Pranayama Siddhata, Tri-Bandhas, and Kundalini Awakening: The Esoteric Spiritual Path of Hatha Yoga
यापूर्वीच्या सर्वसाधारण आणि प्राथमिक माहितीपेक्षा (जसे की मूलभूत श्वासोच्छ्वास किंवा आरोग्याचे नियम) वेगळी, शास्त्रीय, तात्विक आणि हठयोगातील मूळ संदर्भांवर आधारित नवी माहिती या लेखामध्ये समाविष्ट केली आहे.
याचा मुख्य भाग असा आहे की, यामध्ये प्राणायामामध्ये जे कुंभक केले जाते, म्हणजेच श्वास रोखला जातो, या क्रियेसहीतच सर्व वेगवेगळ्या प्राणायामांची माहिती लिहिली आहे. प्राणायामाच्या नवीन साधकाला कुंभक लगेच साधला जाईलच असे नाही. नवीन साधकांनी पूरक व रेचक या क्रियांमधून सुरुवात करावी. हळूहळू कुंभक सुद्धा साधला जाईल.
🔹भाग १: हठयोगातील प्राणायामाचे गूढ शास्त्र आणि प्राण-मन संबंध:
“चले वाते चलं चित्तं निश्चले निश्चलं भवेत्।” — हठयोगप्रदीपिका (२.२)
हठयोगात प्राणायामाला केवळ फुफ्फुसांचा व्यायाम किंवा श्वास घेण्याची पद्धत मानले गेलेले नाही, तर ती मन आणि चेतनेवर नियंत्रण मिळवण्याची सर्वोच्च किल्ली आहे. स्वामी स्वात्माराम स्पष्ट सांगतात की, जोपर्यंत शरीरात ‘वात’ (प्राण) हलत असतो, तोपर्यंत चित्त (मन) चंचल राहते. जेव्हा प्राण स्थिर होतो, तेव्हा मन आपोआप निश्चल होते आणि साधक स्थैर्य (स्थैर्यम) प्राप्त करतो.
१. हठयोगाचे मूळ गणित: ‘ह’ आणि ‘ठ’
हठयोगात ‘ह’ म्हणजे ‘सूर्यनाडी’ (पिंंगला नाडी – जी उजव्या नाकपुडीचे प्रतिनिधित्व करते आणि उष्णता, कार्यशक्ती दर्शवते) आणि ‘ठ’ म्हणजे ‘चंद्रनाडी’ (इडा नाडी – जी डाव्या नाकपुडीचे प्रतिनिधित्व करते आणि शीतलता, मानसिक शांतता दर्शवते).
प्राणायामाचे मुख्य ध्येय: इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यांमधील प्राणप्रवाह संतुलित करून प्राणाला ‘सुषुम्ना नाडी’ मध्ये प्रवाहित करणे. जेव्हा प्राण सुषुम्नेत प्रवेश करतो, तेव्हा त्याला ‘उन्मनी अवस्था’ किंवा समाधीची पायरी म्हटले जाते.

२. हठयोगातील चार महत्त्वाच्या संकल्पना:
▪️नाडीशुद्धी (पूर्वअट): स्वामी स्वात्माराम म्हणतात की, जर शरीरातील ७२,००० नाड्या कफ, मेद, पित्त किंवा मळाने दूषित असतील, तर प्राण सुषुम्नेत प्रवेश करू शकत नाही. म्हणूनच प्राणायामापूर्वी नाडीशुद्धी आवश्यक आहे.
▪️नादानुसंधान: प्राणायामाच्या प्रगत अशा सरावाने शरीराच्या आत विविध सूक्ष्म ध्वनी (नाद) ऐकू येऊ लागतात. हा प्राणायाम सिद्ध झाल्याचा आणि मन अंतर्मुख झाल्याचा पुरावा मानला जातो.
▪️सिद्धावस्था आणि प्राण-विजय: ज्याप्रमाणे सिंह, हत्ती किंवा वाघ यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांना अतिशय हळूवारपणे आणि धैर्याने वश करावे लागते, त्याचप्रमाणे प्राणालाही प्राणायामाद्वारे हळूहळू वश करावे लागते. घाई केल्यास प्राणायाम साधकाच्या शरीराला इजा पोहोचवू शकतो.
▪️’केवल कुंभक’ हेच अंतिम ध्येय: हठयोगात पूरक (श्वास घेणे) आणि रेचक (श्वास सोडणे) यांपेक्षा कुंभक (श्वास रोखून धरणे) याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. जेव्हा श्वास आपोआप थांबतो, त्याला ‘केवल कुंभक’ म्हणतात.
Also read: त्रिबंध: आयुष्याचा महाबंध | Tribandh: The Mahabandh of Life (Tribandh Pranayam)
🔹भाग २: ‘अष्टकुंभक’ – हठयोगप्रदीपिकेतील आठ विशिष्ट प्राणायाम:
हठयोगप्रदीपिकेच्या दुसऱ्या उपदेशात स्वामी स्वात्माराम यांनी ‘अष्टकुंभक’ म्हणजे आठ प्रकारच्या मुख्य कुंभकांचे वर्णन केले आहे. हे आठ प्राणायाम केवळ श्वासाचे प्रकार नसून शरीरातील विशिष्ट आजार नष्ट करणाऱ्या आणि ऊर्जा जागृत करणाऱ्या योगिक प्रक्रिया आहेत.
“सूर्याभेदनमुज्जयी सीत्कारी शीतली तथा।
भस्त्रिका भ्रामरी मूर्च्छा प्लाविनीत्यष्टकुंभकाः॥”
(हठयोगप्रदीपिका २.४४)
१. सूर्यभेदन (Suryabhedana):
▪️सूर्यभेदन म्हणजे ‘सूर्याची ऊर्जा किंवा पिंगला नाडी जागृत करणारा श्वास’.
▪️यात उजवी नाकपुडी (पिंगला नाडी किंवा सूर्य स्वर) सक्रिय केली जाते, ज्यामुळे शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते.
▪️प्रक्रिया: या प्राणायामामध्ये उजव्या नाकपुडीने (सूर्यनाडी) श्वास घेऊन शक्य तितका वेळ कुंभक (श्वास रोखणे) करावा आणि नंतर डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा.
▪️विशेष लाभ: हे कपाल/मस्तिष्क शुद्ध करते, वातदोष दूर करते आणि पोटातील जंतू/कृमींचा नाश करते. शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण करते.
२. उज्जयी (Ujjayi):
▪️उज्जयी प्राणायामाला ‘विजयी श्वास’ (Victorious Breath) किंवा ‘समुद्र श्वास’ (Ocean Breath) म्हणून ओळखले जाते. घशातून येणाऱ्या विशिष्ट आवाजामुळे याला ‘सर्प श्वास’ किंवा ‘घोरणारा श्वास’ असेही म्हटले जाते.
▪️प्रक्रिया: तोंडाने श्वास न घेता दोन्ही नाकपुड्यांनी घशातून सौम्य आवाज (आकुंचन) करत श्वास आत घ्यावा, कुंभक करावा आणि डाव्या नाकपुडीने सोडावा.
▪️विशेष लाभ: घशातील कफ दूर होतो, शरीराची पचनशक्ती (जठराग्नी) प्रदीप्त होते आणि धातूंशी संबंधित आजार नष्ट होतात. चालताना किंवा उभे असतानाही हा कुंभक करता येतो.
३. सीत्कारी (Sitkari):
▪️सीत्कारी प्राणायाम (Sitkari Pranayama) हा, शरीराला नैसर्गिक थंडावा देतो आणि मनाला शांत करतो.
▪️प्रक्रिया: जिभेद्वारे, जिभेला स्पर्श करत, ‘सी-सी’ असा आवाज करत तोंडाद्वारे श्वास आत घ्यावा, नाकाने कुंभक करून श्वास हळूवार सोडावा.
▪️विशेष लाभ: कामदेवतेसारखे सौंदर्य आणि शरीराचे सौंदर्य वाढते. भूक, तहान, आळस आणि निद्रा यांवर विजय मिळवता येतो.
४. शीतली (Sheetali):
▪️शीतली प्राणायाम (Sheetali Pranayama) हा शरीराला नैसर्गिक थंडावा देणारा आणि मन शांत करणारा एक प्रमुख योगप्रकार आहे. ‘शीतली’ या संस्कृत शब्दाचा अर्थ थंड किंवा शीतल असा होतो.
▪️प्रक्रिया: जीभ नळीसारखी (पाइप) गोल करून बाहेर काढून त्याद्वारे श्वास आत घ्यावा आणि नाकाने श्वास सोडावा.
▪️विशेष लाभ: शरीरातील पित्त, उष्णता, प्लीहा (Spleen) चे आजार, ताप आणि विषारी घटकांचा नाश होतो. त्वचेचे व नियमित केल्यास एकंदर रक्ताभिसरण सुधारते आणि मुरूम, पुरळ यासारख्या त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
५. भस्त्रिका (Bhastrika):
▪️भस्त्रिका प्राणायाम हा एक महत्त्वपूर्ण योगिक श्वासोच्छ्वासाचा प्रकार आहे. ‘भस्त्रिका’ या शब्दाचा शाब्दिक अर्थ ‘भाता’ (लोहार जसा आगीत वारा घालण्यासाठी भाता वापरतो तसा) असा होतो.
▪️प्रक्रिया: लोहाराच्या भात्याप्रमाणे (Bellows) वेगाने नाकाने श्वास आत घेणे आणि सोडणे. हठयोगात याला सर्वात शक्तिशाली प्राणायाम मानले जाते.
▪️विशेष लाभ: हा कफ, पित्त आणि वात या तिन्ही दोषांचे संतुलन करतो. ब्रह्मनाडीच्या मुखावर असलेली कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी भस्त्रिका हा अत्यंत प्रभावी कुंभक आहे.
६. भ्रामरी (Bhramari):
▪️हा भुंग्यासारखा आवाज करत केला जाणारा एक सोपा, तरीही प्रभावी श्वासोच्छवासाचा योगप्रकार आहे, जो मन शांत करतो आणि तणाव दूर करतो.
▪️प्रक्रिया: श्वास आत घेताना भुंग्यासारखा गुंजन ध्वनी करणे आणि श्वास सोडतानाही तोच नाद निर्माण करणे.
▪️विशेष लाभ: साधकाच्या चित्तात अतुलनीय आनंदाची (आनंदलहरी) निर्मिती होते आणि मानसिक ताण समूळ नष्ट होतो. भ्रामरी प्राणायाम करताना होणाऱ्या आवाजामुळे, नाकातील आणि सायनसच्या (Sinus) पेशींमधून नायट्रिक ऑक्साईड (Nitric Oxide – NO) चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते: नायट्रिक ऑक्साईडमुळे शरीरातील रक्तवाहिन्या रुंद होतात (Vasodilation), ज्यामुळे संपूर्ण शरीरात आणि हृदयाकडे रक्तपुरवठा सुरळीत होतो.

७. मूर्च्छा (Moorchha):
▪️ हा हठयोगातील एक प्रगत प्राणायाम प्रकार आहे. ‘मूर्च्छा’ म्हणजे मूर्च्छित किंवा अर्ध-बेहोश (हळूहळू संवेदना हरवल्यासारखी) अवस्था. या प्राणायामामध्ये जाणीवपूर्वक श्वास रोखून मनाला शांत आणि अंतर्मुख केले जाते.
▪️प्रक्रिया: पूरक (श्वास आत घेऊन) केल्यानंतर दृढ जालंधर बंध लावावा आणि मन भूमध्यी स्थिर करून हळूहळू श्वास सोडावा.
▪️विशेष लाभ: मन बाह्य जगतापासून पूर्णपणे विलग होऊन ‘मूर्च्छित’ (शांत/लयरूप) होते आणि असीम सुखाची अनुभूती होते.
८. प्लाविनी (Plavini):
▪️ हे योगातील एक अत्यंत प्रगत आणि कठीण श्वसन तंत्र आहे. ‘प्लाविनी’ हा शब्द ‘प्लवन’ (पाण्यात तरंगणे किंवा वाहून जाणे) या संस्कृत धातूवरून आला आहे. या प्राणायामामध्ये हवा गिळून पोटात जाते आणि ती शरीराचा भार हलका करण्यास किंवा पचनक्रिया सुधारण्यास मदत करते असा योगशास्त्रात उल्लेख आहे.
▪️प्रक्रिया: पोटाच्या आत मुबलक प्रमाणात हवा भरून घेणे.
▪️विशेष लाभ: यामुळे साधक पाण्याच्या साठ्यावर (कमळाच्या पानाप्रमाणे) सहजरीत्या तरंगू शकतो. या प्राणायामाच्या नियमित अभ्यासामुळे, पचन सुधारते म्हणजे पोट व आतड्यांची कार्यक्षमता वाढून अपचन, गॅस आणि ॲसिडिटी कमी होते. फुफ्फुसांची क्षमता वाढते व श्वसनमार्ग सुधारून फुफ्फुसांना बळकटी मिळते. ऊर्जा व चैतन्य वाढून व प्राणशक्ती संतुलित होऊन मन शांत राहते. तणावमुक्ती होते, चेतासंस्था शांत होऊन मानसिक स्पष्टता वाढते. (Mental Clarity)
🔹भाग ३: प्राणायामाची सिद्धी, तीन बंध आणि कुंडलिनी जागरण:
प्राणायाम हा केवळ शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी नाही, तर हठयोगात त्याचे अंतिम उद्दिष्ट ‘कुंडलिनी जागरण’ आणि ‘समाधी’ हेच आहे. स्वामी स्वात्माराम यांनी प्राणायामाच्या उच्च अवस्था गाठण्यासाठी तीन प्रमुख बंधांची (Locks) जोड दिली आहे.
१. त्रिबंध – प्राणायामाचे तीन संरक्षक कवच
कुंभक करताना प्राणाची ऊर्जा बाहेर निसटून जाऊ नये आणि ती सुषुम्ना नाडीतच ऊर्ध्वगामी (वरच्या दिशेने) व्हावी यासाठी तीन बंध लावणे अनिवार्य आहे:
▪️मूलबंध (Mula Bandha): गुदद्वाराचे आकुंचन करून प्राणाला वर ढकलणे. यामुळे शरीरातील ‘अपान वायू’ वरच्या दिशेने सरकतो.
▪️उड्डियान बंध (Uddiyana Bandha): पोटाचे स्नायू पाठीच्या कण्याकडे आत खेचणे. यामुळे प्राण सुषुम्ना नाडीतून वरच्या दिशेने उड्डाण करतो.
▪️जालंधर बंध (Jalandhara Bandha): हनुवटी छातीला (कंठकूपावर) घट्ट टेकवणे. यामुळे कंठातील प्राणाचा मार्ग सुरक्षित होतो आणि मेंदूकडे अतिरिक्त दाब जात नाही.
💠त्रिबंधाचा चमत्कार: जेव्हा अपान वायू मूलबंधाने वर येतो आणि प्राण वायू खाली जातो, तेव्हा जठराग्नीजवळ दोघांचा मिलाफ होतो. यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सुषुम्ना नाडीत प्रवेश करते.
२. प्राणायाम सिद्धीची लक्षणे (Pranayama Siddhi Lakshana):
हठयोगप्रदीपिकेत स्वामी स्वात्माराम यांनी प्राणायाम योग्य रीतीने सिद्ध झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही स्पष्ट लक्षणे सांगितली आहेत:
▪️वपुः कृशत्वं (शरीर हलके आणि सूक्ष्म होणे): शरीरातील अतिरिक्त चरबी आणि दोष नष्ट होऊन शरीर हलके व कांतिमान होते.
▪️वदने प्रसन्नता ( चेहऱ्यावर प्रसन्नता): साधकाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज आणि शांतता दिसते.
▪️नादस्फुटत्वं (अंतर्नाद ऐकू येणे): अनाहत नाद स्पष्ट ऐकू येऊ लागतो.
▪️नयने सुनिर्मले (डोळे स्वच्छ व तेजस्वी होणे): डोळ्यांत एक वेगळीच चमक आणि स्पष्टता येते.
▪️आरोग्यं आणि जठराग्निवर्धनम्: साधक सर्व रोगांपासून मुक्त होतो आणि त्याची पचनशक्ती अत्यंत तीव्र होते.
▪️नाडीविशुद्धी: शरीरातील सर्व ७२,००० नाड्या पूर्णपणे शुद्ध होतात.
३. समाधी आणि प्राणायामाची परिणती:
हठयोगाचा शेवट ‘राजयोग’ (समाधी) मध्ये होतो. स्वामी स्वात्माराम म्हणतात:
“यावत्प्राणो स्थितो देहे तावज्जीवनमुच्यते।”
जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच जीवन आहे. प्राणायामाच्या सरावाने जेव्हा प्राण आणि मन दोन्ही पूर्णपणे लय पावतात, तेव्हा साधक ‘अमरत्व’ आणि आत्मसाक्षात्काराची स्थिती प्राप्त करतो.
ईश्वर कृपेने माझ्याकडून प्राणायामाची जेवढी माहिती आतापर्यंत लिहिली गेली आहे, ती केवळ पुस्तकी माहिती नाही; तर माझ्यासाठी प्राणायाम हे अनुभवसिद्ध प्रिय योग आचरण आहे. मन, शरीर व आत्मा यांसाठी चैतन्याचा रम्यातिरम्य डोह आहे. नक्की डुंबून पहावे.
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

