहिजे. फुफ्फुसे हे अत्यंत नाजूक अवयव असतात, त्यामुळे त्यांच्यावर जास्त ताण आल्यास किंवा चुकीचा वापर झाल्यास इजा/अपाय पोहोचू शकतो.
केवळ शरीरालाच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाच्या मानसिक आणि भावनिक पैलूंनाही जुळवून घेण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणूनच कधीही अतिरिक्त ताण किंवा जोर लावू नका.

▪️दुष्परिणाम (शुद्धीकरणाचे अनुभव): पहिल्यांदा सराव सुरू केल्यावर सामान्यतः निरोगी व्यक्तींमध्येही विविध प्रकारचे अनुभव किंवा लक्षणे दिसून येऊ शकतात. असे शरीराच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमुळे आणि विषारी घटक बाहेर पडल्यामुळे होते. खाज सुटणे, मुंग्या येणे, उष्णता किंवा थंडी वाजणे आणि हलकेपणा किंवा जडपणा जाणवणे असे अनुभव येऊ शकतात. या प्रकारचे अनुभव सामान्यतः तात्पुरते असतात. हळूहळू समतोल साधला जातो.

ऊर्जेच्या पातळीत (Energy levels) चढ-उतार होऊ शकतात आणि आवडीनिवडीत बदल होऊ शकतो. जर या बदलांमुळे जीवनशैलीत गैरसोय किंवा त्रास होत असेल, तर जोपर्यंत योग्य शिक्षक किंवा गुरुंचे मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत सराव कमी करावा किंवा काही काळासाठी बंद करावा.

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.


Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

Leave a Reply

Scroll to Top